Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

राज्य

मान्सूनचे पुनरागमन : पाच ते पंधरा दिवसांची प्रतीक्षा!
पुणे, १२ जून / खास प्रतिनिधी

महाराष्ट्रात नियोजित वेळेवर (७ जून) दाखल झाल्यानंतर मान्सूनने आता दडी मारली असून, त्याच्या पुनरागमनासाठी आणखी कमीत कमी पाच दिवसांचा आणि जास्तीत जास्त पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मान्सूनचे वर्तन पाहता त्याच्या आगमनातील अनिश्चितता नेहमीचीच असल्याचे भारतीय हवामान विभागातर्फे आज जाहीर करण्यात आले. १९७४ साली तो २८ जून रोजी, तर १९८१ साली २१ जून रोजी पुण्यात दाखल झाला होता.

सरकारी खात्यांमधील समन्वयाचा अभाव वन विभागाच्या मुळावर
अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी, १२ जून

महसूल आणि वन विभागामध्ये समन्वय नसल्याने वनसंज्ञेखालील वृक्षतोडीला आळा बसला नाही, तसेच मायनिंगसाठी अनेक जमिनींचा खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, उपवनसंरक्षक नरेश झुरमुरे यांच्याशी संपर्क साधला असता वन कायदा भंग करणारे सुटणार नाहीत, असा त्यांनी निर्वाळा दिला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या १३ अभियंत्यांवर वन कायदा भंगाची कारवाई करावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याचे झुरमुरे यांनी सांगितले.

नाशिकमधील गुंडगिरीविरूध्द पोलिसांची कारवाई
मनसेचे सुहास कांदे, समता परिषदेचे कैलास मुदलीयार, रिपाइंचे भूषण लोंढे यांना हद्दपारीची नोटीस
नाशिक, १२ जून / प्रतिनिधी
एकाचवेळी ४० वाहनांची होळी करून नाशिकमधील गुंडाराजने गाठलेला कळस लक्षात घेत खडबडून जाग आलेल्या पोलीस यंत्रणेने मनसेचे सुहास कांदे व अर्जुन पगारे, समता परिषदेचा पदाधिकारी कैलास मुदलीयार, रिपाइंचे भूषण लोंढे या राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह एकूण ३० गुंडावर हद्दपारीची नोटीस बजावली आहे. महत्वाची बाब म्हणजे, काही राजकीय पदाधिकाऱ्यांवर यापूर्वीही अशा नोटीसा बजावण्यात आल्या असल्या तरी राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई मूर्त स्वरूपात येऊ शकली नसल्याचे सांगितले जाते.

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाचीही खर्चाची तरतूद- नाईक
धुळे, १२ जून / वार्ताहर

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने विधीमंडळाच्या अधिवेशनात सुमारे ५३ कोटी रुपयांची भरीव तरतूद तर यासह राज्यातील अन्य तीन रेल्वेमार्गांसाठी १९६.०१ कोटीचा नियतव्यय मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी दिली आहे. आ. राजवर्धन कदमबांडे यांना अशा माहितीचे पत्र नाईक यांनी दिले आहे.

द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटल्याने दीड तास वाहतूक कोंडी
लोणावळा, १२ जून / वार्ताहर

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कंटेनरने धडक दिल्याने एल. पी. गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. टँकर पलटल्याने सूक्ष्म गळती झाली होती. प्रसंगावधान राखत तत्काळ गळतीच्या ठिकाणी वडगाव पोलिसांनी खुंटी ठोकल्याने मोठी दुर्घटना टळली.मुंबईहून पुण्याकडे गॅस घेऊन जाणारा एल.पी.जी. कंपनीचा टँकर (एम.एच ०४, बी.ओ. ६५०६) यास त्याच दिशेने जाणारा कंटेनर (आर. जे. १४, जी. बी. ५३४९) याने जोरदार धडक दिल्याने गॅस टँकर उलटला. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास कि.मी. ७३ जवळ ही घटना घडली. अपघातात गॅस टँकर चालक किरकोळ जखमी झाला असून खासगी रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे सुरक्षिततेकरिता काही काळ वाहतूक बंद ठेवून नंतर तिसऱ्या लेनवरून वाहतूक वळवण्यात आल्याचे वडगाव पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी वडगाव मावळचे पो. नि. एम. व्ही. इंगवले तपास करत आहेत.

नाशिकमध्ये उद्या अ‍ॅड. रावसाहेब शिंदेंच्या पुस्तकाचे प्रकाशन
नाशिक, १२ जून / प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. रावसाहेब शिंदे यांच्या ‘प्रश्न आहे मूल्यांचा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १४ जून रोजी येथील परशुराम साईखेडकर नाटय़गृहात सायंकाळी साडेचारला होणार आहे. कृषी व जलसंधारण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व ‘लोकसत्ता’ पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास आ. डॉ. वसंत पवार, डॉ. मो. स. गोसावी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अ‍ॅड. शिंदे यांची शिक्षण आणि समाज, चारित्र्य आणि चरित्र, भावलेली माणसे, ही वैचारिक व ललित लेखनाची पुस्तके प्रकाशित असून ‘ध्यासपर्व’ हे आत्मकथन लक्षवेधी ठरले आहे. सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील अ‍ॅड. शिंदे यांच्या पुस्तकांची प्रकाशने यापूर्वी श्रीरामपूर, पुणे, दिल्ली आदी ठिकाणी झाली आहेत. अमेय प्रकाशनच्या वतीने होणाऱ्या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, प्रकाशक उल्हास लाटकर यांनी केले आहे.