Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

अन्यायाच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्तांचा आत्मदहनाचा प्रयत्न
उरण/वार्ताहर -
वारंवार निवेदन, तक्रारी, चर्चा, बैठकीनंतर अनेकदा दिलेल्या आश्वासनानंतरही कामाची पूर्तता झाली नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सिडको विरोधात कमळाकर कडू या प्रकल्पग्रस्तांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सिडको कर्मचारी आणि पोलिसांची तारांबळ उडून चांगलीच खळबळ माजली. उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत हद्दीतील कमळाकर कडू यांची जमीन ओएनजीसी प्रकल्पासाठी संपादन करण्यात आली आहे. या प्रकल्पग्रस्त कमळाकर कडू यांना संपादित घराच्या बदल्यात सिडकोने नागाव येथे भूखंड दिला आहे. यासाठी त्यांनी भूखंडाचे पैसेही सिडकोला मोजले आहेत. प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या भूखंडावर शेतकऱ्यांनी घरे बांधली आहेत, मात्र या घरापर्यंत ये-जा करण्यासाठी सिडकोने तीन मीटर रुंदीचा रस्ता मंजुरीनंतरही बांधला नाही. परिणामी, घरापर्यंत ये-जा करणे प्रकल्पग्रस्तांना अवघड होऊन बसले आहे. ३० वर्षांपूर्वी नियोजित रस्ता न बांधल्याने आता त्याजागी अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे हटवून रस्ता बांधण्यात यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्त कमळाकर कडू यांनी सातत्याने चालविली होती, मात्र सिडकोकडून त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांची भेट घेऊन कमळाकर कडू यांनी सिडकोने चालविलेल्या अन्यायाचा पाढा त्यांच्यासमोर वाचला होता. कैफियतीची दखल घेऊन रामदास कदम यांनी या प्रकरणी लक्षवेधी सूचनाही मांडली होती. मात्र त्यानंतरही सिडकोने कारवाई करण्यास टाळाटाळच केली. सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे रस्त्यांचे काम टेंडर निघूनही रखडल्याने अखेर संतप्त झालेल्या कमळाकर कडू यांनी सिडको द्रोणागिरी भवन येथे आत्मदहन करण्याची नोटीस सिडकोला दिली होती. त्यासाठी सिडको अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशीही तंबी देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही सिडकोला दयेचा पाझर फुटला नाही. उलट नियोजित रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या इसमांकडून शिवीगाळ, मारहाण करण्याच्या धमक्या कमळाकर कडू यांच्या कुटुंबियांना येऊ लागल्या. यामुळे द्विधास्थितीत सापडलेल्या कमळाकर कडू यांनी सिडकोच्या बोकडवीरा येथील द्रोणागिरी प्रशासन भवनासमोरच सकाळी साडेअकराच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून अंगाला आग लावण्यापूर्वीच कडू यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र सिडकोच्या या गलथान कारभाराबाबत सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यातील ग्रंथालयांचे अनुदान वाढणार
पनवेल/प्रतिनिधी :
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघातर्फे मुंबईतील आझाद मैदानामध्ये ९ जून रोजी करण्यात आलेले बेमुदत उपोषण यशस्वी ठरले आहे. राज्य सरकारने उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेत या ग्रंथालयांना दुप्पट अनुदान देण्याचे मान्य केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातही वाढ होणार आहे. राज्यभरातील ग्रंथालयांना सरकारकडून अतिशय कमी अनुदान दिले होते. वाढीव अनुदानाच्या मागणीसाठी तसेच ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी संघाने हे उपोषण आरंभले होते. यासाठी मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आदी विभागांतून अडीच हजार ग्रंथालय कर्मचारी आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी उपोषणकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे प्रमुख कार्यवाह नंदू बनसोड, दीनानाथ नाईक, बाबासाहेब कावळे, दशरथ क्षीरसागर आदी उपस्थित होते. या चर्चेअंती टोपे यांनी ग्रंथालयांचे अनुदान दुप्पट करणे, तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाइन करणे, त्यांना सेवानियम लागू करणे आदी मागण्या मान्य केल्या. सरकारच्या या निर्णयाचा लाभ राज्यभरातील हजारो ग्रंथालयांना आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे.