Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भडक चित्रपट निर्मितीच्या देशी

 

आंध्र आणि तामिळनाडू येथील सिनेमा साठ आणि सत्तरच्या दशकात भडक आणि खोटय़ा चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात अग्रेसर होता. प्रचंड प्रेक्षकवर्ग, हिंदी नटांप्रमाणे ग्लॅमर असलेले तारे तारका, चित्रपटांचा अफाट धंदा असलेल्या या दोन प्रांतात फिल्म सोसायटी चळवळ रुजणे हेच मुळात अवघड काम होते.आश्चर्य म्हणजे तामिळनाडूत ‘मद्रास फिल्म सोसायटी’ १९५७ मध्ये म्हणजे फेडरेशनची स्थापना होण्याआधी सुरू झाली. ५०/५२ वर्षे उलटली तरी आजही ती चालू आहे. तामिळनाडूतील आद्य फिल्म सोसायटी असूनही मद्रास फिल्म सोसायटीने फिल्म सोसायटी चळवळ सामान्य माणसांपर्यंत नेण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. दुसरी सोसायटी ‘रसना’ १९६४ मध्ये सुरू झाली. परंतु पुढची १० वर्षे फारशा सोसायटय़ा निर्माण झाल्याच नाहीत. १९७४ मध्ये चित्रपटसृष्टीशी संबंधित एस. व्ही. वेंकटरामन यांनी ‘चित्रदर्शन’ सुरू केली. १९८० मध्ये म्हणजे देशभर फिल्म सोसायटी चळवळ ऐन भरात असताना तामिळनाडूत अवघ्या १०/१२ फिल्म सोसायटय़ा होत्या. सध्या २० फिल्म सोसायटय़ा आहेत.
आंध्रमध्ये पहिली सोसायटी १९६५ मध्ये आर. आर. एल. फिल्म सोसायटी स्थापन झाली. पण त्याच्याही आधी श्याम बेनेगल हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठात शिकत होते तेव्हा तेथे त्यांनी फिल्म सोसायटी ५० च्या दशकात सुरू केली पण ती अल्पजीवी ठरली. आर. आर. एल. फिल्म सोसायटी लौकरच बंद पडली. त्या फिल्म सोसायटीच्या सदस्य असलेल्या फिलीप या चित्रपटवेडय़ा गृहस्थाने १९७४ मध्ये हैद्राबाद फिल्म क्लब सुरू केला. हा क्लब त्याच जोमाने आजही सुरू आहे. आंध्र प्रदेशभर फिल्म सोसायटी चळवळ नेण्यासाठी फिलीपने सातत्याने प्रयत्न केले. विजयवाडा फिल्म सोसायटी, देवरायलू यांनी सुरू केली. विशाखापट्टणम, करीमनगर, वारंगल, नेल्लोर, मच्छलीपट्टनम् गुंटुर, तिरुपती अशा अनेक शहरातून फिल्म क्लब सुरू झाल्या आणि नंतर रंगीत टेलिव्हिजनच्या आक्रमणांत बंद पडल्या.
सध्या आंध्रप्रदेशमध्ये १४/१५ फिल्म सोसायटय़ा आहेत. हैद्राबाद फिल्म क्लबखेरीज करीमनगर येथे वरला आनंद फिल्म सोसायटी चालवीत आहे. बंगलोरच्या ‘सुचित्रा’ने जसे स्वत:चे आर्ट थिएटर बांधले त्याप्रमाणे करीमनगर फिल्म सोसायटीने ‘फिल्म भवन’ बांधले आहे. आजच्या राजकीय भाषेत बोलायचे तर तेलंगणातील ‘करीमनगर’ ही सर्वात महत्त्वाची फिल्म सोसायटी आहे. चित्रपट दाखविण्याबरोबरच चित्रपट रसग्रहण शिबीर, चर्चासत्रे दिग्दर्शकांशी चर्चा अशा विविध उपक्रमांनी करीमनगरचे वर्षांचे वेळापत्रक भरगच्च भरलेले असते.
फिल्म सोसायटी चळवळीतून तामिळनाडूत एकही दिग्दर्शक तयार होऊ शकला नाही. पण आंध्रमध्ये मात्र बी. नरसिंग राव यांचा ‘दासी’ हा तेलगू चित्रपट गाजला. ‘दासी’चे पटकथा लेखक के. एन. टी. शास्त्री यांनीही आणखी २/३ चित्रपट काढले. बंगाल आणि केरळमध्ये समांतर सिनेमा निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकांची जशी साखळी निर्माण झाली तशी येथे तयार झाली नाही. अजूनही तेलगू तामीळ सिनेमात भडक मेलोड्रामा आणि नृत्य-गीत-फाइटस हा फॉम्र्युला लोकप्रिय आहे. फिल्म सोसायटी चळवळीचा प्रभाव सिनेमा निर्मितीवर जाणवत नाही. मधल्या काळात तामीळमध्ये स्टारऐवजी दिग्दर्शकाच्या नावावर चित्रपटांना प्रेक्षक येऊ लागला. एवढाच काय तो फरक झाला आहे. प्रेक्षकांच्या या भाबडय़ा सिनेमा प्रेमामुळे एन. टी. रामाराव, एस. जी. रामचंद्र, जयललिता यांनी राजकारणात धुडगूस घातला आणि आता तेलगू स्टार चिरंजीवीही विधानसभेत पोचला आहे. सिनेमा आणि राजकारण यांचे हे समीकरण आंध्र व तामीळनाडू वगळता देशात अन्यत्र कोठेही नाही.
सुधीर नांदगांवकर,
फेडरेशनचे केंद्रीय सचिव
cinesudhir@gmail.com