Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

हसन गफूर यांच्यावर अखेर बदलीची कुऱ्हाड डी. शिवानंदन नवे पोलीस आयुक्त
मुंबई, १३ जून / प्रतिनिधी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून परिस्थिती हाताळण्यात

 

अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आलेले मुंबईचे पोलीस आयुक्त ख्वाजा हसन गफूर यांची आज महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळाच्या महासंचालकपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली. गफूर यांच्या जागी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त डी. शिवानंदन यांची वर्णी लागली आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात गफूर यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेतली होती. मुंबई पोलिसांचे प्रमुख म्हणून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी गफूर यांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या निभावली नाही. त्याचमुळे दहशतवाद्यांनी तीन दिवस मुंबईकरांना वेठीस धरले होते, असा आरोप हल्ल्यानंतर शिवसेना-भाजपकडून करण्यात येऊन त्यांच्या बदलीची मागणी केली होती.
प्रधान समितीच्या अहवालवरून विधानसभेत गदारोळ होऊन हा अहवाल चर्चेसाठी आणण्याचा आणि गफूर यांची बदली करण्याची मागणी विरोधक करीत होते. परंतु प्रधान समितीचा अहवाल विधानसभेत चर्चेसाठी आणण्यापूर्वीच राज्याच्या गृहखात्याने आज गफूर यांची महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळाचे महासंचालक म्हणून पदोन्नतीवर बदली केली.
दरम्यान, १९७५च्या भारतीय पोलीस सेवेतील डी. शिवानंदन यांनी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळण्याआधी ठाणे, पुणे, नागपूर येथील आयुक्तपदाचा पदभारही सांभाळला आहे. त्यापूर्वी ते मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त होते. त्या वेळी त्यांनी मुंबईतील ‘गुंडाराज’ संपुष्टात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या काळात विविध टोळ्यांचे सुमारे ३०० गुंडांना कंठस्नान घातले गेले.
याशिवाय शिवानंदन यांनी केंद्रीय अन्वेषण विभागातही एक वर्ष काम केले. तेथेही त्यांनी अनेक संवेदनशील प्रकरणांचा छडा लावला. ठाण्याचे आयुक्त असताना त्यांनी पोलिसांच्या मुलांसाठी एक शाळाही बांधली होती.