Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

विविध

जखमींची गर्दी उसळली
सेन्ट्रलाइज्ड ‘इमर्जन्सी मेडिकल सिस्टिम’ (ईएमएस)ची गरज असल्याचे सरकारही मान्य करते. त्रिस्तरीय रुग्णवाहिका सेवा आणि त्यासाठी पूर्ण प्रशिक्षित कर्मचारी वर्ग अशी व्यवस्था असली पाहिजे. एकीकडे सरकारी, नागरी आणि खासगी इस्पितळांनी आपल्याकडील रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याचा वैयक्तिकरीत्या प्रयत्न केला; तर दुसरीकडे ‘इमर्जन्सी मेडिकल सव्‍‌र्हिसेस अ‍ॅक्ट’चा मसुदा तयार करण्याचा निर्णय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने ‘२६/११’च्या जेमतेम महिनाभर आधी घेतला होता. अमेरिकेत अशा पद्धतीची सेवा आहे.

दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला
मेलबर्न, १२ जून/पी.टी.आय.

भारतीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचे लोण आता दक्षिण ऑस्ट्रेलियात पोहोचू लागले असून आज अ‍ॅडलेड शहरात एका २२ वर्षीय भारतीय शीख विद्यार्थ्यांला ऑस्ट्रेलियातील एका अल्पवयीन मुलाने भारतीय विद्यार्थ्यांची पगडी पाहून अपशब्द वापरले व त्याला मारहाण केली. भारतीय विद्यार्थ्यांचे नाक व खांदा या मारहाणीत दुखावला असून अ‍ॅडलेड येथील रंडल मॉल या नेहमी गर्दी असलेल्या व्यापारी मॉलमध्ये ही संतापजनक घटना घडली.

नेपाळच्या पहिल्या महिला उपपंतप्रधान आचार्य कालवश
काठमांडू, १२ जून / पी.टी.आय.

नेपाळच्या पहिल्या महिला उपपंतप्रधान शैलजा आचार्य यांचे न्यूमोनियाच्या विकाराने आज निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री मनीषा कोईराला ही आचार्य यांची सख्खी भाची आहे. महारगंजमधील त्रिभुवन युनिव्हर्सिटी टीचिंग हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या न्यूमोनियाशी झुंज देत होत्या. १९९७ साली त्यांनी नेपाळच्या पहिल्या महिला उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. १९६१ साली नेपाळचे राजे महेंद्र यांनी तत्कालीन बी.पी. कोईराला सरकार बरखास्त केल्याच्या निषेधार्थ शैलजा आचार्य यांनी राजघराण्याला काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे राजघराण्याच्या सत्तेने त्यांची रवानगी तुरुंगात केली होती. सुटकेनंतर शैलजा आचार्य काही वर्षे भारतात वास्तव्यास होत्या.

भाजप, माकप नेत्याची गोळ्या घालून हत्या
सिमदेगा (झारखंड), १२ जून / पी.टी.आय.
सिमदेगा जिल्ह्य़ातील स्थानिक भाजप नेते गंदूर प्रसाद यांना अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बेलकुबा बाजार परिसरात गोळ्या घालून ठार केल्याने दहशत निर्माण झाली आहे. गंदूर प्रसाद या भागातील प्रभावी नेते आणि रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी होते. त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणाने करण्यात आली याविषयी काहीही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
माकप नेत्याचीही हत्या
बेहरामपूर- प. बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्य़ात भर दिवसा माकप नेते अक्रम शेख यांची अज्ञात मारेक ऱ्यांनी जवळून गोळ्या झाडून हत्या केली. जिल्हा परिषदेतील केंद्रीय रेशीम कार्यालत अक्रम शेख येताच मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. ४५ वर्षीय शेख यांच्याकडे माकपच्या पंचनांतल स्थानिक समितीच्या सचिवपदाचा कार्यभार होता.

ट्रक उलटून मजूर कुटुंबातील सात ठार
पतियाळा, १२ जून / पी.टी.आय.
खडी वाहून नेणारा ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात लोकांचा जागीच अंत झाला. मृतांमध्ये तीन मजूर, एक महिला आणि तिच्या चार मुलांचाही समावेश आहे. काल रात्री पातियाळापासून ४० किमी अंतरावर ही घटना घडली. हा ट्रक हिमाचल प्रदेशातून पतियाळात येत होता. ट्रकमधील खडीवर मजुरांचे कुटुंब बसले होते. एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला परिणामी सर्वजण खडीच्या ढिगाऱ्याखाली चेंगरले जाऊन ठार झाले.