Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भव्य उड्डाणे आणि क्रॅश लँडिंगही..

 

एकीकडे जेव्हा सूर्यास्त होत असतो, तेव्हा दुसरीकडे सूर्योदयासोबत उषेचे नवे रंग उमलत असतात. केवळ आपल्या चिमुकल्या भवतालाचाच विचार करताना जागतिक भान नसले की याची जाणीव नसते. विकासाच्या बाबतीत नेमके हेच वारंवार पाहायला मिळते. विकासाकडे पश्चिम क्षितिजावरून पाहणाऱ्याची दृष्टी वेगळी असते आणि उगवत्या नव्या आशांचे धुमारे बघणाऱ्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मुंबईलगत नियोजनपूर्वक उभारण्यात आलेल्या नवी मुंबईतील विकास प्रकल्पांच्या बाबतीत नेमके हेच चित्र अधोरेखित होत आहे.
नवी मुंबईच कशाला, एमएमआरडीएच्या कार्यकक्षेत येणाऱ्या नवीन पनवेलपर्यंतच्या पट्टय़ातही दृष्टिकोनातील फरकातून निर्माण होणाऱ्या संघर्षांचे दर्शन घडू लागले आहे. एकीकडे पाणी, वीज, कचरा, डम्पिंग, मलनिस्सारण असे सुविधांचे प्रश्न, तर दुसरीकडे रस्ते, रेल्वे, सागरी वाहतूक असे पायाभूत परिवहनविषयक प्रश्न सतावत आहेत. त्याच्या जोडीला गावठाणातील मूळचे आणि गगनचुंबी टॉवरमधील उपरे हा सुप्त संघर्ष अजून पुरता मोडीत निघालेला नाही. या मानसिक घालमेलीतून होत असलेल्या सामाजिक घर्षणाकडे फारसे गांभीर्याने पाहण्याची गरज संबंधितांना वाटत नाही. या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई आणि लगतच्या टापूत आकाशाला गवसणी घालणारे अनेक प्रकल्प नियोजनाच्या पातळीवर आहेत. त्याचवेळी अनेक प्रकल्पांना विस्थापन आणि पुनर्वसन या मुद्दय़ांवरून प्राथमिक पातळीवरच विरोध होत आहे. सेझची घोषणा झाल्यानंतर शेतकरी आणि सेझची निर्मिती करू पाहणाऱ्या कंपन्या यांच्यातील पराकोटीच्या संघर्षांचा अनुभव या टापूने घेतला आहे. सेझला शेतकऱ्यांनी जमिनी द्याव्यात की देऊ नयेत हा प्रश्न तसा गुंतागुंतीचाच. पण या प्रश्नाला मिळत असलेले अनेक आयाम थक्क करणारे आहेत. मध्यंतरी सामाजिक न्यायाचा कट्टर पुरस्कर्ता समजल्या जाणाऱ्या एका नेत्याने शेतकऱ्यांनी सेझला जमिनी न देण्याचे आवाहन केले होते. ते करताना त्यांनी घेतलेला आधार मोठा आकर्षक होता. त्यांच्या मते भविष्यात शेतकऱ्यांच्या जमिनीला एकरी ५०० कोटी रुपयांचा भाव मिळू शकणार आहे. त्यामुळे आताच सेझला जमीन देण्याची घाई कशाला करायची? शेतकऱ्यांच्या जमिनीला इतका अफाट मोबदला मिळणार असेल, तर आनंदच आहे. पण या भविष्यवाणीवर विश्वास ठेवून एकाही शेतकऱ्याने आपली जमीन कुठल्याही प्रकल्पाला दिली नाही, तर या टापूतील विकासाच्या उड्डाणांचे काय होणार?
विकास आणि अस्तित्वाच्या या लढाईतील आणखी एक ताजा नमुना पुरेसा बोलका आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने विशेष रेल्वे परियोजनेची आखणी केली आहे. याअंतर्गत पनवेल ते दिल्ली अशी मालवाहतूक रेल्वे सेवा प्रस्तावित करण्यात आली आहे. अर्थात या नव्या रेल्वेमार्गाची उभारणी करायची झाल्यास कित्येक ठिकाणची शेतजमीन अधिग्रहित करावी लागेल. पनवेल तालुक्यातील काही गावांमधील जमिनीचाही त्यात समावेश राहील. विचुंबे, उंबर्ली, कोप्रोली, नेरेपाडा, खानाव, वाकडी, महालुंगी, चोरमे अशा अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पारंपरिक चरितार्थाच्या साधनावर या प्रकल्पामुळे गदा येणार आहे. याच मुद्दय़ावर पनवेल, दिल्ली मालवाहतूक रेल्वे प्रकल्पाला प्राणपणाने विरोध करण्यासाठी शेकापच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने शेकापच्या नेत्यांनी संबंधित गावांमध्ये बैठका घेण्याचा कार्यक्रमही आखला आहे. वस्तुत: प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने झाले पाहिजे आणि ते प्रकल्प पूर्ण होण्याच्या आत मार्गी लागले पाहिजे अशी अपेक्षा ठेवण्यात काहीही गैर नाही. पुनर्वसनाच्या बाबतीतील पूर्वानुभव लक्षात घेता अशी खबरदारी घेण्यातच शहाणपण आहे. अर्थात या मुद्दय़ावर कोणीही इंचभरही जमीन कुठल्याच प्रकल्पासाठी देणार नाही, अशी परिस्थिती उद्भवली तर पायाभूत प्रकल्प उभे राहणार तरी कसे?
शिवडी-न्हावाशेवा सी लिंकचे स्वप्न दृष्टिपथात आल्यानंतर नवी मुंबई, पनवेल या टापूतील विकासाच्या आराखडय़ांनी वेग घेतला आहे. नवी मुंबईतच उलवे भागात उभ्या राहणाऱ्या विमानतळाच्या अनुषंगाने तीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांची घोषणा सिडकोने नुकतीच केली आहे. दरम्यान, ठाणे- नेरूळ- उरण या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याची योजना सिडकोला गुंडाळावी लागली आहे. अर्थात याच मार्गावर मेट्रोऐवजी पारंपरिक पद्धतीने उपनगरी रेल्वेसेवा चालवावी या निष्कर्षांप्रत सिडकोची गाडी आली आहे. निदान या प्रकल्पांना तरी विरोध करण्याची भाषा अद्याप कुणी केलेली नाही. प्रश्न इतकाच आहे, एकीकडे विमानतळाच्या भोवती आंतरराष्ट्रीय दर्जाची पायाभूत परिवहन सेवा देण्याच्या स्वप्नांची उड्डाणे आणि दुसरीकडे महाराष्ट्राला मिळू शकणाऱ्या एका नव्या मालवाहतूक रेल्वेमार्गाला सुरू झालेल्या तीव्र विरोधाचे क्रॅश लँडिंग अशा परस्परविरोधी कात्रीत विकासाची कुतरओढ अटळ आहे.
चंद्रशेखर कुलकर्णी
ckvgk@yahoo.co.in