Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

ग्रंथविश्व

पडद्यामागचे अ‍ॅटेनबरा

ही आहे रिचर्ड अ‍ॅटेनबरा या महान निर्माता, दिग्दर्शकाची कहाणी. तिला आत्मचरित्र म्हणायचे, की आत्मकथा म्हणायचे, की नुसतेच चरित्र वा निवेदन, या वादात पडायचे कारण नाही. त्यात जे काही आहे ते वाचल्याने रिचर्ड अ‍ॅटेनबरा या व्यक्तिमत्त्वाची आपली दोस्ती होते ती कायमचीच. ‘गांधी’ या चित्रपटामुळे ‘अ‍ॅटेनबरा’ हे नाव किती प्रभावी आहे, ते जगाला समजून चुकले. हे पुस्तक ‘गांधी’ चित्रपटाच्या निर्मितीकाळाची सर्वाधिक माहिती देते. गांधी चित्रपटाने महात्मा गांधी आपल्या पिढीच्या डोळ्यांसमोर जेवढे उभे केले, त्यापेक्षाही थोडेसे अधिकच ते पडद्यामागल्या कहाणीतून या पुस्तकात दिसतात. या नव्या पुस्तकाचे नाव आहे, ‘एन्टायरली अप टू यू, डार्लिग.’ ते रिचर्ड अ‍ॅटेनबरा आणि डायना हॉकिन्स यांनी लिहिले आहे. पुस्तकातल्या काही भागात ‘आर. ए.’ नावाने जो मजकूर आढळतो तो रिचर्ड अ‍ॅटेनबरा यांचा आहे, तर ‘डी.एच.’ नावाने जो आहे तो डायना हॉकिन्स यांनी लिहिला आहे.
डायना हॉकिन्स या अ‍ॅटेनबरा यांच्या प्रसिद्धी प्रमुख या नात्याने अनेक वर्षे वावरल्या आहेत. हे पुस्तक निवेदनात्मक नाही. दोघांचीही कहाणी कधीही परस्परांना छेद देत नाही, उलट ती पूरकच ठरते. काहींच्या मते या पुस्तकाचे खरे लेखक हे अ‍ॅटेनबरा नाहीत. या चरित्राचे लेखक एक की दोन, या वादापेक्षा ते आंतर्बाह्य़ कसे चांगले आहे, ते आपण समजावून घेणे मात्र गरजेचे आहे.
गांधी चित्रपटासाठी महात्मा गांधी यांच्या मुख्य भूमिकेसाठी निरनिराळ्या अभिनेत्यांचा विचार चालू होता, तेव्हा काही नावे आकाराने स्थूल असल्याने नाकारण्यात आली. काही जणांनी ही भूमिका जमणार नाही, असे कारण देऊन स्वत:च ती करायला नकार दिला. एका निर्मात्याने रिचर्ड बर्टन असेल तर आपण चित्रपटासाठी वाटेल तेवढी आर्थिक मदत करायला तयार आहोत, असे म्हटले. रिचर्ड बर्टन हा ज्या तऱ्हेच्या भूमिका बजावतो, त्याच्याशी गांधीजींची भूमिका जुळणारी नाही, असे सांगून अ‍ॅटेनबरा यांनी आपल्याला तुमची मदतही नको आणि तो बर्टनही, असे त्याला बजावले.

 


या पुस्तकाचा आणि गांधी चित्रपटाचाही सर्वात महत्त्वाचा भाग हा पहिल्या शंभर पानांमध्येच दडला आहे. अ‍ॅटेनबरा म्हणतात, की गांधी या चित्रपटाचा शोध या चित्रपटाला ‘ऑस्कर’ मिळण्यापूर्वी २० वर्षे सुरू करण्यात आला होता. सर जेकब एप्स्टिन या शिल्पकाराने बनवलेल्या काही अर्धपुतळ्यांचा लिलाव चालू असल्याचे कानावर आले. कोणतीही माहिती न घेताच आपण एक पुतळा उचलला, असे अ‍ॅटेनबरा म्हणतात. या पुतळ्याची किंमत अडीचशे पौंड चुकती करून आपण लंडनच्या त्या सभागृहातून बाहेर पडलो, असे सांगून अ‍ॅटेनबरा म्हणतात, ‘तो पुतळा भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा होता. मध्यरात्रीनंतर दीड वाजता तो पुतळा मी माझ्या घरासमोर उभा केला. आजही तो तिथेच आहे.’ अ‍ॅटेनबरा यांनी सांगितलेली ही घटना १९६२ ची आहे आणि एप्स्टिनचे निधन १९५९ मध्ये झाले. एप्स्टिनने बनवलेली ही शिल्पकृती विकत घेतली जाण्यापूर्वी तयार असणार हे उघड आहे.
पहाटेच्या सुमारास निद्रादेवीच्या आधीन असतानाच अचानक फोन वाजला. पलीकडचा आवाज मला पूर्णपणे अनभिज्ञ होता. त्याने आपले नाव मोतीलाल कोठारी असे सांगितले. कोठारींनी आपल्याला कोणताही गैरसमज करून घेवू नका, असे आर्जवले आणि त्यांनी आपल्या भेटीची वेळ मागितली. दोन दिवसांनी जेवणासाठी कोठारी आणि अ‍ॅटेनबरा एकत्र आले. मध्यमवयीन कोठारींनी त्यांना नमस्ते केले. १९४८ मध्ये गांधींजींच्या हत्येनंतर देश सोडून बाहेर पडलेले कोठारी यांनी अ‍ॅटेनबरांना विचारले, ‘तुम्ही महात्मा गांधींवर चित्रपट का नाही काढत?’ ‘पंडित नेहरूंविषयी वाचन आहे, पण गांधीजींविषयी आपल्याला तेवढी माहिती नाही,’ असे त्यांनी कबूल केले, तेव्हा कोठारींनी अमेरिकन लेखक लुई फिशर यांनी लिहिलेले गांधीजींचे चरित्र अ‍ॅटेनबरांना द्यायचे मान्य केले. कोठारी हे लंडनमध्ये ‘इंडिया हाऊस’ या भारतीय दूतावासात काम करत होते.
कोठारींनी केलेले आवाहन विचार करण्याच्या पलीकडे होते. अ‍ॅटेनबरा यांचे तेव्हाचे वय होते ३९ वर्षांचे. त्यांच्या प्रसिद्धीप्रमुख डायना हॉकिन्स होत्या, २४ वर्षांच्या. त्यावेळी अ‍ॅटेनबरा यांच्या हातात ‘एल शेप्ड रुम’ हा लेस्ली कॅरोनचा चित्रपट होता.
गांधीजींच्या चरित्राने प्रभावित झालेले अ‍ॅटेनबरा यांना मग गांधीजींच्या जीवनात आलेल्या प्रमुख व्यक्तींशी बोलायला हवे, असे वाटले. पहिलेच नाव त्यांच्या डोळ्यासमोर आले ते पंडित नेहरूंचे. कोठारींना त्यांनी चित्रपट काढेन, पण पैशाचे काय, असा प्रश्न केला तेव्हा कोठारींनी ‘आपल्याकडे कुठे आले आहेत एवढे पैसे’ असा उलट प्रश्न केला. हाच अनुभव त्यांना इतरही अनेकांकडे आला.
पंडित नेहरू यांच्याकडे अ‍ॅटेनबरा यांनी पत्राने वेळ मागितली. मे १९६३ मध्ये एका रविवारी ही भेट ठरली. मोतीलाल कोठारी आधीच दिल्लीत गेले, पण अ‍ॅटेनबरा यांच्या आगमनापूर्वी ते आजारी पडल्याने विमानतळावर त्यांच्या स्वागताला मोतीलाल यांचे बंधू वाला हजर होते. वालांनी हॉटेलकडे जाताना ‘आपण महात्मा गांधींची समाधी पाहू या का?’ असे त्यांना विचारले. एवढय़ा विमान प्रवासानंतरही अ‍ॅटेनबरा यांनी त्यांना होकार दिला. या समाधीपासूनच चित्रपटाचे कथानक अ‍ॅटेनबरांच्या डोक्यात घोळू लागले.
पंडित नेहरूंच्या भेटीची वेळ सकाळी साडेआठची ठरली होती. अ‍ॅटेनबरा यांना अर्धा तास भेटीसाठी देण्यात आला आणि नेहरूंच्या सचिवांनी त्यांना, ‘वीस मिनिटांमध्येच उरका, बाहेर बरचेजण आहेत’ असे सांगितले होते. अ‍ॅटेनबरांचा अर्धा तास तर कधीच संपून गेला. त्यांचे सचिव येरझारा घालू लागले. नेहरूंनीही त्यांना खुणावले. अ‍ॅटेनबरा यांची गांधीजींवर काढायच्या चित्रपटाची कल्पना नेहरूंना एकदम पसंत पडली. बापूंविषयी अ‍ॅटेनबरांशी नेहरू भारावून बोलत होते, मधूनच ते भावूक व्हायचे. महात्माजींबरोबरच्या छायाचित्रांचा अल्बम आणायला त्यांनी सांगितले. त्यांनी तो आपल्या टेबलावर मांडला. ती जागा त्या अल्बमला अपुरी वाटली तेव्हा नेहरूंनी तो जमिनीवर मांडला आणि हा अल्बम दाखवायला ते गुडघे टेकून खाली बसले. तसा तो अल्बमही काहीसा जीर्णच होता. अ‍ॅटेनबरा म्हणतात, ‘आम्हाला नेहरूंप्रमाणे जमिनीवर बसण्यावाचून गत्यंतरच नव्हते.’ एका देशाचे पंतप्रधान इतक्या अपार श्रद्धेने गांधीजींविषयी बोलत होते आणि प्रत्येक चित्राची भूमिका स्पष्ट करत होते. तेवढय़ात त्यांचा एक सेवक आत आला आणि त्याने नेहरूंच्या हाती एक चिठ्ठी दिली. आपले पंतप्रधान जमिनीवर गुडघ्यावर बसल्याचे अपूर्व दृश्य पाहून तोही थोडासा चक्रावलाच होता. नेहरूंनी त्या सेवकाकडे पाहिले आणि ‘येस, येस’ म्हणत ते आपल्या खुर्चीत पुन्हा स्थानापन्न झाले. या चित्रपटाला आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. नेहरूंनी तसे आदेशच तेव्हा दिले. पंडित नेहरूंच्या निधनानंतर पुढे काय, हा प्रश्न होता. तरीही अ‍ॅटेनबरा यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहून त्यांच्याकडे विचारणा केली. इंदिरा गांधींनी त्यावेळी त्यांच्याकडे असणाऱ्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाच्या कक्षेत जे काही करता येईल, ते आपण करू, असे आश्वासन दिले आणि पंतप्रधानपदावर आल्यानंतरही ते पाळले. या चित्रपटाला लाल फितीचा अडसर येता कामा नये, असे त्यांनी बजावले होते. त्यांच्यासाठी हा तर एक सुखद धक्का होता.
अ‍ॅटेनबरा यांनी याच चित्रपटाविषयीचे इतरही अनेक अनुभव यात शब्दबद्ध केले आहेत. अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी गांधींवर आपण चित्रपट काढणार आहोत, असे त्यांनी सांगितले तेव्हा रीगन यांनी ‘ओऽ येस, येस, इंदिरा गांधीज् फादर’ म्हटले असाही यात उल्लेख येतो.
१९६२ मध्ये सुरू झालेला गांधी चित्रपटाचा हा प्रवास १९८० मध्ये चित्रीकरणापर्यंत येऊन ठेपला. प्रत्यक्ष चित्रीकरणातले काही गंभीर प्रसंगही त्यांनी रेखाटले आहेत. गांधीजींची प्रत्यक्ष हत्या जिथे झाली, त्या ठिकाणी पहाटेपासून केले गेलेले सर्व चित्रण अ‍ॅटेनबरा यांच्यापासून ते कॅमेरामन आणि अन्य सहाय्यकांपर्यंत सर्वानी अनवाणी पायांनी कसे केले, गांधीजींच्या अंत्ययात्रेसाठी गर्दी जमवायचा प्रश्न आला, तेव्हा उडालेली धांदल आणि अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी चार लाख दिल्लीकर गोळा झाल्यावर उडालेली तारांबळ मुळातून वाचावी अशी आहे. उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांनी या चित्रपटासाठी ४० लाख डॉलरची मदत करायचा करार केला होता, असेही त्यांनी नमूद केले आहे. अमेरिकेतल्या एका वाहिनीने चित्रपटाचे सर्व हक्क स्वत:साठी आधीच विकत कसे घेतले, तेही त्यांनी यात स्पष्ट केले आहे. बेन किंग्स्ले या अभिनेत्याने समजावून घेतलेले गांधी, त्यासाठी केलेला उपवास या सर्व गोष्टींना दाद द्यावी, अशी हकिकत या पुस्तकात आहे. गांधी चित्रपटापलीकडेही अ‍ॅटेनबरा यात आहेत, पण ते अन्य उपक्रमापुरते दिसतात, ज्यांना चित्रीकरणात, अभिनयात आणि अ‍ॅटेनबरा समजावून घेण्यात रस आहे, ज्यांना गांधी चित्रपटामागचे अफाट कष्ट जाणून घ्यायचे आहेत, त्याने तरी हे पुस्तक वाचायलाच हवे.
अरविंद व्यं. गोखले
‘एन्टायरली अप टू यू डार्लिग’,
लेखक : रिचर्ड अ‍ॅटेनबरा आणि डायना हॉकिन्स
प्रकाशन : हचिन्सन, लंडन
पृष्ठे : ३१८ + अनेक कृष्णधवल आणि रंगीत चित्रांची पाने
मूल्य : २० पौंड