Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

जखमींची गर्दी उसळली

 

सेन्ट्रलाइज्ड ‘इमर्जन्सी मेडिकल सिस्टिम’ (ईएमएस)ची गरज असल्याचे सरकारही मान्य करते. त्रिस्तरीय रुग्णवाहिका सेवा आणि त्यासाठी पूर्ण प्रशिक्षित कर्मचारी वर्ग अशी व्यवस्था असली पाहिजे. एकीकडे सरकारी, नागरी आणि खासगी इस्पितळांनी आपल्याकडील रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याचा वैयक्तिकरीत्या प्रयत्न केला; तर दुसरीकडे ‘इमर्जन्सी मेडिकल सव्‍‌र्हिसेस अ‍ॅक्ट’चा मसुदा तयार करण्याचा निर्णय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने ‘२६/११’च्या जेमतेम महिनाभर आधी घेतला होता. अमेरिकेत अशा पद्धतीची सेवा आहे. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या विमानहल्ल्यांच्या वेळी या सेवेचा फार उपयोग झाला होता. त्या धर्तीवर आपल्याकडेही सेवा उपलब्ध करण्याची योजना आहे; परंतु सरकारला अद्याप तो कायदाच मंजूर करून घ्यायचा आहे.
पंचतारांकित हॉटेलमधील हल्ल्यातील बळींची संख्या वाढण्याची शक्यता विचारात घेऊन सरकारी आणि महापालिकेच्या सर्व इस्पितळांमध्ये जागा उपलब्ध असेल त्यानुसार प्रेते आणि जखमींना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मृतदेहांची ‘ऑटोप्सी’ करण्याची व्यवस्था पालिका रुग्णालयांमध्येही आहे. तरीही जे. जे. इस्पितळात आलेल्या १०८ मृतदेहांची ‘ऑटोप्सी’ तेथेच करायची, पालिकेच्या इस्पितळांमध्ये काही प्रेते पाठविण्याऐवजी पुणे आणि औरंगाबादहून ‘फोरेन्सिक तज्ज्ञ’ मुंबईत बोलावून सर्व १०८ मृतदेहांची ‘ऑटोप्सी’ (तपासणी) जे. जे. इस्पितळातच करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गैरव्यवस्थापन आणि गोंधळ याचा परिणाम कसा असतो पाहा- दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जखमी आणि मृतांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली तेव्हा अनेक जखमींना आपली नावे मृतांच्या यादीत आढळली. कोणते रुग्ण, जखमी कोठे आहेत, त्यांना कसे शोधायचे याची काही व्यवस्था नव्हती. जखमींचे आणि मृतांचे कुटुंबीय, नातेवाईक, त्यांचा शोध घेताना मेटाकुटीला आले होते. मध्यवर्ती माहिती केन्द्रही नव्हते; त्यामुळे एकच गोंधळ उडाला. काही जखमींची नावे एकापेक्षा अधिक इस्पितळांच्या यादीत दिसत होती. एकच माणूस एकाच वेळी दोन/तीन इस्पितळात दाखल कसा असेल? सरकारी यंत्रणांच्या या गोंधळाची झळ जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना बसत होती..! (क्रमश:)