Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

मेट्रो प्रकल्पाच्या डेपोसाठी लागणाऱ्या जागेबद्दल पेच
सुनील माळी
पुणे, १२ जून

पुण्यातील नियोजित मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पातील वनाज-रामवाडी या मार्गाच्या डेपोसाठी जुन्या कोथरूड कचरा डेपोची जागा लागणार असून त्याच जागी महापालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात शिवसृष्टीची योजना आखण्यात आल्याने पेच निर्माण झाला आहे. या दोन्ही योजना कशा राबविता येतील, याबाबत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा तांत्रिक सल्ला महापालिका घेणार असल्याचे समजते.

पिंपरीत आयुक्तांच्या वाटाघाटींमुळे वाचणार ५० लाख रुपये
‘मलई’ गेल्यामुळे शिक्षण मंडळ सदस्यांचा तिळपापड
पिंपरी, १२ जून / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी ठेकेदारांशी वाटाघाटी करून जादा दराच्या निविदांमध्ये घासाघीस केल्याने शिक्षण मंडळाच्या साहित्य खरेदीत तब्बल ५० लाख रुपयांची बचत होणार आहे. दरम्यान, या वाटाघाटीत शिक्षण मंडळाच्या सदस्यांची ‘मलई’ गेल्यामुळे त्यांचा तिळपापड झाला असून कोणत्याही परिस्थितीत हा विषय मंजूर करायचा नाही ,असा निर्धार मंडळ सदस्यांनी केला आहे.

‘डबेवालेकाकां’वरच आता वेळ उपासमारीची!
पुणे, १२ जून/खास प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या ‘डबेवालेकाकां’वर येत्या सोमवारपासून ‘लाल फुली’ मारण्याचा निर्णय लष्कर परिसरातील ख्यातनाम सेंट मेरीज प्रशालेने घेतला आहे. त्यामुळेच तीन दशकांहून अधिक काळ शालेय विद्यार्थ्यांना घरच्या गरमागरम जेवणाची मेजवानी देणाऱ्या या ‘डबेवालेकाकां’ंवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.

उजनीकाठचे पाहुणे पक्षी सांगतात ‘मॉन्सून’चा अंदाज
तानाजी काळे
इंदापूर, १२ जून

देशाच्या हवामान खात्याच्या अभ्यासानुसार हे खाते देशातील पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवते. शेतकरीही आपल्या प्रदीर्घ अनुभवाने व हवामानातील बदलानुसार व त्याच्या निरीक्षणानुसार पावसाचे गणित आखीत असतो. काही ठिकाणी ग्रामीण भागात अंगात येणाऱ्यांकडूनही पावसाबाबत भाकित जाणून घेण्यास शेतकऱ्यांनाही रस असतो. भाकिताबाबत उत्सुकता असते. कधी एखादा जाणकार वाटसरूही चालता-चालता पावसाचे भाकित करून जातो. परंतु उजनी काठी मात्र हिवाळ्यात आलेले रोहित, चित्रबलाक हे पक्षी स्थलांतराच्या वेळी ‘मॉन्सून’चे अचूक भाकित गेली १५-२० वर्षे सांगत आहेत.

फेरफाराच्या नोंदीसाठी जिल्ह्य़ात धडक कार्यक्रम
पुणे, १२ जून / खास प्रतिनिधी
खरेदीखत, वारस नोंदणी तसेच मालमत्तेचे वाटप इत्यादी प्रकारच्या फेरफाराच्या नोंदीसाठी जिल्ह्य़ात धडक कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याद्वारे आगामी दोन महिन्यांत सर्वप्रकारच्या थकीत नोंदी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अमली पदार्थ विकणाऱ्या दोन तरुणांना अटक
पुणे, १२ जून / प्रतिनिधी

राजस्थानमधून अमली पदार्थ आणून त्यांची पुण्यामध्ये विक्री करणाऱ्या दोन तरुणांना पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन किलो चाळीस ग्रॅम अफिम पोलिसांनी जप्त केले. येरवडय़ातील डेक्कन महाविद्यालय रस्त्यावर काल सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. रमेशकुमार श्रीरामकरन लखेश्वर (वय २९) आणि किशनलाल श्रीरामकरन लखेश्वर (वय २४, दोघे रा. दीपचंद हलवाई गल्ली, मु.पो. संगरिया, जि. हनुमानगड, राजस्थान) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
पार्किंगची जागा ‘मोफत’च
पिंपरी महापालिका आयुक्तांचेही आदेश
पिंपरी १३ जून / प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे आता ग्राहकांना मोफत पार्किंग पुरविण्याची बंधने सर्व बांधकाम व्यावसायिकांवर असणार आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी गुरुवारी त्याबद्दलचे आदेश जारी करुन ‘विकास नियंत्रण नियमावलीनुसार इमारतीमध्ये पुरविण्यात आलेले पार्किंगचे क्षेत्र हे गाळेधारकांसाठी विनामोबदला उपलब्ध करुन देणे विकासकावर बंधनकारक राहील’,असे बजावले आहे.

..कचऱ्याचे ढीग, तुंबलेली गटारे पाहून आयुक्त संतापले!
अधिकाऱ्यांची झाडाझडती; आरोग्य निरीक्षक निलंबित
पिपरी, १२ जून / प्रतिनिधी

पिपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शर्मा यांनी कोणासही कळू न देता देहूरोडलगत किवळे, विकासनगर, मामुर्डी परिसरास अचानक भेट दिली. तेथील अस्वच्छता, कचऱ्यांचे ढीग, तुंबलेली गटारे, गैरहजर कर्मचारी आणि हजेरीपत्रकावरील बोगस नोंदी पाहून ते प्रचंड संतापले. आरोग्य विभागाच्या कामाची झाडाझडती घेत त्यांनी आरोग्य निरीक्षकास निलंबित करण्याचे आदेश प्रशासनास दिले.

आयुर्वेदमहर्षी- डॉ. पां. ह. कुलकर्णी
‘‘आयु:वेद, अर्थात आयुर्वेद, म्हणजे आयुष्याचा वेद. आयुर्वेदाचं खरं काम म्हणजे आरोग्याचं रक्षण करणं, आजार झाल्यानंतर औषध देणे हा आयुर्वेदाचा एक भाग आहे. पण केवळ औषध देणे हे आयुर्वेदाला मान्य नाही. शरीराबरोबर मनाचीही शुद्धी करणे, आयुर्वेदामध्ये अभिप्रेत आहे.’’ आयुर्वेदाचा जगभर प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. पां. ह. कुलकर्णी सांगत होते. त्यांनी सुरू केलेल्या ‘दीर्घायू इंटरनॅशनल’ या आयुर्वेद - आरोग्य त्रमासिकाला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत.

‘दीर्घायू ’ च्या रौप्यमहोत्सवानिमित्त विविध पारितोषिकांचे वितरण
पुणे, १२ जून / प्रतिनिधी
दीर्घायू इंटरनॅशनल या आयुर्वेद-आरोग्य त्रमासिकाच्या रौप्यमहोत्सवी आणि तीन दशकपूर्ती निमित्त पुरस्कार, तसेच विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.डॉ. अतुल राक्षे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यामध्ये ‘दीर्घायू जागरुक वाचक दोन दशके पुरस्कार, आयुर्वेद, आरोग्य ग्रंथ पारितोषिके, आयुर्वेद संशोधकांना सुवर्णपदक प्रदान, परदेशात आयुर्वेद प्रचारक डॉक्टर स्त्रियांचा सत्कार, तसेच आयुर्वेद शिक्षणमालेतील लेखकांचा सत्कार यांचा समावेश करण्यात आला आहे. हा समारंभ १४ जून रोजी पद्मजी सभागृह, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रस्ता येथे दुपारी ४.४५ ते सायं. ६.४५ या वेळेत होणार आहे.

शिकाऊ वाहन परवाना दोन्ही कार्यालयात मिळणार
पुणे, १२ जून/प्रतिनिधी
प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शिकाऊ वाहन परवाना संगणकीकृत चाचणी आळंदी रस्ता व संगम पुल या दोन्ही कार्यालयामध्ये घेण्यात येणार आहे. शिकाऊ आणि पक्का वाहन परवाना चाचणी एकाच ठिकाणी आळंदी येथे होणार आहे.या उपक्रमाचे उद्घाटन येत्या १४ जून रोजी सकाळी ९.३० वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त दिलीप बंड तसेच परिवहन आयुक्त उपस्थित राहणार आहेत.आतापर्यंत शिकाऊ वाहन परवाना चाचणी तसेच शिकाऊ वाहन परवाना देण्याचे काम विभागाच्या संगम पुलाजवळील कार्यालयात करण्यात येते होते. हा प्रकल्प सुट्टीच्या दिवशी व दर रविवारी सकाळी १० ते २.३० वाजेपर्यंत राबविला जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविली आहे.

‘सावळे परब्रह्म’ चे १६ जूनला प्रकाशन
पुणे, १२ जून / प्रतिनिधी
‘सावळे परब्रह्म’ या ज्ञानेश्वरांच्या अभंगांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन येत्या १६ जून रोजी सायं. ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात होणार आहे, अशी माहिती राहुल धोंगडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या ध्वनिफितीची मूळ संकल्पना राहुल धोंगडे यांची असून राहुल घोरपडे यांनी हे अभंग संगीतबद्ध केले आहेत. सुरेश वाडकर यांनी हे अभंग स्वरबद्ध केले आहेत. या ध्वनिफितीचे प्रकाशन इंडियन ओव्हरसीज बँकेचे अध्यक्ष सुहास भट व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम व्हिडिओकॉन समूहाने प्रस्तुत केला आहे, अशी माहिती धोंगडे यांनी दिली.

शिवानंद हुल्याळकर यांना शिवरत्न पुरस्कार
पुणे, १२ जून / प्रतिनिधी
उपेक्षीत दलित पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन सुसगोहेर यांनी शिवानंद हुल्याळकर यांना शिवरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. हुल्याळकर सध्या सेंट्रल पॉवर लूम (दिल्ली) च्या उपाध्यक्षपदी काम करीत आहेत. या आधी राजीव गांधी युवारत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत .