Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अमरसिंग गंभीर आजारी
मुंबई, १२ जून/प्रतिनिधी

 

समाजवादी पार्टीचे सरचिटणीस व भारतीय राजकारणातील अत्यंत मोठे ‘स्पीनडॉक्टर’ अमरसिंग यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार यावर उपचार करण्यासाठी ते सिंगापूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. समाजवादी पार्टीत मात्र त्यांच्या या आजारपणाबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी समाजवादी पक्षाच्या जवळ असलेल्या सहारा समुहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या आजाराविषयीही अशीच गुप्तता पाळण्यात आली होती.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेमध्येही अमर सिंग यांना सभेच्या मंचावरच चक्कर आली होती. त्यानंतर अमर सिंग यांच्या मूत्रपिंडांच्या विकाराबाबतची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अमर सिंग यांच्यावर सिंगापूर येथे मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांच्यासाठी योग्य त्या मूत्रपिंडांचा शोध घेण्यासाठी दिल्ली व मुंबईतील काही तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम काम करीत असून त्यातील काही डॉक्टर्स सिंगापूर येथे याआधीच पोहोचल्याचे समजते. मुलायमसिंग यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या आझम खान यांनी पक्ष सुरुवातीपासून उभा करण्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांचीही कणी अमर सिंग यांनी त्यांची मैत्रीण जयाप्रदा हिच्यासाठी कापल्यामुळे आता अमर सिंग यांच्या वाटेतील शेवटचा काटा दूर झाला होता. त्यामुळे अमर सिंग यांचा वारू तुफान सुटण्याच्या बेतात असतानाच त्यांना मूत्रपिंडाच्या विकाराने गाठल्यामुळे समाजवादी पार्टीतील एक गट प्रचंड चिंतेत पडला आहे.