Leading International Marathi News Daily
रविवार, १४ जून २००९

त्या तीन तासांसाठी...
हिंदी चित्रपट निर्माते, वितरक आणि मल्टिप्लेक्स चालक यांच्यातील वाद प्रदीर्घ काळानंतर आता मिटला आहे. सिंगल स्क्रीनचा पर्याय खुला असतानाही गेले दोन महिने एकही मोठा निर्माता तो मार्ग स्वीकारायला तयार झाला नाही, याचे महत्त्वाच्या कारण म्हणजे बॉक्स ऑफिसमधून हिंदी चित्रपट उद्योगाला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी सुमारे ६० ते ६५ टक्के व्यवसाय हा मल्टिप्लेक्समधून मिळतो. याचाच अर्थ दीडशे-दोनशे रुपये खर्चून चित्रपट पाहणाारा एक मोठा वर्ग तयार झालेला आहे. सर्वसामान्यांच्या जीवनातही मल्टिप्लेक्सने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. या मल्टिप्लेक्सच्या चकचकीत अंतरंगात शिरण्याचा हा एक प्रयत्न..
पडद्यावर काश्मीर, स्वित्र्झलड किंवा तत्सम निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात शाहरूख खान आणि काजोल यांचे द्वंद्वगीत पाहताना प्रेक्षक इतका समरसून जातो की, शाहरूख खानच्या जागी आपणच आहोत आणि काजोलच्या जागी आपली प्रेयसी किंवा अनेकदा तर काजोललाच कायम ठेवून तो स्वित्र्झलडमध्ये गेलेला असतो. श्रीमंतीच्या या स्वप्नात रममाण झाले असाताना
 

पाठीत खुर्चीतील ढेकूण चावतो आणि क्षणार्धात हा आपला सामान्य प्रेक्षक स्वित्र्झलडमधून वास्तवात परत येतो. किमान स्वप्नात का होईना, पण स्वित्र्झलडच्या या सफरीला त्या चित्रपटगृहातील खुर्चीतल्या क्षुल्लक ढेकणाने तडा दिलेला असतो. आता मात्र हे स्वर्गीय सुख अनुभवण्यासाठी तेवढीच सुसज्ज थिएटर संस्कृती जन्माला आली आहे. सिंगल स्क्रीन थिएटरपेक्षा तिकिटांचे दर तिप्पट असूनही प्रेक्षक मल्टिप्लेक्सना पसंती देऊ लागले आहेत.
भारतातील चित्रपटगृहांची संख्या सुमारे १३ हजार आहे. त्यापैकी मल्टिप्लेक्स केवळ २२५ आहेत. मल्टिप्लेक्स स्क्रीनची आकडेवारी सुमारे ८५० आहे. असे असले तरी बॉक्स ऑफिस उत्पन्नापैकी ६०-६५ टक्के मल्टिप्लेक्समधून येते. त्यामुळेच गेले दोन महिने सिंगल स्क्रीन उपलब्ध असूनही हिंदी चित्रपट वितरकांनी बिग बॅनरचे चित्रपट प्रदर्शित केले नाहीत. केवळ महानगरेच नव्हे तर आता लहान लहान शहरांमध्येही मल्टिप्लेक्स संस्कृती मूळ धरू लागली आहे. पूर्वीच्या चित्रपटागृहांतील पंख्यांचा आणि काही वेळा प्रोजेक्टर्सचाही आवाज, कव्हर फाटलेल्या खुच्र्या, चित्रपटगृहातील अस्वच्छ स्वच्छतागृहे यामुळे चित्रपट पाहण्याचा १०० टक्के आनंद मिळत नव्हता. अर्थात तेव्हा अशा प्रकारच्या आनंदाची प्रेक्षकांना कल्पना नव्हती. मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटाचा अनुभव घेतल्यानंतर मात्र सिंगल स्क्रीनमध्ये जाऊन चित्रपट पाहणे त्यांना नकोसे होऊ लागले. गेल्या पाच वर्षांच्या काळात मुंबईतील जवळपास प्रत्येक उपनगरात मल्टिप्लेक्स उभारली गेली. त्यांना भरभरून प्रतिसादही मिळू लागला.
आर्थिक उदारीकरणानंतर भारतीय ग्राहकांची क्रयशक्ती वाढली. त्यामुळे चित्रपटांचे व्यसन असलेल्या भारतात मनोरंजन अधिकाधिक चांगले करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत होती. खरे तर केबल टीव्हीच्या आगमनानंतर भारतीय प्रेक्षक घरात बसून राहिला होता. घरच्या घरीच मनोरंजनाची द्वारे खुली झाल्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहापर्यंत येण्यासाठी त्याला ठोस कारण सापडत नव्हते. काही काळाने ‘डॉल्बी साऊंड’ या यंत्रणेचा बोलबाला होऊ लागला होता. त्यावेळी स्टर्लिग, इरॉस, रिगल इत्यादी ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली होती. त्यावेळी दर्दी प्रेक्षक सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर इंग्रजी चित्रपट पाहण्यासाठी डोंबिवली, ठाणे किंवा बोरीवलीपासून सीएसटी किंवा चर्चगेटपर्यंतचा प्रवास करत. १९९५ च्या दरम्यान दिल्लीत पहिले मल्टिप्लेक्स उभारले गेले आणि चित्रपट रसिकांना एक वेगळाच अनुभव मिळू लागला. स्वच्छ, सुगंधित चित्रपटगृह, वातानुकूलित यंत्रणा, अप्रतिम ध्वनीयंत्रणा यामुळे टीव्हीवर चित्रपट पाहण्यात समाधान मानणारा प्रेक्षक मल्टिप्लेक्सपर्यंत येऊ लागला. दुसरीकडे मॉल संस्कृती मूळ धरू लागली होती. प्रत्येक मॉलमध्ये मल्टिप्लेक्स असण्याची गरज निर्माण झाली. कारण मॉलमध्ये ग्राहकांना आणण्यासाठी मल्टिप्लेक्स हे विशेष आकर्षण असते. त्यामुळे मल्टिप्लेक्स चालकांना सवलतीच्या दरात या मॉलमधील जागा मिळते.
पूर्वी चित्रपट पाहायचा असला तर अ‍ॅडव्हान्स बुकिंग करणे भाग होते. तिकिटासाठी रांगेत उभे राहाण्याचा त्रास होता. मल्टिप्लेक्समध्ये मात्र फोनवरून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून तिकिटे ‘आरक्षित’ करण्याची सोय मिळू लागली. त्याचप्रमाणे ऐनवेळी चित्रपट पाहण्याचा प्लॅन ठरला आणि एक चित्रपट नाही मिळाला तरी दुसऱ्या स्क्रीनमध्ये दुसरा चित्रपट पाहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळेही प्रेक्षकांची मल्टिप्लेक्सला पसंती मिळू लागली.
मल्टिप्लेक्समध्ये दिवसाला किमान २० खेळ असतात आणि चित्रपटांची संख्या १० ते १२ असते. त्यामुळे प्रेक्षकांच्या वेळेप्रमाणे आणि पसंतीप्रमाणे भरपूर पर्याय उपलब्ध असतो. बहुतेक मल्टिप्लेक्स सकाळी सात किंवा आठ वाजता सुरू होतात. दिवसाचा पहिला शोसुद्धा हाऊसफुल्ल जातो. सुमारे ५० जणांची टीम सकाळपासून हा सगळा खेळ सुरू करते. त्यात तिकीटविक्री, कॅफे, प्रोजेक्शन, हाऊसकीपिंग असे विभाग असतात. वीकेण्डचे तीन दिवस हे मल्टिप्लेक्सचे सर्वाधिक फायद्याचे दिवस. त्यामुळे या दिवसांमध्ये या कर्मचाऱ्यांची कसोटी असते. मल्टिप्लेक्समधील प्रत्येक स्क्रीनची सुमारे साडेतीनशे एवढी आसनक्षमता असते. आठवडय़ाचा मल्टिप्लेक्सचा गल्ला सुमारे पस्तीस लाखांच्या आसपास असतो. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या तीन दिवसांतच पैसे वसूल करण्याचा ट्रेण्ड आहे. त्यामुळे ‘ओम शांती ओम’ किंवा ‘गजनी’ जेव्हा प्रदर्शित झाले त्यावेळी एकटय़ा मुंबईतच या चित्रपटांचे दिवसाला सुमारे पावणेतीनशे खेळ होत होते. चित्रपट हीट झाला की फ्लॉप याचे चित्र पहिल्या तीन दिवसांतच स्पष्ट होते. मल्टिप्लेक्सचालकांच्या दृष्टीने फक्त बुधवार हा वाईट दिवस मानला जातो. बाकी प्रत्येक खेळाला प्रेक्षक असतातच. एक खेळ सुरू करण्यासाठी किमान सहा प्रेक्षक असावेत, असा काही मल्टिप्लेक्सचालकांचा नियम असतो. कारण प्रेक्षकांची संख्या कितीही असली तरी वातानुकूलित यंत्रणेचा खर्च तेवढाच असतो. काही मल्टिप्लेक्सचालक मात्र एका प्रेक्षकासाठीसुद्धा खेळ सुरू करतात. आलेला प्रेक्षक परत जाऊ नये हे त्यांचे तत्त्व असते. त्यामुळेच निष्ठावान प्रेक्षक तयार होत असतात. आठवडय़ाभराचा हिशेब पाहिला तर साधारण १५ टक्के खेळ प्रेक्षकांअभावी रद्द करावे लागतात,असा अनुभव आहे.
बॉक्स ऑफिसच्या उत्पन्नाप्रमाणेच जाहिरात आणि कॅफे ही दोन उत्पन्नाची साधने मल्टिप्लेक्सचालकांच्या हातात असतात. मल्टिप्लेक्सला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी १० टक्के वाटा हा जाहिरातींतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा असतो तर कॅफेमधून सुमारे २० ते २५ टक्के उत्पन्न मिळते.
केवळ महानगरांतच नव्हे तर ‘बी’ आणि ‘सी’ केंद्रांमध्ये अर्थातच लहान-लहान शहरांमध्येसुद्धा आता मल्टिप्लेक्स उभारण्यात येऊ लागली आहेत. मुंबई पुण्यात तिकिटाचे दर १५०-२०० आहेत तर नाशिक, औरंगाबादमध्ये १०० रुपयांच्या आसापास तिकिटांचे दर असतात. आयनॉक्स, फन सिनेमाज, बिग सिनेमाज, मूव्हिटाइम, फेम, सिनेमॅक्स आणि पीव्हीआर या सात कंपन्यांची मल्टिप्लेक्स भारतात आहेत. मुंबई, दिल्लीपासून ते लखनौ, इंदूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, पिंपरी, कानपूर, दार्जिलिंग, मंगलोर, गाझियाबाद, आग्रा इत्यादी लहान शहरांमध्येही मल्टिप्लेक्स उभी राहू लागली आहेत. भारतात मल्टिप्लेक्स उभारणीसाठी १७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणाही एका मेक्सिकोच्या कंपनीने अलिकडेच केली. पहिल्या टप्प्यात ११० मल्टिप्लेक्स आणि २०१६ पर्यंत ५०० मल्टिप्लेक्स उभारण्याची त्यांची योजना आहे.
चाकोरीबद्ध चित्रपटांच्या पलिकडे जाऊन चित्रपटांमध्ये प्रयोगशीलता येण्यामागेही मल्टिप्लेक्स कारणीभूत आहेत. कारण यामुळे या चित्रपटांना एक निश्चित प्रेक्षकवर्ग लाभला आहे. भारतासारख्या चित्रपटप्रेमी देशात मल्टिप्लेक्सची मागणी वाढणे साहजिकच आहे. सामान्य प्रेक्षक एक चित्रपट पाहण्यासाठी १५० रुपये खर्च करण्याच्या आर्थिक परिस्थितीत नाही, अशी ओरड होत असली तरी वस्तुस्थिती काहीतरी वेगळेच दाखविते आहे. जिथे खुशबू, चिरंजीवी या अभिनेत्यांचे मंदिर उभारण्यात येते, अमिताभ आजारपणातून बरा व्हावा या साठी मंदीर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये नवस बोलले जातात, त्या ठिकाणी चित्रपट पाहायला प्रेक्षकांचा कधीच तुटवडा पडणार नाही, असा मल्टिप्लेक्सचालकांचा विश्वास आहे. आज ‘डायरेक्ट टू होम’सारख्या सेवांतर्फे ‘मूव्हि ऑन डिमांड’ ही सुविधा पुरविण्यात येत आहे. त्यात हवा तो चित्रपट घरच्या घरी पाहण्याची सोय आहे. ‘होम थिएटर सिस्टिम’ बसवून घरच्या घरी चांगल्या ध्वनियंत्रणेतही चित्रपट पाहता येऊ शकतो. अशा सुविधा कितीही वाढल्या तरी प्रेक्षकांना मोठय़ा पडद्याचे कायम आकर्षण राहणार आहे. त्यामुळे रोजच्या कटकटी तीन तासांसाठी बाहेर ठेवून एका मोहमयी दुनियेचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षक कायम तयार असतील, अशी मल्टिप्लेक्सचालकांची धारणा आहे.

उत्पन्नाची समसमान विभागणी व्हावी, या अटीवर हिंदी चित्रपट निर्माते आणि वितरक ठाम होते. मल्टिप्लेक्स चालकांना ही अट सुरुवातीला मंजूर नव्हती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे उत्पन्नाची विभागणी चित्रपटाने केलेल्या व्यवसायावर अवलंबून असावी. या वादामुळे गेले दोन महिने प्रेक्षकांना बडे स्टार असलेला एकही चित्रपट पाहायला मिळाला नाही. एकमेकांमधून विस्तवही न जाणारे आमीर आणि शाहरूख यासाठी एकत्र आले. दरम्यान, मल्टिप्लेक्स चालक आणि निर्माते-वितरक यांच्यातील चर्चा फिस्कटली होती. शेवटी ५ जून रोजी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत या वादावर तोडगा निघाला. पहिल्या आठवडय़ात वितरक आणि मल्टिप्लेक्स चालक यांच्यातील उत्पन्न विभागणीचे प्रमाण ५०:५० असेल, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आठवडय़ात निर्माते-वितरकांना मिळणाऱ्या उत्पन्नाची टक्केवारी ४२.५, ३७.५ आणि ३० टक्के असणार आहे. ज्या चित्रपटांना घवघवीत यश मिळेल त्यांना बोनस उत्पन्न मिळणार आहे. अशा चित्रपटांसाठी पहिल्या चार आठवडय़ांसाठी निर्माते-वितरकांना अनुक्रमे ५२.५, ४५, ३७.५ आणि ३० टक्के एवढा वाटा मिळणार आहे.

हालत खस्ता
मल्टिप्लेक्सचा उदय झाल्यापासून सिंगल स्क्रीनमध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याचे प्रमाण थंडावले. मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर दुसऱ्या किंवा कधीकधी तिसऱ्या-चौथ्या आठवडय़ात तो चित्रपट सिंगल स्क्रीनमध्ये झळकायचा. परिणामी बी आणि सी ग्रेडचे चित्रपटच सिंगल स्क्रीन टॉकीजमध्ये प्रदर्शित केले जायचे.
आता संपामुळे मल्टिप्लेक्सवाल्यांना दाखवायचे काय हा प्रश्न पडला? म्हणून मग सकाळी १० वाजताच्या स्लॉटमध्ये केवळ सरकारने अनिवार्य केले म्हणून प्रदर्शित केले जाणारे मराठी चित्रपट चार खेळ कधी तीन खेळ दाखविण्यास सुरुवात झाली. एका अर्थाने मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्सच्या मुख्य दालनात प्रवेश मिळाला ही सुखद गोष्ट वाटत असली तरी गल्ला गोळा करून देण्यात मात्र मराठी चित्रपट कमी पडत होते.
ठाण्याच्या सिनेवंडर मल्टिप्लेक्समध्ये चार स्क्रीन आहेत. त्यात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची यादी लांबलचक असली तरी अगदी अलीकडे प्रदर्शित झालेला पुरुषोत्तम बेर्डे यांचा ‘निशाणी डावा अंगठा’ आणि संप सुरू झाल्यानंतर ऐन निवडणुकीच्या धामधुमीत झळकलेला बिग बजेट मराठी चित्रपट महेश मांजरेकरचा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटांनीच मल्टिप्लेक्सला तुफान गल्ला गोळा करून दिला. एवढेच नव्हे तर या चित्रपटामुळे सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स अशा दोन्ही ठिकाणी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटामुळे कधी नव्हे ते हाऊसफुल्लचा बोर्ड लागला. निवडणूक, आयपीएल हे सगळे बॉक्सऑफिसवर परिणाम करणारे मुद्दे एका मराठी चित्रपटाने पार केले.
यासंदर्भात ठाण्यातील सिनेमॅक्स सिनेवंडर मल्टिप्लेक्सचे व्यवस्थापक यांनी संपादरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची माहिती दिली. ते म्हणाले की, ३ एप्रिलला संप सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या शुक्रवारी ८ टू १० तसवीर हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, नाइन्टी नाइन, फास्ट अ‍ॅण्ड फ्यूरियस, बोक्या सातबंडे, निशाणी डावा अंगठा, मॉन्स्टर व्हर्सेस एलियन, नऊ महिने नऊ दिवस, सुंदर माझं घर, झक मारली बायको केली, एक से बुरे दो, वन मॅन आर्मी, एक दी पॉवर असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा मराठी चित्रपट दणक्यात चालला, हीट झाला. हिंदी चित्रपटांना बऱ्यापैकी प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला असे सांगून ते म्हणाले की, थोडय़ाफार प्रमाणात ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला. परंतु, अन्य मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. सिनेवंडर मल्टिप्लेक्समध्ये संपादरम्यान मराठी चित्रपटांना किमान दोन आठवडे तरी चार खेळ मिळाले. परंतु ही सुवर्णसंधी मिळूनही फारसा प्रेक्षक प्रतिसाद मात्र लाभला नाही.
ठाण्यातील दुसरे मल्टिप्लेक्स - इटर्निटी मॉल तीन हात नाका येथे आहे. हिंदी सिनेमा नसल्यामुळे प्रेक्षकवर्ग घटला. परिणामी या मल्टिप्लेक्समधील रेड लाऊंजची आसनक्षमता वाढविण्यात आली. ११८ लोक बसू शकतील एवढी आसनक्षमता रेड लाऊंजमध्ये आहे. पण या संप काळात ती २३८ पर्यंत वाढविण्यात आली. ही क्लृप्ती करण्याचे कारण म्हणजे एकावेळी एक खेळ जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहिला तर तेवढा आर्थिकदृष्टय़ा फायदा व्हावा. दुसरे कारण असे की एका खेळाला अधिकाधिक प्रेक्षक आले तर त्यामुळे दिवसभरातील खेळांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेता येतो. त्याचप्रमाणे या रेड लाऊंजचे महागडे तिकीटदरही सिनेमॅक्स इटर्निटी मॉलने या काळात जवळपास ५० टक्क्यांनी कमी केले. त्याशिवाय इटर्निटी मॉलमध्ये मल्टिप्लेक्सबरोबरच कॅफेटेरिया, स्नॅक्स बार अशा सुविधाही असल्यामुळे त्याचा फायदा मल्टिप्लेक्सने घेतला. तिकिटासोबत स्नॅक्स वगैरेमध्ये सवलत देऊन प्रेक्षकांची गर्दी खेचण्याचा प्रयत्न केला.
एकंदरीत मल्टिप्लेक्सवाल्यांनी संप काळातील तोटा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी मराठी चित्रपटांचे खेळ केले, अनेक क्लृप्त्या लढविल्या खऱ्या पण बॉलिवुडपट हेच मल्टिप्लेक्सला तारू शकतात हेही सिद्ध झाले.
सुनील नांदगावकर

मराठी चित्रपट आणि मल्टिप्लेक्स
गेले दोन महिने महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्सची मदार मराठी चित्रपटांवरच अवलंबून होती. हिंदी चित्रपटनिर्मात्यांनी मल्टिप्लेक्सविरुद्ध पुकारलेले बंड मराठी चित्रपटांच्या पथ्यावर पडले. वर्षांकाठी मराठी चित्रपटांचे किमान १५० खेळ मल्टिप्लेक्समध्ये दाखविले पाहिजेत, असा शासनाचा नियम आहे. मे महिन्यात तब्बल नऊ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. मल्टिप्लेक्सचालकांनी याविषयी सांगितले की, मराठी चित्रपट पाहण्यासाठी मराठी प्रेक्षक १५० रुपये खर्च करायला तयार आहे, फक्त त्यांना त्या दर्जाचा चित्रपट हवा आहे. हिंदी आणि मराठी असे दोन्ही चित्रपट असण्याच्या काळात शनिवारी पाच लाखाचा गल्ला गोळा होत असे. गेल्या दोन महिन्यांत तुरळक हिंदी चित्रपट असताना उत्पन्न दोन लाखांच्या घरात होते. असे असले तरी मराठी निर्माते-वितरक चित्रपटांच्या प्रिंटच्या बाबतीत फार निष्काळजी असतात. ‘हाऊसफुल्ल’ होणाऱ्या चित्रपटांसाठीही जास्त प्रिंट काढल्या जात नाहीत. एकच प्रिंट वारंवार घासली जाते, त्यामुळे चित्राचा, आवाजाचा दर्जा घसरतो. पण याकडे वितरक फारसे लक्ष देत नाहीत. दर्जेदार मराठी चित्रपटांना योग्य प्रसिद्धी लाभली तर मल्टिप्लेक्समध्ये येऊन ‘हरी पत्ती’ खर्च करण्यास प्रेक्षकांची काही हरकत नसेल, असे मल्टिप्लेक्सचालकांना वाटते.

आतले आणि बाहेरचे
हा खेळ अखंड सुरू ठेवण्यात सकाळपासूनच ५० जणांची टीम कार्यरत झालेली असते. यात सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे ‘गर्दीचे व्यवस्थापन’. एकाच वेळी दोन स्क्रीनमधील चित्रपटांचे मध्यंतर झाले तर सुमारे ५०० प्रेक्षक बाहेर येतात. त्याचवेळी तिसऱ्या स्क्रीनमधील चित्रपट सुरू होणार असेल तर त्या प्रेक्षकांची भर पडलेली असते. अशा वेळी मल्टिप्लेक्समधील कर्मचाऱ्यांची कसोटी असते. लवकरात लवकर प्रेक्षकांना चित्रपटगृहात बसण्यास सांगणे, दुसरीकडे कॅफेमध्ये खाद्यपदार्थ घेण्यासाठी गर्दी झालेली असते. तेथे काही अफरातफर होणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागते. सामान्यांसाठी सुट्टीचे असणारे शनिवार आणि रविवार हे दिवस त्यांच्यासाठी सर्वात गर्दीचे असतात. त्यामुळे या दोन दिवशी तेथील कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळत नाही. एक खेळ संपल्यानंतर १० मिनिटाच्या काळात त्यांना चित्रपटगृह स्वच्छ करून घ्यावे लागते. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीला अनुसरून विविध प्रकारची माणसे रोजच्या रोज पाहायला मिळतात. त्यांच्याशी कधी वाद होतात, कधी त्यांची तक्रार असते. हे सर्व व्यवस्थितपणे सांभाळून घेणे हे मोठे जिकिरीचे काम असते.
तिकीट खिडकीच्या अलीकडचे आणि पलीकडचे हे दोन भाग आपोआपच पडलेले असतात. दीडशे रुपयांचे तिकीट काढले म्हणजे तीन तासांसाठी आपण या जागेचे मालक झालो, अशी अनेक प्रेक्षकांची भावना असते. त्यांना तोंड देणे मल्टिप्लेक्समध्ये काम करणाऱ्यांसाठी आव्हान असते. एसी खूप असल्याने थंडी वाजत असल्याच्या तक्रारी अनेकदा येतात. यावेळी मल्टिप्लेक्स कर्मचारी खरे तर काही करू शकत नाहीत. कारण ती सेंट्रलाईझ वातानुकूलित यंत्रणा असते. त्यामुळे प्रेक्षकांची संख्या कमी असली तर एसी जास्त जाणवतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो की, मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जायला परवानगी नसते. कारण त्यांच्या जागेत मिळणाऱ्या खाद्यापदार्थाची जबाबदारी मल्टिप्लेक्सचालकांची असते. त्यामुळेच बाहेरून काहीही घेऊन जायला परवानगी दिली जात नाहीत. पण यावरून बरेचदा वाद होतात. काही वेळा चित्रपटगृहात येणारी प्रेमी युगुले अनैतिक चाळे करत असतात. अशा वेळी हस्तक्षेप करावा लागतो. एकीकडे अशी कडक कारवाई करण्याबरोबरच काही मंडळींची वास्तपुस्त ठेवावी लागते. स्थानिक नगरसेवकांपासून, ते आमदार-खासदारांचीही ‘खास माणसे’ येतात. त्यांची खातरदारी करावी लागते. एन्टरटेनमेंट सुपरवायझर या पदावरील व्यक्तीसुद्धा अचानक मल्टिप्लेक्समध्ये येतात. तिकिटविक्री आणि प्रेक्षागृहात बसलेली माणसे यांची संख्या एकच आहे की नाही, यावर लक्ष ठेवणे ही त्यांची जबाबदारी असते. पण अशा वेळी फुकटात बसलेली मालकाच्या ओळखीची किंवा नगरसेवक, आमदार, खासदारांची काही माणसे असली तर या आकडेवारीत फरक आढळतो. अशा वेळी तो एन्टरटेनमेंट सुपरवायझर खेळ बंद पाडण्याचा हुकू देऊ शकतो. हे मल्टिप्लेक्सला परवडणारे नसते. त्यामुळे प्रसंगी या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना ‘मिठाई’ देण्यात येते. एकाच वेळी सामान्य प्रेक्षक, ‘खास माणसे’ आणि प्रशासकीय कर्मचारी या तीनही प्रकारच्या प्रेक्षकांना तोंड देण्याची जबाबदारी खिडकीपलीकडील माणसांची असते.
सुनील डिंगणकर
sunil.dingankar@expressindia.com