Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राजकीय दबाव झुगारून गुंडांना तडीपार करणारे पोलीस आयुक्तच नाशकातून तडीपार!
नाशिक, १३ जून / प्रतिनिधी
शहरात अलीकडे अक्षरश: निर्माण झालेले गुंडाराज संपविण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत

 

गुंडांविरुद्ध तडीपारी तसेच मोक्का सारखे कडक उपाय योजणारे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांची तडकाफडकी बदली झाल्याने नाशिककरांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कुणाचाही दबाव न घेता गुंडांविरुद्ध थेट कारवाई सुरू केल्यामुळे नाराज झालेल्या राजकारण्यांकडून व विशेषत: सत्ताधारी मंडळींकडून त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत होते. त्यानुसार मिश्रा यांची बदली झाल्याने सर्वसामान्य नाशिककरांमध्ये प्रचंड क्षोभ व्यक्त होत आहे. राजकीय पक्षांच्या आड लपणाऱ्या गुंडांना तडीपार करणाऱ्या मिश्रा यांनाच अखेर सत्ताधाऱ्यांनी तडीपार केल्याची तसेच गुंडांपुढे सरकारचे हे लोटांगण असल्याची बोलकी आणि बोचरी प्रतिक्रिया उमटत आहे. मिश्रा यांची बदली रद्द व्हावी म्हणून विविध संस्था, संघटना रस्त्यावर उतरण्याची चिन्हे आहेत.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवासांपासून मोठय़ा प्रमाणावर गुंडगिरीचा उपद्रव सुरू आहे. गस्ती पथकावरील पोलिसाचा गुंडांच्या टोळक्याकडून झालेला खून असो की एकाच रात्री सिडको परिसरात ४० वाहने जाळण्याचा प्रकार असो अशा घटनांमुळे सर्वसामान्य नाशिककरांची पाचावर धारण बसली होती. बहुतेक गुंडांच्या टोळक्यांचे म्होरके राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याने त्याविरोधात पोलीस कारवाई करीत नसल्याचे बोलले जात होते. या पाश्र्वभूमीवर नुकतेच येथे दाखल झालेले पोलीस आयुक्त मिश्रा यांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता धडक कारवाई करीत राष्ट्रवादी, समता परिषद, मनसे, रिपाइं अशा राजकीय पक्ष-संघटनांशी संबंधित पदाधिकाऱ्यांविरुद्ध तडीपारीच्या नोटिसा बजावल्या तसेच पोलिसाच्या हत्येप्रकरणी ३१ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली. त्यामुळे मिश्रा यांच्याबाबत सर्वसामान्यांमध्ये प्रचंड आपुलकी निर्माण झाली असतानाच मिश्रा यांची बदली झाल्याने राजकारण्यांनी आपला ‘अडसर’ दूर केल्याचे बोलले जात आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मिश्रा यांच्या बदलीबाबत शंका उपस्थित होत होती. सत्ताधारी पक्ष व विशेषत: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ समर्थक गटाला ते नको असल्याची उघड चर्चा नाशिकमध्ये सर्वत्र आहे. त्यामुळे ही बदली प्रशासकीय कारणास्तव झाल्याचे सांगितले जात असले तरी वास्तवात भुजबळ यांच्यासारख्या सर्वार्थाने ‘सिनिअर’ असणाऱ्या नेत्याच्या जिल्ह्य़ातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बदली व ती देखील अशा वातावरणात त्यांना पूर्णपणे अंधारात ठेवून होणे अशक्य असल्याची नाशिककरांची भावना आहे.
दरम्यान, मिश्रा यांनी सुरू केलेल्या कारवाईला सर्वसामान्यांचे मोठय़ा प्रमाणावर समर्थन असल्याने त्यांच्या या बदलीविरोधात नाशिककरांनी रस्त्यावर उतरायचे ठरविले आहे. विविध पक्ष संघटना त्यासाठी सक्रीय झाल्या असून येत्या दोन दिवसांत त्यासाठी ठिकठिकाणी बैठका, सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सेना-भाजपतर्फे उद्यापासून शहरातल्या प्रत्येक वॉर्डात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे तसेच येत्या मंगळवारी मोर्चाही काढण्यात येणार असल्याची माहिती सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल बागूल यांनी दिली.
संमती की विनंती?
नाशिकचे पोलीस आयुक्त मिश्रा यांची बदली ही त्यांच्या विनंतीवरुनच झाल्याची माहिती आपल्याला गृहमंत्र्यांकडून देण्यात आली असे उपमुख्यमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. केंद्र सरकारतर्फे आयुक्तांना यापूर्वी केंद्रीय सेवेत घेण्याबाबत विचारणा झाली होती त्याला खुद्द आयुक्तांनी संमती दिली होती. थोडक्यात संमती हीच विनंती आहे त्यामुळे अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संमतीच्या फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली असे ते म्हणाले.