Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

नवनीत

जी व न द र्श न
दुष्ट मनुष्य

 

एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले.
भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हास माहीत आहे काय? भिक्खूंनी ‘नाही’, म्हणताच भगवंत बोलले, तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो.
दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवीत नाही, पुन: पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो तो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही, मग न विचारता तर बोलायलाच नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो; परंतु त्याचा तपशील लपवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले-
भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, जगात चार प्रकारची माणसे आढळतात.
पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वत:च्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वत:चे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वत:च्या हितासाठी झटतो; पण दुसऱ्याच्या नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वत:च्या त्याप्रमाणेच दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो. जो स्वत:च्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो, तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बुद्ध आणि त्यांचा धम्म)

कु तू ह ल
सौरदिवस व नाक्षत्रदिवस
सौरदिवस आणि नाक्षत्रदिवस यात फरक काय आहे?
आपल्या रोजच्या व्यवहारात जो दिवस वापरला जातो, तो प्रत्यक्षात सौरदिवस आहे. उत्तरबिंदू आणि दक्षिणबिंदू यांना जोडणाऱ्या व आपल्या डोक्यावरून जाणाऱ्या आकाशातील काल्पनिक रेषेला मध्यमंडल म्हटलं जातं. सूर्याच्या मध्यमंडल पार करण्याच्या क्षणाला मध्यान्ह म्हणतात. दोन लागोपाठच्या मध्यान्हीदरम्यानचा सरासरी काळ म्हणजे सौरदिन. व्यवहारातील सोयीसाठी आपण या सौरदिवसाचे तास, मिनिट आणि सेकंद असे लहान भाग पाडले आहेत. आपल्याला जो सूर्य रोज उगवताना, मध्यमंडल पार करताना आणि मावळताना दिसतो तो पृथ्वीच्या स्वत:भोवतालच्या प्रदक्षिणेमुळे. पण पृथ्वी स्वत:भोवती फिरताना सूर्याभोवतीही प्रदक्षिणा घालीत असते. पृथ्वीच्या या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे आकाशातील ताऱ्यांच्या पाश्र्वभूमीवर सूर्य हा धिम्या गतीने पूर्वेकडे सरकत असतो.पृथ्वीचा स्वत:भोवतीच्या प्रदक्षिणेचा काळ हा २३ तास ५६ मिनिटांचा आहे. जर पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसती तर सौरदिनाचा कालावधी हा पृथ्वीच्या या स्वत:भोवतीच्या प्रदक्षिणेच्या काळाइतकाच झाला असता. पण पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेमुळे, पृथ्वीची स्वत:भोवतीची प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत सूर्य थोडासा पुढे सरकलेला असतो. त्यामुळे सूर्य पुन्हा मध्यमंडलावर आलेला दिसण्यास पृथ्वीला चार मिनिटं अधिक फिरावं लागतं. म्हणजे सौरदिवस पूर्ण होण्याच्या चार मिनिटं अगोदर पृथ्वीची स्वत:भोवतीची प्रदक्षिणा पूर्ण झालेली असते. सूर्याला पुन्हा मध्यमंडलावर यायला चोवीस तास लागत असले तरी एखाद्या ताऱ्याला मध्यमंडलावर येण्यासाठी लागणारा काळ हा पृथ्वीच्या प्रदक्षिणेइतका म्हणजे २३ तास ५६ मिनिटे इतका असतो. सूर्याला मध्यमंडल पुन्हा पार करायला लागणाऱ्या काळाला जसं सौरदिन म्हणून संबोधलं जातं, तसं ताऱ्याला मध्यमंडल पुन्हा पार करायला लागणाऱ्या या २३ तास ५६ मिनिटांच्या काळाला नाक्षत्रदिवस म्हणून संबोधलं जातं.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
दुसऱ्या बाजीरावाचा इंग्रजांशी तह
मराठेशाहीच्या अस्ताचे निरनिराळे टप्पे मानण्यात येतात. त्यांची सुरुवात दुसऱ्या बाजीरावाने ३१ डिसेंबर १८०२ रोजी केलेल्या वसईच्या तहापासून झाली. असाच एक तह त्याने १३ जून १८१७ रोजी इंग्रजांशी करून मराठी राज्य धुळीस मिळवले. दुसऱ्या बाजीरावाचा विश्वासू सहकारी त्र्यंबकजी डेंगळे मोठय़ा शिताफीने इंग्रजांच्या कैदेतून सुटला. पुढे त्याने फौज गोळा करून इंग्रजी मुलखात मोठा धुमाकूळ घातला. स्मिथ आणि एल्फिस्टन साहेबांनी डेंगळे यास आमच्या स्वाधीन करावे, असा तगादा बाजीरावाकडे लावला. तेव्हा आपल्या मिठ्ठास वाणीने प्रसिद्ध असणाऱ्या बाजीरावाने, ‘गैरसमज वाढत आहे. तुमच्याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही द्वेषबुद्धी नाही. तुमच्याच आश्रयाने मी लहानाचा मोठा झालो. माझे हे शरीर नखशिखांत इंग्रजी अन्नाने वाढले आहे. तेव्हा मी तुमच्याशी युद्ध कसा करेन?’तथापि बाजीरावाच्या या मिठ्ठास वाणीचा एल्फिस्टनवर काहीही परिणाम झाला नाही. उलट एक महिन्यात डेंगळय़ाला स्वाधीन करा, असा बाजीरावाला हुकूम केला. त्या बदल्यात जामीन म्हणून सिंहगड, पुरंदर, रायगड हे किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन करा. असा बाजीरावास निरोप पाठवला. तथापि डेंगळय़ास पकडण्यात बाजीरावास यश आले नाही. तेव्हा तूर्तास इंग्रज म्हणतील तसा तह करावा आणि यातून युद्धाची तयारी करावी, असा विचार बाजीरावाने केला. शके १७३९ ज्येष्ठ व. १४ रोजी म्हणजे दिनांक १३ जून १८१७ रोजी बाजीरावाने या तहावर सही केली.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
फुलपाखरू, फूल आणि झुळूक
एके दिवशी एक फुलपाखरू शार्दुलीकडे आलं. तिच्याभोवती भिरभिरलं. ‘माझ्याशी खेळतेस? मी फुलांवर बसेन, फांदीवर झोके घेईन, हवेत तरंगेन; तू मला पकडायचंस. मी तुला चकवत पुढेपुढे जाईन. गंमत येईल.’शार्दुली म्हणाली, ‘छे रे बाबा, आईला मदत करायचीय. कणीक मळायचीय, लोणी काढायचंय, भाजी निवडायचीय, मग ती मला चॉकलेट देईल.’फुलपाखरू हिरमुसले आणि गेले पुन्हा उडून. जाऊन बसले फांदीवर. वाळय़ाची झुळूक आली. बागेत शार्दुलीला पाहून, ‘ए मुली, येतेस का गं माझ्याशी खेळायला?’ तिला पाहून शार्दुली म्हणाली, ‘नको गं बाई, आजीच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. तिनं किनई मला प्रॉमिस केलंय आज गोष्ट सांगेन म्हणून. मला आजीच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतं.’ वाऱ्याच्या झुळकेनं एक गिरकी घेतली आणि ती म्हणाली, ‘बरं बाई, मी जाऊन फुलांना, पानांना झोके देईन. पाण्यावर लहरी उठवून त्यांच्याशी खेळेन. पक्ष्यांच्या बरोबर आकाशात फिरत राहीन. शेतांना डुलायला लावेन. पाचोळय़ाला नाचायला लावेन.’बागेतलं फूल शार्दुलीच्या खिडकीत हळूच डोकावलं. म्हणालं, ‘शार्दुलीराणी, चल गं वेलींवर बसून झोके घेऊ. गंधांची गाणी गाऊ. पक्ष्यांशी गुजगोष्टी करू. इवलीशी पाखरं येतात माझ्याकडे मध मागायला. त्यांच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारू. त्यांच्या सहलींच्या गोष्टी ऐकू.’ ‘नको रे बाबा! आज बाबा-आई मला शॉपिंगला नेणार आहेत. किती किती नव्या गोष्टी आणायच्या आहेत मला. शिवाय आम्ही पाणीपुरी आणि एसपीडीपीपण खाणार आहोत.’ ‘एसपीडीपी म्हणजे?’ चकीत होऊन फुलानं विचारलं. ‘अरे, एवढंही माहीत नाही का तुला? शेवपुरीदहीपुरी!’ शिवाय नंतर आईस्क्रिमसुद्धा खायचंय आम्हाला!’फूल थोडेसे कोमेजले. थोडेसे हिरमुसले. वाकल्या देठाने खिडकीपासून दूर झाले. शार्दुली उडय़ा मारत आईकडे गेली. ‘आई, मला चॉकलेट दे’. आई म्हणाली, ‘नाही गं बाई’. शार्दुली हिरमुसली. आई म्हणाली, ‘फुलपाखरू असेच हिरमुसले.’ ‘आजी, गोष्ट सांग ना गं? कंटाळा आला गं फार,’ म्हटल्यावर आजी शार्दुलीला म्हणाली, ‘वाऱ्याच्या झुळकीलाही कंटाळा आला होता. तू कुठं गेलीस तिच्याशी खेळायला.’ शार्दुलीनं दोघींचा नाद सोडला. बाबा घरी येताच त्यांचे बोट पकडून म्हणाली, ‘पाणीपुरी, एसपीडीपी, आईस्क्रिम, शॉपिंग..! केव्हाची वाट बघतेय मी.’ बाबा म्हणाले, ‘शार्दुलीताई, फूल बिचारं कोमेजलं, हिरमुसलं. मी तुला नाही म्हटल्यावर तूही अशीच हिरमुसशील.’ ‘नाही हो बाबा, मी फुलांशी, वाऱ्याशी, फुलपाखरांशी गट्टी करीन’, शार्दुली म्हणाली. बाबा सगळय़ांना घेऊन घराबाहेर पडले. निसर्ग आपल्यावर प्रेम करतो, कारण आपण सगळे निसर्गाचाच भाग असतो. आपण मात्र हे विसरतो आणि निसर्गापासून दूर जातो. निसर्गावर अन्याय करतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याचा गैरवापर करतो. खरंतर निसर्गापासून आपल्याला केवढातरी आनंद मिळतो. शिक्षण मिळते. प्रसन्नता मिळते.
आजचा संकल्प - मी निसर्गाला विसरणार नाही.
ज्ञानदा नाईक