Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

विमान प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कमी प्रवासभाडय़ाची योजना
आजच करा बुकिंग
नागपूर, १२ जून/ प्रतिनिधी

हवाई वाहतूक कमी असल्याच्या काळात, म्हणजे पावसाळ्यात विमान प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध विमान कंपन्यांनी मर्यादित काळासाठी सर्वात कमी प्रवासभाडय़ाची योजना जाहीर केली आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना अजून एकच दिवस हाती आहे. इंडिगो, जेटलाईट आणि स्पाईसजेट यांनी सर्व करांचा समावेश असलेले (ऑल इन्क्लुझिव्ह) कमी प्रवासभाडे आकारण्याचे ठरवले आहे. जेट एअरवेजनेही प्रिमियम फुल सव्‍‌र्हिस क्लासने प्रवास करण्यासाठी सरचार्ज, कर आणि विमानतळ शुल्क वगळता कमी दराची घोषणा केली आहे.

डोळे पावसाकडे..
नागपूर, १२ जून / प्रतिनिधी

पावसाचा पत्ता नसल्याने सर्वाचीच तगमग वाढलेली आहे. त्यातच मान्सून बराच लांबणीवर पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांचा घास अडकून पडला आहे. सप्ताहापूर्वी वेधशाळेने कोकण व गोव्यात मान्सूनचे आगमन झाल्याची वार्ता दिली होती. त्यामुळे चार-पाच दिवसात विदर्भातही मान्सून बरसेल अशी आस वैदर्भीय लावून बसले होते. मात्र, मृग नक्षत्र अर्धे सरले तरी पावसाचा पत्ता नसल्याने पेरणीची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्याचा धीर खचत चालला आहे.

वाडी परिसरात अपहरण करून तरुणाचा निर्घृण खून
तिघांना अटक

नागपूर, १२ जून / प्रतिनिधी

जुन्या वैमनस्यावरून काटा काढण्याच्या उद्देशाने एका तरुणाचे अपहरण करुन दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्निल गुलाबराव भोयर (३१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो वाडीच्या आदर्शनगरातील रहिवासी होता.

हप्ता न दिल्याने आंबे विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला
नागपूर, १२ जून / प्रतिनिधी

हप्ता देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तिघांनी आंबे विक्रेत्यावर घातक शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहीपुरा भागात आज सकाळी झालेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. जंबो नावाचा एक इसम गेल्या काही दिवसांपासून आंबे विक्रीसाठी दहीपुरा भागात ठेला लावतो. त्याला तीन दिवसांपूर्वी आरोपी अंतु, वसिम आणि तोतरा बोलणारा एक इसम, अशा तिघांनी ठेला लावण्यासाठी हप्ता मागितला. हप्ता न दिल्याने आरोपी संतप्त झाले.

पावसाअभावी व्यावसायिकही अडचणीत
नागपूर, १२ जून / प्रतिनिधी

ऐन मृग नक्षत्रात पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकऱ्यांप्रमाणेच छत्री, रेनकोट, मेनकापड, पावसाळी पादत्राणांचे विक्रेते, सीट कव्हर, पत्रे कारागीर व इतर व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडले असून या व्यावसायिकांची अद्याप ‘बोहणी’ही झाली नसल्याचे चित्र आहे. सध्या पावसाळय़ाचे दिवस आहेत. गेल्या महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने सलामी दिल्यानंतर पाऊस दडी मारून बसला. गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळी ढगाळ वातावरण असल्यामुळे मुसळधार पाऊस येईल, असे वाटत होते पण, रात्रीच्या वेळी पाण्याचा शिडकाव मारल्यासारखा पाऊस पडला.

गणवेश निकृष्ट आढळून आल्यास पुरवठादाराविरुद्ध पोलिसांकडे तक्रार
नागपूर, १२ जून/ प्रतिनिधी

शासनातर्फे नि:शुल्क पुरविण्यात येणारे गणवेश निकृष्ट आढळून आल्यास पुरवठादाराविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश मानकर यांनी आज सभागृहात जाहीर केले. जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत काँग्रेसच्या कुंदा राऊत यांनी या प्रश्न उपस्थित केला होता. जिल्हा परिषदेच्या प्रश्नथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शासनातर्फे नि:शुल्क गणवेश पुरवण्यात येतात. मात्र, त्याचा दर्जा हा कायम निकृष्ट असतो. विद्यार्थ्यांना तो सहा महिनेही घालता येत नाही. या संपूर्ण व्यवहारात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार होता, असा आरोप कुंदा राऊत यांनी केला. त्यांच्या आरोपाला अनेक सदस्यांनी सभागृहात दुजोरा दिला. नागपूर जिल्ह्य़ात असा प्रकार आढळून आल्यास संबंधित पुरवठादाराविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्ष रमेश मानकर यांनी दिले. दरम्यान, आज झालेल्या विशेष सभेत महिला व बालकल्याण विभागाचा खर्च न झालेल्या ८० लाख रुपयांचा मुद्दाही सभागृहात गाजला. सदस्यांना देण्यात येणाऱ्या बॅगचा मुद्दा काँग्रेसचे सदस्य सुरेश कुमरे यांनी उपस्थित केला. या बॅगची गरज आहे कां, त्याचा दर्जा कसा राहणार आहे, कोणाकडून त्या बॅग्ज खरेदी करण्यात येणार आहेत, असे एक नव्हे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले. अध्यक्षांनी बॅग खरेदीसाठी दोन सदस्यांची समिती नियुक्त केली असून त्यात कुमरेंचाही समावेश केला आहे.

इंदिरा आवास योजनेतील घरे परस्पर विकल्याचा आरोप
नागपूर, १२ जून / प्रतिनिधी

दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून इंदिरा आवास योजनेंतर्गत मिळालेली घरे लाभार्थीकडून सधन व्यक्तींनी खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार कामठी तालुक्यातील तरोडी बु. या गावी उघडकीस आला आहे. या प्रकरणाची तक्रार गावातील माजी उपसरपंच बबन खुळे व बंडू चौधरी यांनी तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. माजी उपसरपंच बबनराव खुळे यांनी सांगितले की, इंदिरा आवास योजनेंतर्गत १९८६ मध्ये गरजू लोकांना शासकीय जमिनीवर घरे बांधून देण्यात आली होती. त्यावेळी तरोडी बु. येथील वांढरे, नेवारे व शंकर तहाडे यांना घरे मिळाली होती. मात्र, दोन वर्षापूर्वी या लाभार्थीना गावातील सधन नागरिकांनी जास्त रक्कम देऊन त्यांच्याकडून ती घरे विकत घेतली व तेथे मोठी पक्की घरे बांधली.वास्तविक, इंदिरा आवास योजनेंतर्गत देण्यात आलेली घरे कोणत्याही परिस्थितीत लाभार्थीला विकता येत नाही व कुणाला विकतही घेता येत नाही. लाभार्थीला घराची गरज नसेल तर ते दुसऱ्या लाभार्थीला तहसीलदारांच्या माध्यमातून हस्तांतरित करावे लागते. मात्र, या गावात चक्क घरे विकून शासकीय नियम तोडण्यात आला, अशी तक्रार खुळे आणि चौधरी यांनी केली आहे.

अंबाझरी दारुगोळा कारखान्यात उद्या परीक्षा
नागपूर, १२ जून/ प्रतिनिधी

अंबाझरी दारुगोळा कारखान्यामध्ये श्रमिक अकुशल श्रेणीतील ४१ रिक्त जागांकरिता १४ जूनला नागपुरात लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. लेखी परीक्षा कारखान्याच्या क्रीडा संकुलात होणार आहे. तेथे उमेदवारांना पोहोचण्यासाठी रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बस स्थानक आणि सीताबर्डी, झाशी राणी चौक येथून स्टार बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येथे माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. श्रमिक अकुशल श्रेणीकरिता मार्च महिन्यात रोजगार समाचारमध्ये जाहिरात देऊन अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी देशभरातून ३७ हजार ८४४ अर्ज प्रश्नप्त झाले. त्यात स्थानिक रोजगार कार्यालयाकडून ६१५ उमेदवारांची नावे प्रश्नप्त झाली होती. अर्जाच्या पडताळणीनंतर १६ हजार ५९५ उमेदवार लेखी परीक्षेकरिता योग्य घोषित करण्यात आली आहेत.