Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आनंद सोहळय़ाला मतभेदांचे गालबोट!

 

कर्नाटकात लोकसभा निवडणुकीतील भाजपचे घवघवीत यश हे देशपातळीवर उठून दिसत असतानाच अलीकडेच म्हणजे १ जूनला राज्यातील सरकार स्थापनेचा पहिला वर्धापनदिन बंगलोरमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रदेश भाजपमधील मतभेदांचे प्रदर्शन झाले, कारण किमान चार महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री या आनंद सोहळय़ाला अनुपस्थित राहिले. त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. एखाद्या व्यक्तीला यश मिळू लागले, की त्याचे हितशत्रू राजकारणात नेहमीच वाढत जातात, तसेच मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या बाबतीत घडले आहे.मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर एवढा गाजावाजा करण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकाराबाबत म्हटले आहे. त्यांचे म्हणणे असे, की हा कार्यक्रम फक्त बंगलोर शाखेपुरताच मर्यादित होता व त्यामुळे हे मंत्री उपस्थित राहिले नाहीत, यात पराचा कावळा करण्यासारखे काही नाही. पण त्यांचे हे स्पष्टीकरण फारसे पटणारे नाही. कुठेतरी आग असल्याशिवाय धूर असत नाही, त्यामुळे राज्यातील भाजपत कुरबुरी सुरू आहेत हे स्पष्टच आहे. राज्य सरकारने प्रत्येक महसूल विभागात वर्षपूर्तीनिमित्त विकास संकल्प कार्यक्रम करण्याचे ठरविले आहे. बंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात ऊर्जामंत्री के. एस. ईश्वरप्पा, महसूलमंत्री जी. करुणाकर रेड्डी, त्यांचे बंधू पर्यटनमंत्री पी. जनार्दन रेड्डी व आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलु हे अनुपस्थित होते. यातील ईश्वरप्पा हे त्या दिवशी शिमोगा येथे एका वाढदिवस कार्यक्रमाला गेले होते त्यामुळे ते येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले. या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ मुरुगेश निरानी, आर. अशोक, के. सुब्रमण्यम नायडू, लक्ष्मण सावदी, बसवराज बोम्मई या मंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत येडीयुरप्पा यांची पाठराखण केली. त्याचबरोबर हकालपट्टी केलेले भाजप नेते बसवनगौडा पाटील यत्नाल यांच्यावर टीकेची झोड उठवली. यत्नाल यांनी याअगोदर येडीयुरप्पा यांच्या कार्यपद्धतीवर बरीच नाराजी व्यक्त केली होती. भाजपचे ११९ आमदार व १९ खासदार भक्कमपणे येडीयुरप्पा यांच्या पाठीशी आहेत, असे या चार मंत्र्यांनी सांगितले. यत्नाल हे भाजप सरकार पडण्याची दिवास्वप्ने पाहत आहेत, अशी कडवट टीकाही त्यांनी केली. या सगळ्याची सुरूवात ऊर्जा मंत्री के.एस ईश्वरप्पा यांनी भाजपतही घराणेशाही सुरू झाल्याचा आरोप केल्यामुळे झाली. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे पुत्र बी.वाय राघवेंद्र(शिमोगा), बांधकाम मंत्री सी.एस.उदासी यांचे पुत्र शिवकुमार (हावेरी), आरोग्य मंत्री बी.श्रीरामुलु यांची बहीण जे.शांता (बेलरी) यांना लोकसभेसाठी उमेदवारी देऊन पक्षाने घराणेशाहीचे दर्शन घडवले असे त्यांचे म्हणणे आहे. पक्षाने दारू व पैसा वाटून लोकसभा निवडणुकीत यश मिळवले असा आरोप ईश्वरप्पा यांनी केला असून त्याच्या आधारे काँग्रेसने मुख्यमंत्री येडीयुरप्पा व ईश्वरप्पा यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे.

बंगलोर हिट लिस्टवर
दिल्लीत अलीकडेच पकडण्यात आलेला लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी महंमद ओमर मदनी याने जाबजबाबात जी माहिती दिली, त्यानुसार त्यांनी देशात अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट आखला होता. बंगलोरही दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आहे, अशी गुप्तचरांची माहिती आहे. यापूर्वी बंगलोरमध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसमध्ये २८ डिसेंबर २००५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता, त्या वेळी आयआयटीचे प्राध्यापक एम. सी. पुरी मारले गेले होते व इतर चारजण जखमी झाले होते, तेव्हापासून बंगलोरला असलेला धोका अधिक स्पष्टपणे दिसून आला होता. त्या हल्ल्यातील एक आरोपी सबाहउद्दीन याला उत्तर प्रदेश पोलिसांनी पकडले होते. त्याने त्याच्या जबाबात अशी माहिती दिली होती, की अबू हारून हा मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. लष्कर-ए-तय्यबाचा प्रमुख हाफीझ महंमद सईद याने अबू हारून, सबाहउद्दीन, मदनी व सर्फराज नवाझ यांच्या मदतीने बंगलोर व राज्यात इतरत्र हल्ले करण्याचे जे कट आखले त्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न कर्नाटक पोलीस करीत आहेत. सबाहउद्दीन व अबू हमझा यांचा बंगलोरमध्ये झालेल्या २००५ मधील दहशतवादी हल्ल्यात थेट संबंध होता. मदनी याने दिल्ली पोलिसांना जी माहिती दिली, त्यावरून त्याचे अबू हमझा, सबाहउद्दीन व फहीम अन्सारी यांच्याशी संबंध होते. मुंबईतील २६/११च्या हल्ल्यांपूर्वी सीएसटी व ताज हॉटेलची पाहणी फहीम अन्सारी व सबाहउद्दीन यांनी केली होती. यातील सबाहउद्दीन व मदनी हे दोघे बिहारचे असून अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे पदवीधर आहेत. आता कर्नाटक पोलिसांचे पथकही मदनीचा जाबजबाब घेणार असून, त्यात अधिक माहिती हाती येण्याची शक्यता आहे.

राज्यात पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे किमान सहा मंत्र्यांची हकालपट्टी करून मंत्रिमंडळाचा नव्याने विस्तार केला जाईल, अशी चर्चा असली तरी एवढे मोठे पाऊल मुख्यमंत्री येडीयुरप्पा लगेच उचलतील असे वाटत नाही. कारण सध्या त्यांची भूमिका ही दिलजमाईचीच आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली असली तरी येडीयुरप्पा यांनी जराही विचलित न होता विकासकामांच्या संदर्भात सिद्धरामय्या यांच्या काही सूचना असतील तर त्यांचाही जरूर विचार केला जाईल असे म्हटले आहे. विकासकामांवर भर देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार असून दर शंभर दिवसांनी राज्य सरकारच्या कामांचा आढावा जनतेसमोर मांडण्याची घोषणा त्यांनी केली आहे. जागतिक मंदीचा फटका राज्याला बसला असून विकासाचा दरही कमी झाला आहे, त्यामुळे केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यासाठी राज्यातील २८ खासदारांची बैठकही ते घेणार आहेत. पावसाळा संपल्यानंतर जागतिक गुंतवणूकदारांची एक परिषद घेण्याचाही त्यांचा विचार आहे. कन्नड भाषेला केंद्र सरकारने विशिष्ट दर्जा दिल्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी उत्तर कर्नाटकातील बेळगाव येथे जागतिक कन्नड परिषद या वर्षी घेण्यात येणार आहे.
राजेंद्र येवलेकर