Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

प्रादेशिक

लता मगंशेकर, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून खासदार निधीचा वापरच नाही
मुंबई, १२ जून / खास प्रतिनिधी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, नागरी वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल, चित्रपट अभिनेत्री हेमामालिनी यांच्यासह ११ आजी-माजी खासदारांनी कामेच न सुचविल्याने त्यांना केंद्र सरकारकडून खासदार निधीची पूर्ण रक्कमच उपलब्ध होऊ शकली नाही. विशेष म्हणजे लता मंगेशकर व प्रितीश नंदी यांनी कवडीचेही काम सुचविले नाही. काही खासदारांची ही अनास्था असताना २४ आमदारांनी मात्र नियमात तरतूद नसताना विशेष बाब म्हणून कामे मंजूर करून घेतल्याबद्दल भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी आक्षेप घेतले आहेत.

नियमात तरतूद नसतानाही अपवाद करून आमदार निधी मंजूर !
मुंबई, १२ जून / खास प्रतिनिधी
एकीकडे खासदारांच्या अनास्थेमुळे निधीच मिळू शकलेला नसताना दुसरीकडे विधिमंडळाच्या उभय सभागृहातील २४ आमदारांसाठी नियमात तरतूद नसतानाही विशेष बाब म्हणून आमदार निधीतील कामे मंजूर करण्यात आल्याबद्दल ‘कॅग’ने ताशेरे ओढले आहेत. या संदर्भात ज्यांची नावे आली आहेत त्यांत विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख व उपसभापती वसंत डावखरे, विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा समावेश आहे.

ठाणे शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची पदे धोक्यात
हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारे चौथी वा सातवीही पास नाहीत!
मुंबई, १२ जून/प्रतिनिधी
ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुरेश वसनजी शहा(गडा) आणि उपाध्यक्ष आत्माराम नंदकुमार मोरे यांच्यासह शिक्षण मंडळावर निवडून आलेले आठ व शासनाने नियुक्त केलेले दोन असे एकूण १५ पैकी तब्बल १० सदस्य विद्यमान कायद्यानुसार शैक्षणिक अर्हता व शिक्षणसंस्था चालविण्याचा अनुभव या निकषांवर निवड/नेमणुकीस पात्र आहेत का हे राज्य सरकारने तपासून पहावे आणि यापैकी जे अपात्र आढळतील त्यांना तात्काळ काढून टाकावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

‘आशिया सायन्स कॅम्प’मध्ये प्रथमच भारतीय विद्यार्थी!
तरुण प्रज्ञावंत भेटणार महान शास्त्रज्ञांना

नीरज पंडित
१२ जून, मुंबई

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आशिया खंडात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आशिया सायन्स कॅम्प’मध्ये यंदा प्रथमच भारतीय विद्यार्थी सहभागी होत आहेत. यंदा हे शिबीर जपानमधील त्सुकूबा, इबाराकी येथे २ ते ८ ऑगस्टदरम्यान होत आहे. या शिबिरासाठी आशिया खंडातील २०० विद्यार्थी सहभागी होणार असून भारतातील ३० विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. या विद्यार्थ्यांना नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक मार्गदर्शन करणार आहेत.

पोलीस गृहनिर्माण धोरण
मंगळवारी जाहीर होणार
मुंबई, १२ जून / प्रतिनिधी
मुंबई पोलिसांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी येत्या मंगळवारी पोलिसांच्या गृहनिर्माणाबाबतचे धोरण विधानसभेत जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केली. त्याचप्रमाणे म्हाडाला केवळ पोलिसांसाठी काही घरे आणि वसाहती बांधण्यासही सांगण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. पोलिसांना ३०० चौ. फुटाची घरे बीओटी तत्त्वावर देण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्याची त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सदनांच्या सदस्यांची एक समिती नियुक्त करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली.

‘सुझलॉन’विरुद्ध हक्कभंग
मुंबई, १२ जून/प्रतिनिधी

सूझलॉन या पवनऊर्जानिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या विरोधात आज विधान परिषदेत विरोधी सदस्यांनी दाखल केलेला हक्कभंग प्रस्ताव सभापती शिवाजीराव देशमुख यांनी हक्कभंग समितीकडे पाठविला. सुझलॉनने पवनचक्क्या उभारताना जमिनींचे घोटाळे केले असल्याचा आरोप विधिमंडळात करण्यात आला होता.

नक्षलविरोधी पथकाच्या विशेष मोहिमेच्या महासंचालकपदी जयंत उमराणीकर
मुंबई, १२ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या नक्षलवादविरोधी पथकाच्या विशेष मोहिमेचे महासंचालक म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांची आज नियुक्ती करण्यात आली. राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत याची घोषणा केली. गडचिरोली येथे गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या नक्षलवादी कारवायांच्या पाश्र्वभूमीवर नक्षलवादविरोधी पथकाच्या विशेष मोहिमेचे महासंचालकपद निर्माण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती.

उद्योगमंत्री राणे यांचा अनिल अंबानी यांना हिसका
रिलायन्स एनर्जीचा परवाना रद्द करण्याची मागणी
मुंबई, १२ जून/प्रतिनिधी
वीज कायद्यातील कलम १०८ मधील तरतुदीनुसार राज्य शासनाने रिलायन्स एनर्जीचा परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यासंबंधी वीज नियामक आयोगाला निर्देश देण्याची मागणी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राणे यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबई उपनगरामध्ये वीज पुरवठा करण्याचा परवाना अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपच्या रिलायन्स एनर्जी या कंपनीकडे आहे.

भ्रष्टाचाराचा आरोप होताच मंत्र्याचे तत्कालीन मंत्र्याकडे बोट!
मुंबई, १२ जून / खास प्रतिनिधी

अनाथाश्रम आणि बालकाश्रम मंजूर करण्यासाठी प्रत्येकी दहा लाखांचा मलिदा एका मंत्र्याने जमा केला असून, अनाथाश्रम मंजूर होण्यापूर्वीच अनुदान देण्यात आल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केल्याने विधानसभेत आज गोंधळ झाला. त्यावर आपण या खात्याचे मंत्री डिसेंबर महिन्यात झालो असून त्यापूर्वी झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगत महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री मदन पाटील यांनी आपली सुटका करून घेताना आरोपांच्या तोफेचे तोंड तत्कालीन मंत्र्यांकडे वळविले.

आदर्श शिक्षक पुरस्कारविजेते एस. टी. राणे यांचे निधन
मुंबई, १२ जून/प्रतिनिधी

आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले बृहन्मुंबई मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळा कर्मचारी युनियनचे माजी उपाध्यक्ष साबाजी तथा एस. टी. राणे यांचे वृद्धापकाळामुळे कुर्ला येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.साबाजी राणे यांना १९९० मध्ये महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता तर १९९२ मध्ये मानव विकास मंत्रालयाचा आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिसेकामते या गावचे रहिवासी असलेले साबाजी राणे पालिकेच्या शाळेत १० वर्षे शिक्षक होते. कुल्र्याच्या महाराष्ट्र विद्याविकास मंडळाच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. या शाळेमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुयोग सहकारी पतपेढीचे ते संचालक -प्रवर्तक होते. नाथ पै शिक्षण प्रसारक मंडळ, विक्रोळी या संस्थेच्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. अभ्युदय सहकारी बँकेच्या नेहरुनगर शाखेचे ते सल्लागार होते. त्यांच्या पत्नी मुंबई महापालिकेच्या माजी शिक्षिका आहेत. बुधवारी रात्री राणे यांच्यावर चेंबूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘शांग्रिला’, ‘सन अ‍ॅण्ड सॅण्ड’ रिसॉर्टवर कारवाईची घोषणा
मुंबई, १२ जून/प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील शांग्रिला, सन अ‍ॅण्ड सॅण्ड या रिसॉर्टनी जमीन बळकावण्यापासून वेश्याव्यवसाय करण्यापर्यंत अनेक अवैध धंदे सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी आज विधान परिषदेत केला. लागलीच पुढील २४ तासांत या दोन्ही रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांनी दिले. काँग्रेसचे संजय दत्त यांनी ठाणे जिल्ह्यातील वॉटर रिसॉर्टमधील पाण्यातील प्रदूषण, अस्वच्छता याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चेत जितेंद्र आव्हाड यांनी शांग्रिला, सन अ‍ॅण्ड सॅण्ड या रिसॉर्टवर जमीन बळकावणे, बेकायदा दारुची विक्री करणे तसेच वेश्या व्यवसाय चालविणे असे आरोप केले. जमीन हडप करण्याच्या प्रकाराची माहिती तपासून कारवाई करू मात्र अन्य आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन २४ तासांत या रिसॉर्टवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन राऊत यांनी दिले.

माजी मंत्री पिचड यांनी राष्ट्रवादीचा घात केल्याचा आरोप
मुंबई १२ जून / प्रतिनिधी

राज्यातील खऱ्या आदिवासींना खोटे ठरवण्याचा एककलमी कार्यक्रम माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी राबविल्यानेच गोवारी, माना, हलबा, कोळी या सारख्या जातीच्या समाजाने राष्ट्रवादीकडे पाठ फिरवल्याचा आरोप कोळी महासंघाचे कोषाध्यक्ष राजहंस टपके यांनी आझाद मैदान येथील सभेत केला. जातीचा दाखला अवैध ठरल्याने शेकडो तरुणांना नोकरीतून काढण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

प्रा. प्र. मा. पोतदार यांचे निधन
मुंबई, १२ जून / प्रतिनिधी

पाल्र्याच्या साठय़े महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्र. मा. पोतदार यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजारामुळे ओशिवरा येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले प्रा. पोतदार २१ वर्षे साठय़े महाविद्यालयाचे प्राचार्य होते. विद्यार्थीप्रिय व कुशल प्रशासक असा त्यांचा लौकिक होता. दिवंगत पु. ल. देशपांडे व कुमार गंधर्व आणि पं. भीमसेन जोशी यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. ओशिवरा येथील स्मशानभूमीत आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साठय़े महाविद्यालयाच्या प्राचार्या कविता रेगे, प्रा. सोहनी, माजी पोलीस महासंचालक द. शं. सोमण आदी त्यावेळी उपस्थित होते.

माजी नौदल अधिकाऱ्याचा गूढ मृत्यू
मुंबई, १२ जून / प्रतिनिधी

नौदलाचे निवृत्त कॅप्टन मुकुल चक्रवर्ती (७५) यांचा मृतदेह ते राहत असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबवर आढळून आला. चक्रवर्ती हे कुलाबा येथील ‘हार्बर हाईट’ इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहत होते. परंतु त्यांचा मृतदेह इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबवर आढळून आल्याने त्यांनी आत्महत्या केली की उंचावरून पडून त्यांचा मृत्यू झाला हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. चक्रवर्ती एकटेच राहत होते. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चक्रवर्ती यांचा मृतदेह पहिल्या मजल्यावरील स्लॅबवर आढळून आला.