Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

धुळे शहरातील वीज समस्यांवर तोडगा
विद्युत रोहित्र व उपकेंद्र उभारणार

वार्ताहर / धुळे

शहरासह परिसरात सतत भेडसावणाऱ्या वीज पुरवठय़ातील लहान- मोठय़ा तक्रारी टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षमतेची विद्युत रोहित्र आणि गरजेनुसार उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विजेचे दाबनियमन, तांत्रिक बिघाड आणि वीज टंचाईच्या तक्रारींची संख्या कमी होणार आहे. उर्जामत्री सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थित आ. राजवर्धन कदमबांडे यांनी धुळे शहर व परिसरातील विजेच्या समस्या, उपाय आणि पर्यायी व्यवस्था तसेच नवे उपकेंद्र, वीज रोहित्रांची गरज यावेळी व्यक्त केली.

मालमत्तेसाठी हत्या : सहा जणांना अटक
वार्ताहर / जळगाव

रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या फेब्रुवारी महिन्यात तापी नदीपात्रात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याबरोबर खूनाचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी कुटुंबातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. मालमत्तेसाठी कुटुंबियांनी हा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. निंभोरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत निंभोरासीम येथील तापी नदीच्या पात्रात १४ फेब्रुवारी रोजी गोणीत बांधलेला एक मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी तपासाला सुरूवात केली.

पतसंस्थांमधील ठेवी परत करण्यासाठी पॅकेज देण्याची मागणी
वार्ताहर / जळगाव

डबघाईस आलेल्या पतसंस्थांमधील ठेवीदारांची नाजुक आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून शासनाने त्यांच्यासाठी एक हजार कोटीचे पॅकेज द्यावे आणि हा पैसा जिल्हाधिकाऱ्यांकडून वाटप केला जावा, अशी मागणी ठेवीदार संघटनेने केली आहे. ठेवीदारांच्या ठेवी गायब करून संस्थेतील कागदपत्रे गायब करणाऱ्या पतसंस्थेच्या संचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. अलिकडेच पुणे येथे लाच घेताना पकडण्यात आलेले सहकार निबंधक त्रिभुवन यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी खान्देश ठेवीदार समितीने केली आहे.

जळगाव जिल्ह्य़ात रोजगार हमीच्या २६८७ कामांना मंजुरी
वार्ताहर / जळगाव

जिल्ह्य़ात रोजगार हमी योजनेच्या एकूण २६८७ कामांना मंजुरी देण्यात आली असून प्रत्यक्षात मात्र फक्त ७१ कामे सुरू झाल्याचे आढावा बैठकीत सांगण्यात आले. रोहयोच्या कामांसाठी मजुरांना पोस्टामार्फतच वेतन देण्याचा आदेश असल्याने जळगाव, भुसावळ व चाळीसगाव पोस्ट कार्यालयात एक कोटी ५० लाखाचा निधी जमा करण्यात आला आहे. जिल्ह्य़ातील रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मंजूर कामांपैकी प्रत्यक्षात मात्र फक्त ७१ कामे सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. जिल्ह्य़ात रोजगार हमीच्या एकूण कामांवर दोन लाख ६० हजार मजुरांना काम देण्याची क्षमता असली तरी फक्त ७१ कामे सुरू असल्याने तेथे फक्त ५३३ मजूर काम करीत असल्याची माहिती देण्यात आली. सुरू असलेल्या कामात जल संधारणची ३३, वनीकरणाची ३७ तर रस्ता काम एका ठिकाणी सुरू आहे. रोहयोच्या मजुरांना पोस्टामार्फत वेतन देण्याचे निर्देश असल्याने भुसावळ, जळगाव आणि चाळीसगाव पोस्टाच्या विभागीय कार्यालयात प्रत्येकी ५० लाख या प्रमाणे दीड कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्य़ात खरीप पीक पेरणीचे क्षेत्र निश्चित
धुळे / वार्ताहर

जिल्ह्य़ातील शेतकरीवर्ग खरीप हंगामाच्या तयारीस लागला असून खरीप हंगामासाठी २००९-१० च्या नियोजनानुसार सरासरी तीन लाख ६१ हजार ४०० हेक्टर क्षेत्र असून येत्या खरीप २००९ मध्ये तीन लाख ९३ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस. डी. मालपुरे यांनी दिली. खरीप क्षेत्रात तृणधान्य १ लाख ७० हजार १५० हेक्टर, कडधान्य ४५ हजार ४०० हेक्टर, गळीत धान्य ६४ हजार ९०० हेक्टर, कापूस एक लाख पाच हजार, ऊस आठ हजार हेक्टर याप्रमाणे समावेश आहे. धुळे जिल्ह्य़ातील पीक पेरा पुढीलप्रमाणे-धुळे तालुका ९९ हजार ८२५ हेक्टर, साक्री १ लाख आठ हजार ५७५ हेक्टर, शिंदखेडा १ लाख चार हजार ४२५ हेक्टर, शिरपूर ८० हजार ६२५ हेक्टर. तृणधान्यात भाताचे पाच हजार हेक्टर, ज्वारी २८ हजार हेक्टर, बाजरी ९५ हजार हेक्टर, मका ३७ हजार, नागली चार हजार हेक्टर, इतर तृणधान्यांचे ११०० हेक्टर, कडधान्यांमध्ये तूर १० हजार हेक्टर, मूग २१ हजार २०० हेक्टर, उडीद १० हजार २००, इतर कडधान्याचे क्षेत्र चार हजार हेक्टर आहे. इतर खरीप गळीतात भूईमूग ३७ हजार हेक्टर, तीळ सात हजार हेक्टर, सूर्यफुल ३०० हेक्टर, खुरसणी ३०० हेक्टर, सोयाबीन २० हजार हेक्टर, तेलबिया ३०० हेक्टर, तसेच कापूस १ लाख पाच हजार हेक्टर, ऊस आठ हजार हेक्टर.