Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भाजपमधील अंतर्गत कलहात उतरणे महागात पडले
नवी दिल्ली, १३ जून/खास प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांच्या पत्रामुळे भाजपमध्ये निर्माण झालेला कलह शमलेला नसतानाच आज उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी पक्षातील सर्व पदांचे राजीनामे देऊन रोष व्यक्त केला.

 

राजीनाम्याचे अस्त्र उपसून सिन्हा यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनाच लक्ष्य केले. सिन्हा यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजपश्रेष्ठींनीही तातडीने पावले उचलत सिन्हा यांचा राजीनामा मंजूर केला आणि त्यांचे अस्त्र बूमरँग झाल्याचे दाखवून दिले.
लोकसभा निवडणुकांतील पराभवानंतर संसदीय पक्षात झालेल्या नियुक्त्यांमुळे नाराज असलेले सिन्हा यांनी उपाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यत्व आणि कर्नाटक प्रदेश भाजपच्या प्रभारीपदाचे राजीनामे राजनाथ सिंह यांच्याकडे पाठवून दिले. दिवसभर सिन्हा यांची समजूत काढण्याचे औपचारिक प्रयत्न केल्यानंतर भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी त्यांचा राजीनामा मंजूर करून सिन्हांनाच धक्का दिला. नैतिकतेच्या मुद्यावरून राजीनामे देत सिन्हा यांनी राजनाथ सिंह यांना चार पानी पत्र लिहून लोकसभा निवडणुकांनंतर केलेल्या नियुक्त्या आणि भाजपच्या एकूणच कामकाजावर आक्षेप घेतले होते. जसवंत सिंह यांच्याप्रमाणे सिन्हा यांनीही आपले पत्र प्रसिद्धी माध्यमांकडे पोहोचविल्याचे म्हटले जात आहे. लोकसभेवर निवडून आल्यामुळे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागल्याने जसवंत सिंह यांना वैफल्य आले आहे. लोकसभेत महत्त्वाची जबाबदारी, विशेषत विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणींपाठोपाठ उपनेतेपद मिळेल, अशी आशा सिन्हा यांना वाटत होती. पण अडवाणींवर यापूर्वीही संधी मिळेल तेव्हा टीका करणारे सिन्हा यांच्या नावाचा उपनेतेपदासाठी विचारच झाला नाही. केंद्रीय मंत्र्याच्या बरोबरीच्या सुविधा असलेल्या सार्वजनिक लेखा समितीच्या अध्यक्षपदासाठीही सिन्हा यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता नाही. या सर्व कलहात ‘शांत’ असलेले डॉ. मुरली मनोहर जोशी किंवा वादग्रस्त जसवंत सिंह यांच्यापैकी एका ज्येष्ठ नेत्याची या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यातच अडवाणी, लोकसभेचे उपाध्यक्ष करिया मुंडा, उपनेत्या सुषमा स्वराज, राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी आणि जसवंत सिंह यांच्यामुळे सिन्हा यांना लोकसभेतील पहिल्या बाकावरही स्थान मिळू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा पराभव होऊनही भाजपचे मुख्य रणनितीकार आणि निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख अरुण जेटली यांना राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपदाचे बक्षीस मिळाल्यामुळे तसेच लोकसभेत उपनेतेपदी सुषमा स्वराज यांची नियुक्ती झाल्यामुळे सिन्हाही नाराज आहेत. त्यामुळेच सिन्हा यांचा रोष अनावर झाल्याचे म्हटले जात आहे.
लोकसभा निवडणुकांतील पराभवानंतर विरोधी पक्षनेतेपद सोडण्याचा अडवाणींचा निर्णय योग्यच होता आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन आदर्श घालून द्यायला हवा, असे मत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. प्रत्यक्षात मेहनत करणाऱ्यांचे भाजपमध्ये साधे म्हणणेही ऐकून घेतले जात नाही, तर अपयशाचे बक्षीस देऊन कौतुक केले जाते. लोकसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर टाळले जाणारे आत्मपरीक्षण पक्षात अनेकांना मान्य नाही. निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्यांनी स्वतला क्लिन चीट दिली आहे. पक्षात पदे मिळविण्यासाठी नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. पक्षात जबाबदारी निश्चित करण्याचे तत्व लागू होऊच नये असे काही लोकांनी ठरवूनच टाकले आहे, अशी टीका सिन्हा यांनी राजनाथ सिंह यांना राजीनाम्यासोबत पाठविलेल्या पत्रात केली आहे.