Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

येरे येरे पावसा..
नगर, १२ जून/प्रतिनिधी

रोहिणीचा पाऊस आला तर बोनस; मात्र मुगासारख्या नगदी पिकासाठी मृगाचा पाऊस आवश्यक मानला जातो. त्याची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी आता चिंतेत आहे. मृग नक्षत्र निम्मे सरले, तरी पावसाचा पत्ता नसल्याने अजूनही खरिपाला पोषक वातावरण तयार झालेले नाही. सर्वाचेच डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात व्यक्त झालेले पावसाचे सारे अंदाज फोल ठरले. अंदाजानुसार भारतात मान्सूनचे आगमन पाच दिवस आधी झाले. मात्र, त्याचा पुढचा प्रवास रेंगाळल्याने आता चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

व्यावसायिक स्पर्धा व भाऊबंदकीतून डॉ. कवडेंवर गोळीबार
चुलतभावासह पाच आरोपींना पोलीस कोठडी
श्रीरामपूर, १२ जून/प्रतिनिधी
भेर्डापूर येथील डॉ. प्रमोद कवडे यांच्यावर व्यावसायिक स्पर्धा व भाऊबंदकीतून गोळीबार करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायाधीश नातू यांनी १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली.
डॉ. कवडे यांच्या हत्येची सुपारी त्यांचा चुलतभाऊ डॉ. संदीप पोपट कवडे (वय ३०, भेर्डापूर) याने एक लाख रुपयांना दिली होती.

‘कळमकरांची विधाने पवारांनाच कमीपणा आणणारी’
विखेंवरील टीकेला अण्णासाहेब म्हस्के यांचे प्रत्युत्तर
नगर, १२ जून/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्याबाबत केलेली विधाने केंद्रीय मंत्री शरद पवार यांनाच कमीपणा आणणारी आहेत. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी नगरमध्ये हजेरी लावूनही जे घडायचे ते घडलेच! कळमकर यांच्याच विधानातून जिल्ह्य़ातील जनता पवार यांना मानत नाही व विखे यांना मानते असे स्पष्ट होते, अशी टीका माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी केली.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ८२ कोटींची उलाढाल
कोपरगाव, १२ जून/वार्ताहर

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्षभरात ८२ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होऊन समितीस २० लाख ५८ हजारांचा वाढावा झाला. बाजार समितीच्या स्थापनेपासून ही सर्वांत जास्त उत्पन्नाची नोंद झाली असल्याची माहिती सभापती संभाजीराव रक्ताटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ते म्हणाले की, शेतीमालाच्या भुसाराची वर्षभरात २ लाख ६९ हजार ३०७ क्विंटल आवक झाली. त्यात ३८ लाख ५२ हजार ९९२ रुपये, कांद्याची ४ लाख २५ हजार ८३ क्विंटल आवक झाली.

‘न्यायसिंधु’चा अमूल्य ठेवा!

नगर, १२ जून/प्रतिनिधी
‘लंडन शहरी तापाचा अजार फार चालला आहे. सध्या १५०० अजारी इस्पितळात आहेत..’
‘सयाजीमहाराज गायकवाड यांचे बंधू श्री. संपतराव गायकवाड यांनी विलायतेच्या प्रवासाचे उत्तर प्रायश्चित घेतले..’ ‘हिंदुस्थानातून ५० हजार टन साखर बाहेर रवाना..’ या आहेत सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीच्या बातम्या. नगर येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक न्यायसिंधुमध्ये अशा देशी-विदेशी बातम्या प्रसिद्ध होत असत.

आमदार लोखंडेंनी वापरला माहितीचा अधिकार
पाथर्डीतील रॉकेलविक्री
पाथर्डी, १२ जून/वार्ताहर
तालुक्यातील रॉकेलचे अर्धघाऊक विक्रेते संपत नेमाणे यांनी केलेल्या रॉकेलविक्रीबाबत कर्जत-जामखेडचे आमदार सदाशिव लोखंडे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली आहे. तांबेवाडी प्रकरणाबाबत मात्र त्यांनी मौन बाळगल्याने या प्रकरणाचे नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्न विचारला जात आहे. राजकीय द्वेषातून की अन्य दुसरे कारण यामागे दडले आहे, याची चर्चा तालुक्यात होत आहे.

स्वतच्या घरासाठी मनपाच्या खर्चाने दुसऱ्याच्या खासगी जागेतून रस्ता!
नगरसेवक पोपट बारस्कर यांच्याविरुद्ध तक्रार
नगर, १२ जून/प्रतिनिधी
स्वतच्या घराकडे जाण्यासाठी दुसऱ्याच्या खासगी जमिनीतून महापालिकेच्या खर्चाने पक्की डांबरी सडक करण्याचा उद्योग नगरसेवक पोपट बारस्कर यांनी केला असल्याची तक्रार लहुजी साळवे बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष अंतोन शामसुंदर गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली.

तनहा तनहा..
काही वर्षांपूर्वी ‘परिपूर्ती’ या संग्रहातील इरावती कर्वेचा एक लेख वाचण्यात आला. एकटेपणा, एकाकीपणाविषयी त्या लेखात त्यांनी लिहिलं होतं. अगदी पहिल्यांदा आत्मा एकटाच होता. त्याला करमेनासे झाले. एकाकी वाटायला लागले. त्याला पुष्कळ व्हावेसे वाटले, अधिक व्हावेसे वाटले, दुकटे व्हावेसे वाटले, आणखी कोणीतरी सोबतीला असावेसे वाटले आणि तो दुकटा झाला, पुष्कळ झाला. अशा आशयाचे काही त्या लेखात होते.

इंदिरा आवास घरकुलांची कामे रखडणार!
आता पंचायत समितीतून अनुदान
श्रीगोंदे, १२ जून/वार्ताहर
इंदिरा आवास योजनेच्या घरकुलांचे अनुदान आता पंचायत समितीमार्फत थेट लाभार्थीना मिळणार आहे. त्यामुळे गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. या निर्णयामुळे मात्र लाभार्थीची मोठी हेळसांड होईल, असा पदाधिकाऱ्यांचा दावा, तर यात अधिक पारदर्शकता येईल, असे प्रशासनाला वाटते. तालुक्यातील ४६१ घरकुलांचे पंचायत समितीकडे १ कोटी ४२ लाखांचे अनुदान या वादात पडून राहण्याची शक्यता आहे.

रूळ ओलांडणाऱ्याचा रेल्वेची धडक बसून मृत्यू
नगर, १२ जून/प्रतिनिधी

रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास कर्नाटक एक्स्प्रेसची धडक बसून तो गंभीर जखमी झाला. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ओव्हरब्रीजच्या खाली झाला.रेल्वेस्थानक पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली. राजेंद्र गोपीनाथ विधाते (वय ४८, रा. माळीवाडा) असे मृताचे नाव आहे. नगर-पुणे रस्त्यावरील उड्डाणपुलाखालील रेल्वेमार्ग ओलांडून जात असताना त्यांना कर्नाटक एक्स्प्रेसची धडक बसली.

मालमोटारींची धडक;दोन्ही चालक जखमी
नगर, १२ जून/प्रतिनिधी

मालमोटारींची समोरासमोर धडक होऊन दोन्हीही चालक जखमी झाले. एमआयडीसी पोलिसांनी एका मालमोटारीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.विळद घाटात हा अपघात झाला. शेख मुस्ताफ शेख सत्तार (वय २३, रा. बहादूरपूर, ता. पारोळा, जि. जळगाव) याने फिर्याद दिली.

देवगडच्या पालखीचे बुधवारी प्रस्थान
नेवासे, १२ जून/वार्ताहर

महाराष्ट्रात शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील सद्गुरू किसनगिरीबाबांची पालखी दि. १७ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी श्रीक्षेत्र देवगड येथे सुरू आहे. गुरुवर्य भास्करगिरीमहाराज यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र देवगड येथून दि. १७ रोजी सकाळी ७ वाजता दिंडीस प्रारंभ होईल. येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये पालखीचा पहिला मुक्काम आहे. पहाटे ३ वाजता बिगूल वादन, ४.३० ते ६ काकडा भजन व श्रींची प्रांत आरती, ६.३० ते ७ सामूहिक प्रार्थना, सकाळी ७ वाजता पालखीचे प्रस्थान, ७ ते ९.३०नंतर विसावा, १० ते ११ दुसऱ्या सत्रात नगरप्रवेश, ११ ते १ प्रवचन व दुपारचे भोजन, दुपारी १ ते ३ विश्राम, दुपारी ३ ते ५.३० पुन्हा प्रवास, सायंकाळी ६ ते ६.३० नगरप्रवेश, रात्री ९ ते १० कीर्तन व रात्री १० ते ३ विश्रांती असे पालखी सोहळ्यातील दैनंदिनी आहे. घोडेगाव, पांढरीपूल, नगर, घोगरगाव, मिरजगाव, चापडगाव, करमाळा, जेऊर स्टेशन, टेंभुर्णी, करकंब मार्गे, दि. १ जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहे.

शैक्षणिक जात पडताळणीसाठी मुदतवाढ
राहाता, १२ जून/वार्ताहर
विद्यार्थ्यांना शैक्षणिक जात पडताळणीसाठी अर्ज दाखल करण्यास खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रयत्नामुळे समाजकल्याण विभागाने मुदतवाढ दिली आहे.शैक्षणिकदृष्टय़ा जात पडताळणीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी उशिरा अर्ज दाखल केले होते, त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी खासदार वाकचौरे यांनी समाजकल्याण विभागाच्या सचिवांशी चर्चा करून मुदतवाढ मागून पुन्हा अर्ज मागितले आहेत. या विद्यार्थ्यांनी जात पडताळणीसाठी खासदार वाकचौरे यांच्या शिर्डी येथील कार्यालयात अर्जासह संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क साधून समस्या मांडल्या होत्या. यामुळे आपण समाजकल्याण सचिवांशी चर्चा करून अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मागितली. त्यास या विभागाने मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

जिल्हा पेन्शनर संघटनेतर्फे दि. १९ला ‘छत्री मोर्चा’
नगर, १२ जून/प्रतिनिधी
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा पेन्शनर असोसिएशनच्या वतीने येत्या दि. १९ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आर. टी. सांगळे यांनी दिली. त्रुटी दुरुस्त करून पेन्शनरांना ६वा वेतन आयोग लागू करावा ही मुख्य मागणी आहे. २३ वर्षांंत अद्याप निवड श्रेणीचे लाभ न देऊन सरकारने अन्याय केला आहे, असाही संघटनेचा आरोप आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचे तलाठय़ांना प्रशिक्षण
नगर, १२ जून/प्रतिनिधी
यशदा संस्थेच्या वतीने नगर तहसील कार्यालयात सर्व तलाठय़ांना आपत्ती व्यवस्थापनाचे एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. नैसर्गिक आपत्तीच्या कठीण परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक, जखमी यांचे संरक्षण कसे करावे, प्रथमोपचार साहित्य, त्याचा वापर, प्रसंगावधान ठेवून कोणाकोणाशी, कसा संपर्क साधायचा, निर्णय कसे घ्यायचे याबाबतची सविस्तर माहिती यशदाचे पी. बी. महाजन व आर. बी. महाजन यांनी दिली.तहसीलदार आप्पा शिंदे यांनी महाजन यांचा सत्कार केला. या प्रशिक्षणामुळे तलाठय़ांची आपत्तीकाळात सामना करण्याची मानसिकता निर्माण झाली, असे ते म्हणाले.

ब्राह्मण सेवा संघातर्फे उद्या करिअर गाईडन्स सेमिनार
नगर, १२ जून/प्रतिनिधी
ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने रविवारी (दि. १४) करिअर गाईडन्स सेमिनार आयोजिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी दिली.महापालिका सभागृहात सकाळी १० ते १ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात संदीप गीत मार्गदर्शन करतील. इयत्ता १० व १२वीनंतरच्या करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जाईल. सेमिनार सर्वासाठी खुले व मोफत आहे. अधिक माहितीसाठी संघाचे सचिव राजाभाऊ पोतदार (९८२२२४८५३०) यांच्याशी संपर्क साधावा.

रिक्षातून बेकायदा नेले जाणारे ३१ हजारांचे मद्य जप्त
नगर, १२ जून/प्रतिनिधी
रिक्षातून बेकायदा नेण्यात येणारे ३१ हजार रुपये किमतीचे देशी-विदेशी मद्य पोलिसांनी आज सायंकाळी जप्त करून एकास अटक केली. संतोष ज्ञानेश वाकचौरे (रा. ढोरगल्ली, माळीवाडा) यास अटक करण्यात आली. भाऊसाहेब जगताप (रा. घोगरगाव) हा पसार झाला. येथील मार्केट यार्ड चौकात पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका रिक्षाचा संशय आला. रिक्षामध्ये ३१ हजार ६०० रुपये किमतीचे बेकायदा देशी-विदेशी मद्य आढळले. पोलिसांनी हे मद्य, रिक्षा (एमएच १२ एफ ११०७) जप्त करून वाकचौरे यास अटक केली. तपास हवालदार धुमाळ करीत आहेत.

मूलस्थानी मृद संधारण माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
नगर, १२ जून/प्रतिनिधी
राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या मूलस्थानी मृद व जलसंधारण तंत्रज्ञान अवलंब कसा करावा या संबंधीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, कृषी उपसंचालक संभाजीराव गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने, कुलगुरू राजाराम देशमुख, कृषी अधीक्षक विकास पाटील, सी. डी. फकीर, बी. एन. शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

कास्ट्राईबची वार्षिक सभा उद्या विकास भवनात
नगर, १२ जून/प्रतिनिधी

राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या जिल्हा शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. १४) दुपारी १२ वाजता कास्ट्राईब कार्यालय, विकास भवन, जिल्हा परिषद कंपाऊंड, नगर येथे होणार आहे. जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील रिक्त जागा भरण्यासंदर्भात निर्णय सभेत होणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष विलास बोर्डे यांनी दिली.

‘अपंगांसाठीच्या योजना लाल फितीत अडकल्या’
नेवासे, १२ जून/वार्ताहर

केंद्र व राज्य शासनाच्या अपंगांसाठी विविध योजना राबवण्यात लाल फितीचा कारभार आड येत आहे. त्यामुळे अनेक अपंग शासनाच्या सुविधांपासून वंचित आहेत. योजनेतील किचकट अटी दूर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अपंग संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मुंडे यांनी समाजकल्याणमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंगांना किचकट अटींना सामोरे जावे लागते. त्यातच लाल फितीचा कारभार आड येतो. परिणामी अनेक अपंग शासनाच्या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. ॉ दारिद्र्यरेषेच्या यादीत समावेश करावा, घरकुल वाटपात आरक्षण द्यावे, संजय गांधी निराधार योजनेतील सानुग्रह अनुदान योजनेतील उत्पन्नाची अट तीस हजापर्यंत वाढवावी, या योजनेतील अनुदान दरमहा मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.