Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

शिवसेनेचा ‘सिडको बंद’ शांततेत
गुंडांविरुध्द कठोर कारवाईची मागणी

प्रतिनिधी / नाशिक

शहरातील वाढती गुन्हेगारी आणि सिडकोत टोळक्याने अलिकडेच जाळलेल्या ४० दुचाकींच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेने पुकारलेला सिडको बंद शांततेत पार पडला. रिक्षा व बस वाहतुकीचा अपवाद वगळता या भागातील बाजारपेठ, बँक, मल्टिप्लेक्स, महाविद्यालये बंद होती. बंद दरम्यान अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चौकाचौकात पोलीस तैनात होते. शहर गेल्या काही महिन्यांपासून विविध स्वरूपाच्या गुन्हेगारी घटनांना सामोरे जात आहे.

पोलीस यंत्रणेला काँग्रेसचे आवाहन
फोफावती गुंडगिरी अन् तटस्थ नेतागिरी

प्रतिनिधी / नाशिक

सिडको परिसरात एकाच रात्री जवळपास ४० वाहने जाळण्यात आल्याचे पडसाद अद्यापही शहरात सर्वत्र उमटत आहेत. काँग्रेसनेही या घटनेचा निषेध करून त्याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. या पक्षाची काय भूमिका आहे, त्याविषयी शहर काँग्रेसचे नेते डॉ. दिनेश बच्छाव यांनी केलेले मतप्रदर्शन..
प्रश्न : नाशिकमध्ये सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत काँग्रेसचे काय धोरण आहे.
डॉ. दिनेश बच्छाव : शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा ही काँग्रेसची भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या प्रश्नी आम्ही पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्याशी चर्चा केली होती. सिडकोमध्ये टिप्पर

वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिक शहर धुमसत असून ‘शांत शहर’ ही ओळख कधीच हद्दपार झाली आहे.
शहरातील बदलत्या परिस्थितीचा सामाजिक जीवनावरही परिणाम होऊ लागला असून अकरावीत प्रवेश केलेल्या एका विद्यार्थिनीने मांडलेली भावना प्रश्नतिनिधीक ठरावी.
मी १५ वर्षाची. जन्म नाशकातलाच. नाशिककर असूनही आज काही तरी वेगळं वाटतयं. काही दिवस मी शहराबाहेर होते. तेव्हा बाहेरगावी न्यूज चॅनलवर ‘नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी’, ‘४० गाडय़ा जाळल्या’ गुंडगिरीचा हलकल्लोळ’ यासारख्या बातम्या पाहिल्या आणि धक्का तर बसलाच, त्यापेक्षा जास्त दु:ख नाशिकची तुलना बिहारशी केली गेल्याने झाले. हे माझं नाशिक नाही--!

मिटवा गुन्हेगारीचे वळ.. आयुक्तांना द्या पाठबळ
गुंडांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात नाशिकरोड येथे कृष्णकांत बिडवे या पोलिसाची हत्या झाल्यानंतर कुणातरी ‘अज्ञात’ शक्तीने मुसक्या बांधाव्यात, त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष गप्प होते. साधा निषेध व्यक्त करण्याचे सौजन्यही त्यांना दाखविता आले नाही. राजकीय पक्षांच्या या ‘चुपके चुपके’ भूमिकेविषयी काही माध्यमे शंका उपस्थित करीत असतानाच सिडकोतील मोटारसायकली जाळण्याचे प्रकरण झाले. या प्रकरणामुळे जनतेत निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन अखेर राजकीय पक्षांना पुढे यावेच लागले.

शहरांतर्गत वाहतुकीचा चक्रव्यूह भेदण्यासाठी..
शहरी वाहतुकीसाठी पालिकेकडे केंद्रीय पातळीवरून येऊ घातलेली आर्थिक तरतूद माघारी जाण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून दिसू लागली आहे. बहुदा निवडणूक कार्यबाहुल्य, आचारसंहिता यामुळे यावर काही कार्यवाही झाली नसावी. मिडीयामुळे झालेले जनजागरण, लोकमताचा रेटा यामुळे देखील कदाचित पालिका ‘हेडलेस चिकन’ प्रमाणे निर्णय प्रक्रियेतच गटांगळ्या खात असावी. पण, असे हेलकावे खात बसण्यापेक्षा त्यासाठी काही ठोस पावले उचलणे अगत्याचे आहे.

मनसेचा आज मोर्चा
शहरातील ढासळती कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. गुंड टोळ्यांकरवी सिडको परिसरात झालेल्या वाहनांच्या जाळपोळीमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस वसंत गीते यांनी दिली. भालेकर मैदानावरून सकाळी साडेदहाला हा मोर्चा निघणार आहे.

वर्ष उलटूनही पूरग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित
नाशिक / प्रतिनिधी

वर्ष उलटूनही गोदावरीच्या पूरग्रस्तांना अद्याप शासकीय मदत मिळाली नसल्याची तक्रार शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष उल्हास सातभाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रकाद्वारे केली आहे.
गेल्यावर्षी गोदावरीला आलेल्या महापुराने सर्वत्र हाहाकार उडाला होता. अतिवृष्टीमुळे गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे नदीपात्रातील पाणी शहरभर पसरून नागरिकांची मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाली. या हानीचा पंचनामा झालेल्या सुमारे ९० आपद्ग्रस्तांना अग्रक्रमाने मदत मिळणे अपेक्षित असताना ती न मिळता नंतर घडलेल्या दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांना राजकीय वरदहस्तामुळे मदत दिली गेली. हे आपदग्रस्त मात्र वर्षभरापासून मदतीपासून वंचित आहेत. त्यांना त्वरित मदत मिळावी, अशी मागणी सातभाई यांनी केली आहे.

सेतू कार्यालयाचे कामकाज विभागवार करण्याची ग्वाही
नाशिक / प्रतिनिधी

दाखले घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू कार्यालयात जमलेल्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत काच लागून एक विद्यार्थी गंभीर जखमी झालेल्या प्रकरणाची मनसेने दखल घेतली असून सेतू कार्यालयाजवळ जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या शहर चिटणीस संतोष कोतवाल व विजय रणाते यांनी जाणून घेतल्या. विद्यार्थी व नागरिकांना दाखले प्रश्नप्त करण्यासाठी तासन्तास ताटकळत उभे रहावे लागत आहे. विद्यार्थी व नागरिकांना होणारा हा नाहक त्रास कमी करण्याच्या दृष्टीने सेतू कार्यालयातील कामकाज विभागानुसार करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे शहर चिटणीस संतोष कोतवाल, विभाग उपाध्यक्ष विजय रणाते, आकाश खोडे, संदीप गिते, विजय बोरसे आदींनी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नितीन महाजन यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत सेतू कार्यालयाचे कामकाज महापालिकेच्या प्रत्येक विभागीय कार्यालयात शाळा- महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर करण्याचे आश्वासन दिले.