Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

युवराजच्या अर्धशतकामुळे भारताची दीडशेच्यापुढे मजल
लंडन, १२ जून/ पीटीआय

 

युवराज सिंगच्या तडफदार अर्धशतकाच्या जोरावर भारताला ‘सुपर एट’ मधील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजपुढे १५४ धावांचे आव्हान ठेवणे शक्य झाले. बीनीचे तीन फलंदाज झटपट बाद झाल्यावर युवराजने ४३ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने ६७ धावा फटकाविल्या. तर युसूफ पठाण आणि हरभजन सिंग यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताला दिडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. वेस्ट इंडिजतर्फे ड्वेन ब्राव्होने चार तर फिडेल एडवर्ड्सने तीन विकेटस् मिळविल्या.
नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. जेरोम टेलरच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर गौतम गंभीरने चौकार ठोकून भारताला चांगली सुरूवात करून दिली खरी. पण त्यानंतर मात्र वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर आक्रमण करणे भारतीय सलामीवीरांना जमले नाही. सेहवागच्या जागी सलामीला येणाऱ्या रोहित शर्माला (५) मोठे फटके मारता आले नाहीत. त्याला फिडेल एडवर्ड्ने वेगवान बाऊन्सर टाकून तंबूत धाडले. त्यानंतर स्पर्धेत पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सुरेश रैनालाही (५) एडवर्ड्ने झटपट तंबूत धाडले. सलामीवीर गौतम गंभीर (१४) एक बाजू लाऊन धरेल असे वाटत होते, पण आज त्यानेही साफ निराशा केली. ३ बाद २९ अशी दयनीय अवस्था असताना युवराज फलंदाजीला आला आणि कसलेही दडपण न घेता त्याने फटकेबाजीला सुरूवात केली. युवराज एकीकडे फटके मारत असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (११) त्याला एकेरी धाव काढून साथ द्यायची होती, पण तेसुद्धा धोनीला जमले नाही. ११ धावा करण्यासाठी त्याला तब्बल २३ चेंडू खेळावे लागले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या युसूफ पठाणने युवराजला चांगली साथ दिली. खांद्याला दुखापत झाली असतानाही युसूफने २३ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ३१ धावा फटकाविल्या. ही जोडी प्रत्येक षटकाला १० धावा काढत असताना भारत १७० धावांचा पल्ला गाठेल असे वाटत होते. पण एडवर्ड्सनेच युवराजचा त्याचा अडसर दूर केला. त्यानंतर मोठे फटके खेळण्याच्या नादात शेवटच्या षटकात युसूफही बाद झाला आणि भारतीय संघ अडचणीत सापडला. पण हरभजन सिंगने (नाबाद १३) शेवटच्या तीन चेंडूत ड्वेन ब्राव्होला तीन चौकार ठोकून भारताला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला.