Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

पोलिसांना बांगडय़ांचा आहेर!
औरंगाबाद, १३ जून/प्रतिनिधी

अख्ख्या औरंगाबादला हादरवून टाकणाऱ्या मानसी देशपांडे हत्याकांडाने शहरवासियांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली असून, तिच्या माथेफिरू मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीने केली. पोलीस प्रशासनाचा वचक गुन्हेगारांवर राहिला नसल्याने प्रशासनाने बांगडय़ा भरून घ्याव्यात, अशी भावना व्यक्त करीत महिलांनी पोलीस आयुक्तांना बांगडय़ा भेट दिल्या.

साश्रुनयनांनी मानसीला निरोप; शेकडो शहरवासीयांचा उत्स्फूर्त सहभाग
औरंगाबाद, १३ जून/प्रतिनिधी

मानसी देशपांडे हत्याकांडाने हादरलेल्या शहरवासियांनी सायंकाळी तिच्या अंत्ययात्रेत शेकडोच्या संख्येने सहभाग घेतला. कैलासनगरातील वैकुंठधामात मानसीचे वडील शंकर देशपांडे, भाऊ अनिकेत, मामा, मामी, मावशी, काकांसह असंख्यांनी साश्रुनयनांनी तिला अखेरचा निरोप दिला.
अहिंसानगरातील पूर्वा अपार्टमेन्टमध्ये भावासह राहणाऱ्या मानसी देशपांडेचा अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला. हा प्रकार गुरुवारी पहाटे २ ते ५ दरम्यान घडला.

दुसरे घोरपडे
‘मग काय, तुम्हाला यायला-जायला गाडी देऊ की काय?’नवी नोकरी. पहिला दिवस. तो संपता संपता साहेबांनी असा तिरकस प्रश्न विचारला होता. लेख तातडीने ‘फोटो कम्पोज’साठी द्यायचे होते. शिपाई नव्हता. पाच किलोमीटर लांब जायचे-यायचे होते. सायकलवरून जायचे. तेच सांगायला गेलो होतो. ‘आजचा दिवस करीन. रोज जमणार नाही.’ त्यावर साहेबांनी असा तिरकस प्रश्न विचारला. बाहेर पडताना मनात आले, ‘इथं फार दिवस जमणार नाही.’ पण जमलं. नवी, चांगली नोकरी मिळेपर्यंत तब्बल १४ महिने तिथे टिकून राहिलो. साहेबांची दादही मिळवली.

युवक काँग्रेसच्या मेळाव्यात प्रचंड गोंधळ
औरंगाबाद, १३ जून/खास प्रतिनिधी

शक्तीप्रदर्शनावरून औरंगाबाद युवक काँग्रेसच्या मेळाव्यात शनिवारी प्रचंड गोंधळ झाला. शहराध्यक्षपदाच्या वादावरून शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम खान आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक व संयोजक प्रमोद राठोड यांच्या समर्थकांत जोरदार वाद झाला. या वादातूनच कार्यकर्त्यांनी खुच्र्या फेकल्या. औरंगाबाद शहरात युवक काँग्रेस मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबादवासीय असुरक्षित- राजेंद्र दर्डा
औरंगाबाद, १३ जून/खास प्रतिनिधी

औरंगाबाद शहरात मानसी देशपांडे या तरुणीच्या निर्दयी हत्येची गंभीर घटना घडली. औरंगाबाद शहरवासीयांच्या मनात या घटनेने असुरक्षितता निर्माण केलीच, परंतु त्यांच्यामध्ये मोठी चीडही निर्माण झाली. औरंगाबाद शहर एवढे असुरक्षित व्हावे, याची लोकप्रतिनिधी म्हणून चिंता वाटत असल्याचे मत काँग्रेसचे आमदार राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली. औरंगाबाद शहरात मानसी देशपांडे हिच्या हत्येसारखी निर्घृण घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती.

शेतात वीज कोसळून पिता-पुत्र ठार
बीड, १३ जून/वार्ताहर

पावसामध्ये भुईमुगाचा पाला भिजू नये म्हणून तो झाकण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राच्या अंगावर वीज कोसळून ते जागीच गतप्रश्नण झाल्याची घटना मौजे चाटगाव येथे शुक्रवारी घडली. बीड जिल्ह्य़ातील चाटगाव (ता. धारूर) येथील दगडू भागोजी तागड (वय ४०) यांचे धनगर वस्तीमध्ये घर असून लगतच शेत आहे. शुक्रवारी सायं. ५ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. भुईमुगाचा पाला पावसामुळे भिजू नये तसेच उडून जाऊ नये यासाठी दगडू तागड व मुलगा श्रीकृष्ण (वय १५) हे दोघे भुईमुगाच्या पाल्याच्या ढिगाकडे पळत गेले. पाल्यावर आच्छादन टाकीत असताना कडकडाटासह कोसळलेली वीज त्यांच्या अंगावर पडल्यामुळे ते भाजून जमिनीवर पडले. दगडूची पत्नी त्या दोघांपर्यंत येईस्तोवर त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

विजेच्या धक्क्य़ाने मुखेड तालुक्यात एक जण ठार
नांदेड, १३ जून/वार्ताहर

वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसात विद्युत खांबावरील मुख्य तार तुटून झालेल्या दुर्घटनेत अप्पाराव मारोती गोपनर (वय ४२) यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी ९ वाजता मुखेड तालुक्यातल्या येवती गावाजवळ ही घटना घडली. मुखेड तालुक्यातल्या बहुतांश भागात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वाऱ्यामध्ये तालुक्यातल्या येवती गावाजवळील एका शेतामध्ये एम.एस.ई.बी.चा विद्युत खांब आडवा झाला. खांब जमिनीवर पडल्याने विद्युत ताराही जमिनीवरच होत्या. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली. आज सकाळी येवती येथील शेतकरी अप्पाराव गोपनर शेताकडे जात असताना त्यांचा विद्युत तारेला स्पर्श झाला व शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मुखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.

धोकादायक इमारती आठ दिवसांत पाडण्याचे आदेश
लातूर, १३ जून/वार्ताहर

पावसाळ्याच्या दिवसात धोकादायक बांधकाम पडून कुठलीही अप्रिय घटना घडू नये याकरिता येत्या आठवडय़ात संबंधितांनी धोकादायक इमारती स्वत:हून पाडाव्यात, असा आदेश नगरपालिकेने जारी केला आहे. पावसाळा सुरू झाला असून शहराच्या जुन्या गावभागात अनेक बांधकामे अनेक वर्षाची जुनी असून ती धोकादायक अवस्थेत उभी आहेत. पावसाळ्याच्या दिवसात केव्हाही अशी बांधकामे पडून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशी बांधकामे स्वत:हून येत्या आठवडाभरात महाराष्ट्र न. प. नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १९५(१५२) अन्वये काढून घ्यावीत, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.

आपत्ती व्यवस्थापनावर हिंगोलीत कार्यशाळा
हिंगोली, १३ जून/वार्ताहर

जिल्ह्य़ात दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीमुळे फार मोठे नुकसान झाले होते. पुरात अडकलेल्या लोकांचा जीव वाचविण्यासाठी सैन्याच्या मदतीने हेलिकॉप्टरचा वापर करावा लागला. याची दखल घेऊन अशाप्रसंगी प्रशासन सज्ज राहावे यासाठी हिंगोलीत सात दिवसांची आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा घेण्यात आली. ६ जून ते १२ जून यादरम्यान आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा घेण्यात आली. शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या अध्यक्षतेखाली तिचा समारोप झाला.
याप्रसंगी श्री. तुम्मोड यांनी नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणेत सामील असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थनातील दूरध्वनी, भ्रमणध्वनी चालू ठेवावेत व सर्वानी सहकार्याची भावना ठेवण्याच्या सूचना केल्या. कार्यशाळेत कमांडर बी. एन., केंद्रीय राखीव पोलीस दल, एनडीआरएम, तळेगाव, पुणे येथील पथकाने पूर, भूकंप, आग अशा संकटांना तोंड देण्याच्या दृष्टीने प्रश्नत्यक्षिक करून दाखविले आणि सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

प्रश्नणघातक हल्ला करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नांदेड, १३ जून/वार्ताहर

दोघांवर प्रश्नणघातक हल्ला करणाऱ्या तिघांविरुद्ध भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना समतानगर परिसरात घडली. समतानगर परिसरात राहणारे विनोद घोडजकर व त्याचा भाऊ मनोज हे उभे असताना सुनील मानपाडे, त्याचा भाऊ अनिल व स्वप्नील हे तिघे शस्त्रास्त्र घेऊन तिथे आले.व त्यांच्यावर प्रश्नणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सुनील मानपाडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर मनोज हा देखील गंभीर जखमी झाला. या दोघांना नांदेडच्या गुरू गोविंदसिंगजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनोद घोडजकर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही मानपाडे बंधूंना अटक केली आहे.

निलंगा तालुक्यात वृद्ध इसमाचा खून
निलंगा, १३ जून/वार्ताहर

मन्नतपूर (गव्हाण) येथे ७५ वर्षीय वृद्ध जब्बारमियाँ उस्मानमियाँ देशमुख यांचा तीक्ष्ण हत्याराने गळा कापून खून करण्याची घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील मन्नतपूर (गव्हाण) येथील मयत जब्बारमियाँ देशमुख हे स्वत:च्या घरासमोरील खोलीत झोपले असता गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. घटनेनंतर मयतावर चादर टाकून आरोपी पसार झाले. या प्रकरणी मयत जब्बारमियाँ यांचा मुलगा जावेद देशमुख यांनी निलंगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अजमेरसाठी विशेष रेल्वे महिना अखेरीस धावणार
औरंगाबाद, १३ जून/खास प्रतिनिधी

गरीब नवाजच्या भक्तांसाठी निझामाबाद ते अजमेर ही विशेष रेल्वे जून महिन्याच्या चौथ्या आठवडय़ात धावणार असल्याची माहिती मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी दिली. दक्षिण-मध्य रेल्वेचे महाप्रबंधक एस. के. शर्मा, भारतभूषण, व्ही. राव आणि नांदेड विभागाचे व्यवस्थापक अरविंद कुमार यांनी केलेल्या प्रयत्नामुळे ही विशेष रेल्वे सुरू होत आहे. २४ जून ते १० जुलैदरम्यान अजमेर येथे ऊरस होत आहे. या उरसासाठी विशेष रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे समितीने केली होती. ही मागणी रेल्वे प्रशासनाने मान्य केली. येत्या २४ जूनला रात्री निझामाबाद येथून ही विशेष रेल्वे अजमेरला रवाना होणार आहे. नांदेड, परभणी, जालना, मनमाड, जळगाव, सुरत, बडोदा, अहमदाबाद, आबू रोड, पालिताना, मारवाडमार्गे ही रेल्वे अजमेरला जाणार आहे. या रेल्वेचे वेळापत्रक येत्या सोमवारपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. यंदा रेल्वे प्रशासनाने नगरसोल ते तिरुपती, अकोला ते विजयवाडा, औरंगाबाद ते पंढरपूर आणि आदिलाबाद ते मुंबई या गाडय़ा सुरू केलेल्या आहेत.

निष्काळजीपणे वाहन रस्त्याच्या बाजूला ठेवणाऱ्या मालकास सहा महिन्यांची कैद
औरंगाबाद, १३ जून/खास प्रतिनिधी

बीड रस्त्यावर निष्काळजीपणे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला ठेवणाऱ्या तातेराव गणपत तांबे याला सहा महिने कैदेची शिक्षा ठोठावण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. बाफना यांनी दिले आहेत. तसेच या आरोपीने फिर्यादी डॉ. बाबू मोरे यांना १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. औरंगाबाद-बीड महामार्गावर निपाणी फाटय़ावर तातेराव गणपत तांबे यांनी आपले ट्रॅक्टर ट्रॉलीसह उभे केले होते. मात्र ट्रॅक्टर उभे करताना त्यांनी लाल दिवा लावलेला नव्हता. ही घटना ८ सप्टेंबर २००१ ची. त्या दिवशी सकाळी साडेसात वाजता फिर्यादी डॉ. बाबू मोरे यांची मोटरसायकल ट्रॅक्टरला जाऊन धडकली. त्यामुळे त्यांच्या मोटरसायकलचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस प्रकाश व्यंकटेश महाजन यांची गाडी ट्रॅक्टरवर जावून आदळली. डॉ. बाबू मोरे यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. तपास अधिकारी तुकाराम मोहिते यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. भादंवि २७९ आणि ३३७ अन्वये तातेराव गणपत तांबे यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारतर्फे रमाकांत भोकरे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात डॉ. मोरे यांना नुकसानभरपाई म्हणून १५ हजार रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

कुस्ती स्पर्धा लातूरच्या भैय्या पाटीलने जिंकली
औरंगाबाद, १३ जून/खास प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अरविंद जाधव पाटील यांनी संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत लातूरच्या भैय्या पाटीलने सिल्लोडच्या संदीप पाटीलवर मात करून पहिले स्थान पटकाविले. त्याला तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले. या स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे मराठवाडा संघटक सुभाष पाटील, जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर, जिल्हा सचिव अरविंद धीवर, महिला जिल्हाध्यक्षा संध्या पाटील यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ भास्कर गाडेकर यांच्या हस्ते झाला.

वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो उलटून एक ठार, ५० जण जखमी
बीड, १३ जून/वार्ताहर

लग्न घेऊन जाणारा टेम्पो देवळ्याच्या घाटामध्ये उलटून झालेल्या अपघातात एकजण ठार, तर ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बीड जिल्ह्य़ातील मस्सा (ता. गेवराई) येथील वऱ्हाडी मंडळी १३ जूनला सकाळी अण्णा सलगर यांच्या विवाहासाठी हिवरापहाडी येथे टेम्पोमध्ये बसून जाताना खडकी देवळा घाटात टेम्पो मागे घेण्याच्या नादात उलटला. यात एकजण जागीच ठार झाला, तर सुदर्शन थोरात, नीलावती सोमाने, राधामती सरगल, पार्वती सरगल, बबन सरगल, गणेश बर्गे, मच्छिंद्र होरकरे, अनंता नलभे, अंसाबाई नलभे, बप्पा नलभे, सुंदरा नलभे, सतीश देवकते, पांडु देवकते, ईश्वर कांबळे यांच्यासह ५० जण जखमी झाले आहेत.

विभागीय क्रीडासंकुलाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
औरंगाबाद, १३ जून/खास प्रतिनिधी

गारखेडा सूतगिरणीच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या विभागीय क्रीडासंकुलाचे काम वेगाने चालू आहे. या क्रीडासंकुलाला जिल्हाधिकारी संजीव जैस्वाल यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
या क्रीडासंकुलाचे काम जवळपास पूर्णत्वाकडे गेले आहे. या संकुलातील मुख्य सभागृह, वसतिगृह आणि विविध खेळांचे सभागृह यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. राहिलेली किरकोळ कामे, रंगकाम आदी लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत.

सलीम अली सरोवर सुशोभीकरण गतीने करावे- जिल्हाधिकारी
औरंगाबाद, १३ जून/खास प्रतिनिधी

दिल्ली गेटजवळील सलीम अली सरोवराच्या परिसराच्या विकासाची व सौंदयर्ाीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी अधिक गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजीव जैस्वाल यांनी दिल्या आहेत. सलीम अली परिसराला भेट देऊन त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना या सूचना केल्या. कुंपणाची दुरुस्ती, तलावामध्ये टॉवरपर्यंत जाण्याचा मार्ग आणि टॉवर असलेल्या बेटांचे सौंदर्यीकरण याबाबत आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. हे काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद शहराच्या सौंदर्यात भर पडून पर्यटन विकासासाठी मदत होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी संजीव जैस्वाल यांनी व्यक्त केली. पक्षीप्रेमींचेही उद्दिष्ट सफल होईल, असेही ते म्हणाले.

बियाणे वाणाच्या वाढत्या प्रचारामुळे शेतक ऱ्यांपुढे संभ्रम
सिल्लोड, १३ जून /वार्ताहर

निवडणूक प्रचाराप्रमाणे बियाणे उत्पादक कंपन्यांनी बियाणे वाणांचा प्रचार आणि प्रसार सुरू केल्याने सर्वसामान्य शेतक ऱ्यांना कोणते बियाणे घ्यावे हा प्रश्न पडला आहे. दरवर्षी बाजारात नवनवीन बी-बियाणे दाखल होत आहे. त्यामुळे सर्वच कंपन्या आपल्या बियाणांची विक्रमी उत्पादन येण्याची हमी देत आहे. त्यामुळे कोणते बियाणे खरेदी करावे अशा द्विधा मनस्थितीत बळीराजा सापडला आहे. तर काही शेतकरी पूर्वी लागवड केलेले हमीचे कमी पाण्याचे बियाणे खरेदीवरच भर देताना दिसत आहे. यावर्षी शेकडो कंपन्यांनी बियाणे बाजारात आणल्याने बाजारमात्र बियाणांच्या शीतयुद्धाने गजबजला आहे. यावर्षी सर्वच वाणाच्या बियाणांच्या किमतीत मोठीच वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक ताळमेळ चुकत आहे. दरवर्षी बियाणांच्या किमतीत भरमसाठ वाढ होत आहे. यामुळे शेतकरी मोलामहागाचे बियाणे मात्र चांगले पारखूनच घेत आहे.

पावसाअभावी पेरणी रखडली
परतूर, १३ जून/वार्ताहर

पावसाळ्याचे मृग नक्षत्र लागून पाच-सहा दिवसांचा कालावधी लोटूनही अद्यापि पाऊस न पडल्याने तसेच आकाशात पावसाची कुठलीही लक्षणे दिसत नसल्याने मृग नक्षत्रात खरिपाची पेरणी होईल किंवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील शुक्रवारी रात्रीच्या सुमारास तालुक्याच्या काही भागांत बऱ्यापैकी पाऊस पडला. त्यानंतर शनिवार व रविवारी दिवसभर पावसाळी वातावरण होते. त्यामुळे पावसाची आशा वाटत होती; परंतु सोमवारनंतर पुन्हा कडाक्याच्या उन्हाला सुरुवात झाली आहे. तापमानात वाढ होऊन पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. मृग नक्षत्रात खरीप हंगाातील मूग, उडीद, इतर पिकांची पेरणी, कापूस लागवड झाली तरच पिके चांगली जोपासतात असा शेतकऱ्यांचा जुना अनुभव आहे. मृग नक्षत्रात जर वेळेवर पाऊस पडला तर विहिरी, तलाव, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होऊन उन्हाळ्यात निर्माण झालेला पाणीप्रश्न मार्गी लागतो. परंतु मृग नक्षत्र लागून पाच-सहा दिवसांचा कालावधी उलटूनही पावसाचे आगमन झाले नसल्याने खरीप हंगामाची पेरणी होण्याची आशा मावळली आहे.

‘परळीच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध’
परळी वैजनाथ, १३ जून/वार्ताहर

परळी शहरातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी व विकासकामांसाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा भाजयुमो प्रदेशाध्यक्ष धनंजय मुंडे यांनी एकूण ८२ लाख रुपयांच्या गंगासागरनगर ते उखळवेस या ४० फूट रुंदीच्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी परळी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते दत्ताप्पा ईटके, विलास डुबे, गटनेते जुगलकिशोर लोहिया, बांधकाम सभापती शारदा काटकर, महिला व बालकल्याण सभापती भारती कुलकर्णी, स्वच्छता सभापती वैजनाथ बागवाले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक नगरसेवक दीपक देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनुक्रमे किशोर केंद्रे व प्रकाश लोखंडे यांनी केले. याप्रसंगी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.