Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

भाजपमधील अंतर्गत कलहात उतरणे महागात पडले
नवी दिल्ली, १३ जून/खास प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांच्या पत्रामुळे भाजपमध्ये निर्माण झालेला कलह शमलेला नसतानाच आज उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी पक्षातील सर्व पदांचे राजीनामे देऊन रोष व्यक्त केला. राजीनाम्याचे अस्त्र उपसून सिन्हा यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनाच लक्ष्य केले. सिन्हा यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजपश्रेष्ठींनीही तातडीने पावले उचलत सिन्हा यांचा राजीनामा मंजूर केला आणि त्यांचे अस्त्र बूमरँग झाल्याचे दाखवून दिले.

राजकीय दबाव झुगारून गुंडांना तडीपार करणारे पोलीस आयुक्तच नाशकातून तडीपार!
नाशिक, १३ जून / प्रतिनिधी
शहरात अलीकडे अक्षरश: निर्माण झालेले गुंडाराज संपविण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत गुंडांविरुद्ध तडीपारी तसेच मोक्का सारखे कडक उपाय योजणारे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांची तडकाफडकी बदली झाल्याने नाशिककरांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कुणाचाही दबाव न घेता गुंडांविरुद्ध थेट कारवाई सुरू केल्यामुळे नाराज झालेल्या राजकारण्यांकडून व विशेषत: सत्ताधारी मंडळींकडून त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत होते.

हसन गफूर यांच्यावर अखेर बदलीची कुऱ्हाड डी. शिवानंदन नवे पोलीस आयुक्त
मुंबई, १३ जून / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आलेले मुंबईचे पोलीस आयुक्त ख्वाजा हसन गफूर यांची आज महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळाच्या महासंचालकपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली. गफूर यांच्या जागी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त डी. शिवानंदन यांची वर्णी लागली आहे.

पद्मसिंह पाटील यांच्या घराला ‘सील’ ठोकले
मुंबई, नवी मुंबई, १३ जून / प्रतिनिधी

काँग्रेसनेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित नेते व खासदार पद्मसिंह पाटील यांच्या कुलाबा येथील घराला ‘केंद्रीय अन्वेषण विभागा’ने (सीबीआय) आज ‘सील’ ठोकले. पाटील यांना गेल्या रविवारी निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आल्यापासूनच त्यांची कसून चौकशी केली जात आहे. शुक्रवारीही चौकशीचा आणि तपासाचा भाग म्हणून सीबीआयचे अधिकाऱ्यांनी निंबाळकर यांची ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली त्या ठिकाणी म्हणजेच कळंबोळी येथे जाऊन पुन्हा एकदा निंबाळकर यांची कशाप्रकारे हत्या करण्यात आली असावी, याचे प्रात्यक्षिक करून पाहिले.

शिवसेना ‘एसएससी’ विद्यार्थ्यांच्या पाठीशी
मुंबई, १३ जून / प्रतिनिधी

माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी चालविण्यात येते. त्यामुळे एसएससीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील (अकरावी) प्रवेशासाठी प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ९० टक्के राखीव जागा ठेवण्याच्या निर्णयाची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी तसेच हा निर्णय न्यायालयात टिकला पाहीजे याचीही काळजी सरकारने घ्यावी. एसएससीच्या विद्यार्थ्यांवरील अन्याय शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज दिला.

मंत्र्याच्या घरात घुसू, रस्त्यावर उतरू
सीबीएसई, आयसीएसईच्या शाळा केंद्रीय बोर्डाच्या आहेत. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्र सरकारकडे हट्ट धरावा. इथे त्यांचे चोचले पुरविले जाणार नाहीत. ९० टक्के कोटय़ामुळे एसएससीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क मिळणार आहे. ९० टक्के कोटा लागू झाला नाही तर आम्ही मंत्र्यांच्या घरात घुसू, रस्त्यांवर उतरू.
- सुधाकर तांबोळी, उपाध्यक्ष, मनविसे

दक्षिण आफ्रिका उपान्त्य फेरीच्या उंबरठय़ावर
लंडन, १३ जून / पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर एट’मधील आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद करीत दक्षिण आफ्रिकेने उपान्त्य फेरीच्या दिशेने आगेकूच सुरू केली असून आता ते फक्त एक पाऊल मागे आहेत. मंगळवारी त्यांची भारताशी अखेरची ‘सुपर एट’ लढत होईल. अर्थात, त्यांनी तीनपैकी दोन सामने जिंकलेले असल्यामुळे त्यांचा उपान्त्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे. दक्षिण आफ्रिकेने आज आपल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर २० धावांनी मात केली. त्याआधी, त्यांनी ‘सुपर एट’च्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडलाही नमविले आहे. दक्षिण आफ्रिकेने आज प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजपुढे १८४ धावांचे आव्हान ठेवले. ते पार करताना वेस्ट इंडिजने ९ बाद १६३ धावांपर्यंत मजल मारली. हा या स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा सलग सहावा विजय होता. वेस्ट इंडिजला आजही ख्रिस गेलच्या चमकदार खेळाची साथ लाभली नाही. परिणामी, पुन्हा एकदा ड्वेन ब्राव्हो व लेन्ड्ल सिमन्स ज्यांनी भारताविरुद्ध विजयात सिंहाचा वाटा उचलला होता, त्यांच्यावर विंडीजची सारी मदार होती. सिमन्सने त्या अपेक्षांना जागत ७७ धावांची खेळीही केली. पण त्याला इतर फलंदाजांकडून साथ न लाभल्याने विंडीजला पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेची आजची कामगिरी पुन्हा एकदा परिपूर्ण अशीच होती. गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रात आज त्यांनी वेगळा ठसा उमटविला. ३५ वर्षीय गिब्सने ३५ चेंडूंत ५५ धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेच्या धावांत मोलाचा वाटा उचलला. त्याखालोखाल जॅक कॅलिसने ४५, कर्णधार ग्रॅमी स्मिथने ३१ धावांची खेळी केली.

वीजरोधक यंत्रे बसविण्याच्या सूचना
मुंबई, १३ जून / प्रतिनिधी

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जागा निश्चित करून वीजरोधक यंत्रे बसविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती पुनर्वसन आणि मदतकार्यमंत्री दिलीप देशमुख यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. मराठवाडय़ात पावसाळ्याच्या दिवसांत विजेने मोठय़ा प्रमाणावर होणारी जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी आठही जिल्ह्यांना शासनाने निधी उपलब्ध करून देऊन वीजरोधक यंत्रे बसवावी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना आर. एम. वाणी यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना दिलीप देशमुख म्हणाले की, १३ जिल्ह्यांमधील काम पूर्ण झाले असून २० जिल्ह्यांतील काम व्हावयाचे आहे. वीज भिंतीवर पडून ती भिंत अंगावर पडल्याने जीवितहानी झाल्यास संबंधितांना नुकसानभरपाई देण्यात येत नसे. त्यामुळे वीज पडून मृत्यू हे मुख्य कारण असल्याने तशा प्रकारची सुधारणा असलेला शासकीय आदेश काढण्यात येईल, असेही दिलीप देशमुख यांनी सांगितले.

 

महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी