Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

अखेर धोनीची प्रसारमाध्यमांशी दिलजमाई
लंडन, १२ जून / पी. टी. आय.

प्रसारमाध्यमांनी ‘कॅप्टन कूल’ अशी बिरुदावली दिलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दोन वर्षांत बराच बदलला आहे. स्वत: धोनीनेही त्याची कबुली दिली आहे. त्याच्यामते तोदेखील एक माणूसच असून, बदलणे हा जीवनाचाच एक भाग आहे. माझ्यातही गुणदोष आहेत; पण कुणाच्याही सूचनांचे मी नेहमीच स्वागत करीन, असे धोनीने म्हटले आहे.

आफ्रिकेचा इंग्लंडवर सहज विजय
पार्नेल आणि कॅलिस चमकले

नॉटिंगहॅम, १२ जून/ पीटीआय
युवा वेगवान गोलंदाज वेन पार्नेल आणि सलामीवीर जॅक कॅलिस यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर ७ विकेट्सने सहज विजय साकारला. वेगवान गोलंदाज पार्नेलने इंग्लंडच्या तीन विकेट्स घेतल्या. तर जॅक कॅलिसने ४९ चेंडूत ५७ धावांची खेळी साकारून दक्षिण आफ्रिकेला ‘सुपर एट’ फेरीतील पहिला विजय मिळवून दिला. अर्धशतक आणि दोन विकेट्स घेणाऱ्या कॅलिसला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

मी सर्वसामान्य गोलंदाज पण काळीज मात्र सिंहाचे -हरभजन
लंडन, १२ जून / पीटीआय

त्याच्या फिरकी गोलंदाजीने जगभरातील कितीतरी फलंदाजांना ‘मामा’ बनविले आहे, तसेच भारतीय संघासाठी कित्येक लढती जिंकून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र तरीही आपण एक सर्वसामान्य गोलंदाज आहोत, असे हरभजन सिंग विनयाने म्हणतो. २००२ मध्ये स्टीव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन करून त्याने सर्वप्रथम क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. मात्र आपल्या त्या कामगिरीतही विशेष काही नव्हते, तर संघाच्या गरजेप्रमाणे गोलंदाजी करणे हेच आपले धोरण होते.

सचिनचा पीटरसनला कानमंत्र
लंडन, १२ जून / पीटीआय

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासाठी कोटय़वधी चाहत्यांच्या अपेक्षांचे प्रचंड दडपण ही बाब फारशी नवीन नाही. हीच गोष्ट अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडचा स्फोटक फलंदाज केविन पीटरसन याच्याही बाबतीत घडेल, असे त्याला वाटते आहे. त्यामुळेच पीटरसनने फलंदाजीला मैदानात उतरताना देशवासीयांच्या अपेक्षांचा अजिबात विचार करू नये, असा सल्ला सचिनने दिला आहे. त्यानेच नव्हे तर इंग्लंडच्या सर्वच फलंदाजांनी बिनधास्त फलंदाजी करावी, असे त्याने म्हटले आहे.

आयपीएलच्या अनुभवाचा उपयोग होईल- कार्तिक
चेन्नई, १२ जून/ वृत्तसंस्था

ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील अनुभवाचा आपण उपयोग करू, असे भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेशकार्तिक याने म्हटले आहे. जखमी वीरेंद्र सेहवागऐवजी दिनेश कार्तिक याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंड -पाकिस्तान आज आमने सामने
लंडन, १२ जून/ पीटीआय

साखळी सामन्यात प्रत्येकी एक सामना जिंकून ‘सुपर एट’ फेरीत पोहोचलेले, पण उपान्त्य फेरीत पोहोचण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ उद्या आमने सामने येतील. ‘सुपर एट’ फेरीतील ‘एफ’ गटात आर्यलडसारखा दुबळा संघ आहे. त्यामुळे आर्यलडला पराभूत केल्यास उपान्त्य फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना अजुन एक विजय मिळवायचा असल्याने दोन्हीही संघांसाठी उद्याचा सामना महत्वाचा असेल.

सिंगापूर बॅडमिंटन : सायना, श्रीधर यांचे आव्हान संपुष्टात
नवी दिल्ली, १२ जून / पीटीआय

भारताच्या सायना नेहवाल व अनुप श्रीधर यांना सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. सहाव्या मानांकित सायनास चीनच्या वॉंग लिन हिने १९-२१, २१-१९, २१-१४ असे पराभूत केले. पुरुष गटात थायलंडच्या बुनसाक पोन्साना याने श्रीधरची अनपेक्षित विजयाची मालिका आज २१-११, २१-८ अशी खंडित केली.

श्रीलंकेचा पाकिस्तानवर १९ धावांनी विजय
तिलकरत्ने दिलशान सामनावीर
लंडन, १२ जून/ पीटीआय
‘सुपर एट’ मधील सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर १९ धावांनी विजय मिळवून उपान्त्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. फलंदाजीमध्ये सनथ जयसूर्या आणि तिलकरत्ने दिलशानने संघाला चांगली सुरूवात करून दिली. तर गोलंदाजीमध्ये लसिथ मलिंगा आणि मुथय्या मुरलीधरन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानवर मात केली.

भारतासमोर पाकिस्तानचे कडवे आव्हान
टॉन्टन, १२ जून/ पीटीआय

भारतीय महिलांची येथे सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेतील सुरुवात खराब झाली. ब गटातील पहिल्याच लढतीत यजमान इंग्लंडने गुरुवारी भारताचा १० विकेटस् राखून आरामात पराभव केला. भारताला दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचे कडवे आव्हान असणार असून हा सामना जिंकल्यास भारतीय संघाला विजयाचे खाते उघडता येइल. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात भारतातर्फे मिथाली राज आणि सुलक्षणा नाईक यांनी प्रत्येकी २४ धावा काढून संघाला शतकापर्यंत मजल मारून दिली. पण आन्य फलंदाजांना मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे कर्णधार झुलन गोस्वामीपुढे फलंदाजीचा प्रश्न सोडवावा लागेल. ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या विश्वचषकामध्ये भारताच्या गोलंदाजांची कामगिरी चांगली झाली होती. त्यामुळे पाकिस्तानचे यावेळी लक्ष भारतीय गोलंदाजांवर असेल. त्यावेळी सलामीवीर अंजुम चोप्राने भारतातर्फे सर्वाधिक धावा केल्या होत्या. तीने यावेळी अनुभव पणाला लावून भारतीय संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून द्यायला हवी. त्याचबरोबर मिताली राज आणि सुलक्षणा नाईक यांनी गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे त्यांच्याकडूनही अपेक्षा वाढलेल्या असतील.

एगॉन क्लासिक टेनिस:सानिया उपांत्य फेरीत दाखल
बर्मिगहॅम १२ जून/पीटीआय

भारताच्या सानिया मिर्झाने एगॉन क्लासिक टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. तिने १६ व्या मानांकित मेलिंडा झिंक हिच्यावर सनसनाटी विजय नोंदविला. बिगरमानांकित खेळाडू सानियाने हा सामना ६-१, ७-६(७-४) असा जिंकला. तिचा हा विजय आगामी विम्बल्डन स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. १३ वी मानांकित खेळाडू मॅगडेलिना रिबारीकोवा व बिगरमानांकित खेळाडू उर्सुला राडवानस्का यांच्यातील विजेत्या खेळाडूबरोबर सानियास उपांत्य फेरीची लढत द्यावी लागणार आहे. सानियाने उपांत्यपूर्व फेरीत आजच्या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये हंगेरीच्या मेलिंडाची सव्‍‌र्हिस चौथ्या गेमच्या वेळी तोडली. मेलिंडाने केलेल्या दुहेरी चुकांचाही तिला फायदा झाला. मेलिंडास सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवणे अवघड गेले. पुन्हा सहाव्या गेमच्या वेळी तिची सव्‍‌र्हिस तोडण्यात सानियाने यश मिळविले. हा ब्रेक घेत सानियाने ५-१ अशी आघाडी मिळविली. पाठोपाठ स्वत:ची सव्‍‌र्हिस राखून सानियाने पहिला सेट घेतला. दुसऱ्या सेटमध्ये मेलिंडास सूर गवसला. चौथ्या गेमच्या वेळी सानियाची सव्‍‌र्हिस तोडण्यात तिने यश मिळविले. तिने ३-१ अशी आघाडी घेतली. तथापि, जिगरबाज सानियाने सव्‍‌र्हिसब्रेक मिळवित ३-३ अशी बरोबरी साधली. पुन्हा हैदराबादच्या सानियाने नवव्या गेममध्ये सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. तिने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला. मात्र पुढच्या गेममध्ये तिने मॅच पॉईन्टची संधी गमावली. मेिलडाने त्याचा फायदा घेत हा सेट टायब्रेकपर्यंत नेला. तथापि, टायब्रेकरमध्ये सानियाने वर्चस्व गाजविले. सानियास यापूर्वी २००५ मध्ये मेलिंडाविरुध्द कोलकाता येथे पराभव पत्करावा लागला होता. सानियाने आज या पराभवाची परतफेड केली.

कनिष्ठ विश्वचषक हॉकी: भारताच्या पदकाच्या आशा संपुष्टात
सिंगापूर , १२ जून/ वृत्तसंस्था

येथे चालू असलेल्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताने आज पोलंड संघावर ४-२ अशी मात केली. हा विजय मिळवूनही भारत उपांत्यपूर्व फेरी गाठू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश न्यूझीलंड - हॉलंड या लढतीच्या निकालावर अवलंबून होता. मात्र या लढतीत न्यूझीलंडने हॉलंडला २-२ असे बरोबरीत रोखल्याने भारताच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाच्या आशा संपुष्टात आल्या. मात्र या लढतीत न्यूझीलंडने हॉलंडला २२ असे बरोबरीत रोखल्याने भारताच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाच्या आशा संपुष्टात आल्या.

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा; भारताचे तीन खेळाडू अंतिम फेरीत
नवी दिल्ली १२ जून/पीटीआय

भारताच्या थोकचोम नानाओसिंग (४८ किलो), जय भगवान (६० किलो) व सुरंजयसिंग (५१ किलो) यांनी आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत आज अंतिम फेरी गाठली. नानाओसिंगने न्यायंबयार तुगोत्सोव (मंगोलिया) याला १५-७ असे हरविले तर भगवान याने साईलुव्होव गनी (कझाकिस्तान) याच्यावर ७-२ अशी मात केली. सुरंजयने थायलंडच्या रुनोरुआंग अमनाज याचा पराभव केला. भारताच्या विजेंदरसिंग , जितेंदरसिंग, परमजित सामोता व दिनेशकुमार यांना ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.