Leading International Marathi News Daily
शनिवार १३ जून २००९
  इमारत कमकुवत होण्याची कारणमीमांसा
  न्यायालयीन निवाडे
कामगाराच्या गृहकर्जाचा हप्ता मालक रोखू शकतो!..
  चर्चा
घर की छळछावणी?
  घर कौलारू
घरपण जतन केलेले तरखडचे पाटील यांचे घर
  मेलबॉक्स
  वास्तुरंग
  गाव करी ते..
  आयफेल टॉवर
फ्रान्सची ओळख
  असं सजवलं माझं घर
कृतिशीलतेने सजवलेलं घर गृहिणीच्या समाधानाचं!

 

इमारत कमकुवत होण्याची कारणमीमांसा
सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रत्येक फ्लॅटचा ताबा व त्याचा मालकी हक्क हा त्या इमारतीत राहावयास आलेल्या वेगवेगळ्या सदस्यांकडे असल्याने प्रत्येक जण आपल्या घरात आपल्या पद्धतीने फेरफार करीत असतो. पण हे सर्व करताना त्याचा परिणाम इमारतीवर कसा होईल याकडे कोणी लक्ष देत नाही. मनुष्य हा आपल्या वयाचा, आपल्या तब्येतीचा, आपल्या आजार, औषधोपचार यावर नेहमी व्यवस्थित लक्ष देऊन शरीराची काळजी घेत आयुष्यमान नेहमी वाढविण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. त्याप्रमाणे इमारतीच्या देखभालीत व एकंदरीत इमारतीच्या आरोग्याकडे मात्र काळजीपूर्वक बघत नाही. ही आजच्या काळातील दुर्दैवाची बाब. अशामुळे एखादी विपरीत घटनासुद्धा घडू शकते.
पूर्वीच्या काळी लहान-मोठय़ा इमारती, घरे, बंगले त्या काळातील तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येत. पण जसा काळ बदलला त्याच्या बरोबरीने अनेक समीकरणे बदलली व त्यासोबत नवनवीन तंत्रज्ञानाची त्यात भर पडत गेली.

 

२० वर्षांत आयुष्य संपवलेली वरळीची ‘पूनम चेंबर्स’ व बोरिवलीची तरणीताठी ‘लक्ष्मीछाया’ या दुर्घटनांनी स्थापत्य अभियांत्रिकीसमोर ‘सवाले निशाण’ उभे केले व इमारतच सर्वाना असुरक्षित वाटू लागली व एकूणच हा मुद्दा कोणी फारसा व पुरेसा मनावर घेत नाही. गंभीरपणे घेत नाही असा निष्कर्षसुद्धा काढला जाऊ लागला. या दुर्घटनांवर अनेक चर्चा, प्रश्नोत्तरे, संवाद झाले व त्यामधून निघालेल्या निष्कर्षांंचा समावेश आज इमारतीच्या बांधणीत झाल्यानेच नवीन तंत्रज्ञानाचा उगम होऊन इमारत आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त सुसज्ज होत गेल्याचे निदर्शनात येत आहे.
दुर्घटनापासून धडा घेऊनच तर आज होत असलेले प्रत्येक इमारतीचे बांधकाम, त्याचा पाया, ज्याला आपण फाऊंडेशन म्हणतो त्याची भूकंपापासून सुरक्षित अशी रचना असलेले डिझाइन, चांगल्या प्रतीचे व जाडीचे लोखंड व उच्च दर्जाचे हायर ग्रेडचे काँक्रीट, चांगल्या दर्जाचे बांधकाम साहित्य व त्याचप्रमाणे आजच्या काळातील आवडीनिवडीनुसार इमारतीच्या फ्लॅटमध्ये लागणाऱ्या, फ्लोअरिंग बाथरूम, टॉयलेट किचनच्या टाइल्स भिंतींना पीओपी, जिप्सम, फॉल सिलिंग, आतून आकर्षक रंग तसेच चमकणारे नळ, शॉवर्स, फ्लश व्हॉल्व्ह, शॉवर पॅनेल्स, डिझायनर किचन व बाहेरील भिंतींना टिकाऊ असा टेक्स्चर पेंट अशा सर्वच चांगल्या साहित्यामुळे आज अनेक ठिकाणी चांगल्या गुणवत्तेच्या इमारतीची निर्मिती होत असल्याचे आपल्याला दिसत आहे.
इमारत दुर्घटनामुळे निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी आज बिल्डर चांगल्या दर्जाच्या इमारती बांधत आहेत. आर्किटेक्ट, आरसीसी डिझायनर्स, प्रकल्पातील सर्वच अभियंते व इमारत बांधणीच्या क्षेत्रातील सर्वच जणांनी आपल्या कामात चांगलेच बदल घडविले आहेत. त्यातल्या त्यात लोखंडाचे डिझाइन करणाऱ्या ज्यांना आपण आरसीसी डिझायनर्स म्हणून ओळखतो व त्यांनाच इमारतीचे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट द्यायचे असल्याने त्यांनीसुद्धा इमारतीच्या प्रक्रियेत जास्त बारीक लक्ष दिल्याने गुणवत्तेत चांगलाच फरक पडला आहे.
पण एवढं सर्व व्यवस्थित करूनही जर का इमारत दुर्घटनाग्रस्त होत असेल तर सदोष बांधकामाखेरीज इमारत का कोसळते? जर मजबूत बांधणी करून चांगले साहित्य वापरूनही इमारत कोसळून मनुष्य व वित्त हानी का होते? या प्रश्नावर विचार करण्याची वेळ आली आहे. बिल्डर जर मजबूत, भक्कम व कायद्याने मान्यता मिळवून देऊनसुद्धा इमारत का कमकुवत
होते? नंतर तिच्यात कमकुवतपणा का येतो? हे प्रत्येकाने जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
१) सर्वात प्रथम म्हणजे तयार इमारतीत राहायला आलेल्यांकडून त्यात केले जाणारे फेरफार. त्यामध्ये इमारतीच्या सांगाडय़ातील कोणताही आरसीसी भाग ज्याला आपण कॉलम, बीम, स्लॅब म्हणून ओळखतो, तो भाग पूर्णपणे काढून टाकणे किंवा त्याची तोडफोड करणे व असे केल्याने इमारत लगेचच ढासळू शकते. म्हणून मूळ इमारतीच्या सांगाडय़ाला हात लावणे हेच चुकीचे ठरते. पण येथे एक लक्षात घेण्यासारखे असे आहे की तयार इमारतीमधील त्या तयार फ्लॅटचा अंतर्गत सजावटीसाठी नवीन नकाशा बनवला जातो व एकदा का एकाच फ्लॅटचा दुसरा नकाशा (प्लॅन) बनला की, त्याप्रमाणे फेरफार करून त्या फ्लॅटला नवीन रूप देण्याच्या प्रयत्नात इमारतीच्या मूळ नकाशातील भाग काढल्याने किंवा तोडल्याने इमारत कमजोर होऊन कोसळू शकते. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रत्येक फ्लॅटचा ताबा व त्याचा मालकी हक्क हा त्या इमारतीत राहावयास आलेल्या वेगवेगळ्या सदस्यांकडे असल्याने प्रत्येक जण आपल्या घरात आपल्या पद्धतीने फेरफार करीत असतो. पण हे सर्व करताना त्याचा परिणाम इमारतीवर कसा होईल याकडे कोणी लक्ष देत नाही.
२) कित्येक वेळेस आपल्या सहज लक्षात येत असते की बरेचसे लोक वजन घेणाऱ्या भिंती काढून टाकून जागा कशी जास्त वापरता येईल याचा विचार करतात. असा अंतर्गत रचनात्मक बदल करून संपूर्ण इमारतच धोकादायक होऊ शकते.
३) घराचा ताबा घेऊन त्या मधील फ्लोरिंग, बाथरुम, टॉयलेट व किचनच्या टाईल्स बदलून टाकतात. बिल्डरने दिलेल्या अशा गोष्टी तोडून आपल्या आवडीनुसार नवीन काम करून घेतात अशा ठिकाणी मूळ कामांना तडा जाऊन तोडफोडीच्या कामात स्लॅब गळती, पाण्याच्या पाईपातून गळती, वरच्या फ्लॅटमधून खालच्या फ्लॅटमध्ये गळती व मूळ वॉटर प्रूफिंगचे काम तोडल्याने अशा प्रकारची गळती इमारतीला आजारी बनवत असते. एकदा का पाणी आत शिरून लोखंड गंजू लागल्याने भविष्यात अशा इमारती अशक्त होऊन संपूर्ण इमारतीला कोसळवू शकतात. इमारत ही आतून गंजत जाऊन एकदा का तिची वजन पेलण्याची क्षमता संपली की ती इमारत दुर्घटनाग्रस्त होऊ शकते. लहान-सहान आजारांकडे दुर्लक्ष केल्याने जसा मोठा आजार बळावू शकतो तसेच इमारतीतसुद्धा घडू शकते.
४) ‘सुंदरता’ जपणारे व फ्लॅटच्या आतील भागात सजावट करणारे वर्षभराचे कोर्स करून बनलेले ‘इंटिरिअर डेकोरेटर्स’ हेसुद्धा इमारत कमजोरीच्या कामात दोषी असतात. कारण इमारत कशी बनते त्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान त्यांना नसते व नुसती माहिती करून जाणकारी ठेवून कोणत्याही शास्त्राचे ज्ञान प्राप्त होत नसते. आम्हाला इमारतीशी काही देणे-घेणे नाही, असा त्यांचा समज असल्याने इमारतीच्या दुर्घटनेत त्यांच्यावर सर्वात प्रथम दोष ठेवला जातो.
५) नूतनीकरणाच्या नावाखाली
बंद घराच्या आत नक्की कोणत्या प्रकारचे दुरुस्तीचे व सजावटीचे काम चालू आहे हे पाहायचे व त्यावर लक्ष ठेवायचे हे सोसायटी व सरकारचे काम नाही तर त्या फ्लॅटच्या मालकाने इमारतीच्या बाबतीत मूळ नकाशे बघून किती वजन इमारत पेलू शकेल हे तज्ज्ञांच्या साहाय्याने व त्यांच्या सल्ल्याने
केले पाहिजे. स्वत:मध्ये या बाबतीतली जागरूकता असणे गरजेचे आहे.
६) अशिक्षित मजूर, गवंडी, सुतार, फिटर, प्लंबर इ. या क्षेत्रात काम करणाऱ्यांकडून बदल करून घेतले
जात असल्याने सुद्धा चुकीच्या पद्धतीने काम केल्याने इमारतीचे नुकसान
होत राहते. अशा अर्धवट माहिती असणाऱ्या लोकांकडून फ्लॅटधारक मालकाचा आत्मविश्वास वाढवला जातो व त्यातूनच नवनवीन कल्पना सुचतात व त्या मजुराच्या साहाय्याने
तो प्रत्यक्षात अमलात आणल्याने
त्याचे दुष्परिणाम इमारतीला भोगावे लागतात.
७) चुकीच्या पद्धतीने केलेले इमारत दुरुस्तीचे कामसुद्धा इमारत कोसळू शकते. उदा. वरळीच्या ‘पूनम चेंबर्स’च्या गच्चीवर एक फुटाचे जाडी असलेले वॉटर प्रूफिंग केले व त्याच्यावर भलीमोठी पाण्याची टाकी बसविली व ती ज्या दिवशी सकाळी भरण्यात आली त्याच दिवशी ती इमारत दुपारी कोसळली. तर अशा दुर्घटना या चुकीच्या पद्धतीने केलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे होत असतात. म्हणून कोणतेही काम करताना त्या कामाचे वजन इमारत नीट निभावून घेईल का? हा विचार केलाच पाहिजे नाहीतर फेरफार केल्याने व अवास्तव वजनानेसुद्धा इमारत कोसळू शकते ही शोकांतिका यापूर्वी आपण सर्वानी पाहिलेली आहे.
८) अंतर्गत सजावटीच्या कामा सर्वात जास्त घुसमट होत असते ती त्या फ्लॅटच्या इलेक्ट्रिक वाहिन्यांची. नकाशा बदलल्याने इलेक्ट्रिक पॉइन्टची जागा नवीन नकाशाप्रमाणे करण्यासाठी भिंती फोडल्या जातात, कॉलम व बीम यांचे काँक्रीट फोडले जाते व फक्त चांगले, सुंदर दिसावे याकरिता कुठे पाईप वापरून तर कुठे सिलिंग्ज तर कुठे डायरेक्ट वायरिंग करून त्यावर पीओपी लावली जाते. या सर्व बदला-बदलीच्या, आवडीनिवडीच्या नादात व फक्त फ्लॅटची, ऑफिसेसची शोभा वाढवण्यासाठी, सुंदरता आणण्यासाठी हे सर्व डोळेझाक पद्धतीने केले जाते कारण भविष्याची काळजी करायला आज वेळ कोणाला आहे? व अशाच निष्काळजी जागी आग लागून, शॉर्टसर्किट होऊन इमारतीबरोबर जीवित व वित्त हानी होत असते. पटापट फ्लॅटचे काम करून मालकाच्या ताब्यात द्यायचा, मग तो मालक जाणे व त्याचा फ्लॅट जाणे! अशी भावना असल्यानेसुद्धा त्याचा जबर फटका इमारतीला बसत असतो.
९) यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे फ्लॅटमध्ये पाणी साठवण्यासाठी बाथरूम, टॉयलेट व किचनमध्ये पाण्याच्या टाक्या सर्रास बसविल्या जातात. त्यासाठी लोखंडी गर्डर टाकून व त्यावर कडाप्पा बसवून व चार इंच जाडीचे काँक्रिट टाकले जाऊन त्या सपाट पृष्ठभागावर पाण्याच्या टाक्या बसविल्या जातात. पण हे सर्व करताना लोखंडी गर्डर हे भिंतीमध्ये टाकले जातात. कारण त्या टाकीचे सर्व वजन हे शेवटी इमारतीवरच येत असल्याने सर्वात प्रथम सर्वच फ्लॅटमध्ये असे केल्याने त्या सर्वाचे वजन इमारत खरंच पेलू शकेल का? हा विचार करताना कधी कोणी दिसत नाही उलट दोन-चार ठिकाणी केलं तर काय होते? असे उत्तर ऐकायला मिळते. पण अशा गैरसमजुतीतूनच पुढे मोठे संकट उभे राहू शकते.
१०) या सर्वानंतर, मुद्दा येतो तो इमारतीच्या गच्चीवर लावले जाणारे मोठ-मोठे होर्डिग्ज व मोबाईल टॉवर. त्यासाठी करावे लागणारे लोखंडी फ्रेमवर्क व ते उभे करण्यासाठी करावे लागणारे काँक्रिटीकरण, या सर्वाचा अतिरिक्त भार हा इमारतीच्या स्ट्रक्चरवर येत असतो. पण या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष होत असते. कारण या सर्वाच्या मोबदल्यात सोसायटय़ांना जाहिरात व मोबाईल कंपन्यांकडून मिळत असलेली लाखो रुपयांची कमाई, हा आजकाल एक प्रकारे सोसायटय़ांचा धंदाच झाला आहे. चांगले पैसे मिळत असल्याने व ती रक्कम देखभाल शुल्क म्हणून वापरली जात असल्याने व स्वत:च्या खिशातून पैसे द्यावे लागत नसल्याने इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशाच्या आनंदात चांगलीच भर पडत असते. पण एकंदरीत इमारत हे सर्व अतिरिक्त वजन खरंच पेलू शकेल का? या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असते म्हणूनच अशा इमारती दुर्घटनाग्रस्त होऊ शकतात.
११) यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा, गच्चीच्या गळतीपासून व कडक उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून केले जाणारे पत्र्यांचे शेड वर्क. त्यासाठीसुद्धा लोखंडी फ्रेमवर्क करून त्यावर सिमेंटचे पत्रे टाकले जातात. मूळ गच्चीची गळतीचे काम न करता अशा शेडवर्कनी नेमका किती फायदा होतो कोण जाणे? मूळ इमारतीची दुरुस्ती होणे गरजेचे असते, पण आजकाल बहुतेक ठिकाणी अशा शेडची उभारणी करून मूळ गच्चीची गळतीची समस्या तशीच राहते व अशा ठिकाणीसुद्धा इमारत कमजोर होत राहते. पण वरील सर्व कामांचा अतिरिक्त भार हा इमारतीवरच येत असतो. पण हा विचार न केल्याने बरेच काही विपरीत घडू शकते.
१२) जुन्या इमारतींवर सोलर सिस्टिमसाठी केले जाणारे फ्रेम वर्क, पाण्याच्या टाक्या ठेवण्यासाठी भरावे लागणारे स्लॅब इ. चा भारसुद्धा इमारतीच्या सांगाडय़ावर येत असतो. तरी ही सर्व कामे करण्यासाठी विविध चाचण्याच्या अहवालावरून इमारतीची ताकद बघितल्याशिवाय व तपासल्याशिवाय करणे चुकीचे ठरू शकते. जुन्या इमारती, त्यांचे आजचे वय, त्या इमारतीची आजची अवस्था या सर्वच बाबींचा नीट अभ्यास करूनच आपण वरील प्रकारची कामे करून घेऊ शकतो. पण हे सर्व करताना दक्षता घेणे अत्यावश्यक आहे.
तर आपण बघितले की इमारत कमकुवत कशा प्रकारे होत असते व त्यास जबाबदार कोण असते? शहरांमधला जमिनींचा तुटवडा लक्षात घेता अशा उंच इमारतीची निर्मिती नेहमी होणारच हे उघड आहे. पण त्या उंच इमारतीतील असुरक्षिततेची भीती व असुरक्षित जीवन वाटू नये यासाठी सर्वाचे प्रयत्न उपयोगी पडू शकतील.
इमारतीची योग्य ती देखभाल न केल्याने कायद्यांच्या, सक्तीच्या व शासकीय दाखल्यांना न जुमानल्याने व दुरुस्तीच्या कामात तज्ज्ञांचा सल्ला न घेतल्याने चांगल्या स्थितीतील इमारत कमजोर होऊ शकते व सरतेशेवटी त्या जमिनीवर कोसळतात, पण या इमारत कमजोरीचा दोष बिल्डरला देणे पूर्णपणे चुकीचेच असून त्यांचा संबंध नसताना त्यांच्यावर नाहक आरोप करून अन्याय केल्याचाच हा एक प्रकार होऊ शकतो. बिल्डर इमारतीबाबत सर्व माहिती पुस्तिकेमधून, नकाशातून पाणीपुरवठा व विजेच्या वाहिन्या कुठे आहेत, कशा आहेत, पाणी जाण्याच्या जागा कुठे आहेत? हे सर्व देऊनसुद्धा लोक त्या सूचनांचे पालन करीत नाहीत म्हणूनच अविचारानेच त्या इमारती दुर्घटनाग्रस्त होत असतात.
यातून एक स्पष्ट पर्याय दिसू शकतो तो असा की जे काही बदल आपल्याला आपल्या फ्लॅटमध्ये करायचे आहेत ते इमारतीच्या निर्मितीच्या वेळेत व बिल्डरकडूनच करून घ्यायचे व त्या कामांची हमीसुद्धा बिल्डर आपल्याला देऊ शकेल व त्या कामांचा ‘जबाबदार’ म्हणून आपण बिल्डरला ठरवू शकतो.ल्ल
सुधीर मुकणे
लेखक संपर्क : ९८२१३८६६१४