Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पद्मसिंह पाटील यांच्या घराला ‘सील’ ठोकले
मुंबई, नवी मुंबई, १३ जून / प्रतिनिधी

काँग्रेसनेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित

 

नेते व खासदार पद्मसिंह पाटील यांच्या कुलाबा येथील घराला ‘केंद्रीय अन्वेषण विभागा’ने (सीबीआय) आज ‘सील’ ठोकले. पाटील यांना गेल्या रविवारी निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आल्यापासूनच त्यांची कसून चौकशी केली जात आहे. शुक्रवारीही चौकशीचा आणि तपासाचा भाग म्हणून सीबीआयचे अधिकाऱ्यांनी निंबाळकर यांची ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली त्या ठिकाणी म्हणजेच कळंबोळी येथे जाऊन पुन्हा एकदा निंबाळकर यांची कशाप्रकारे हत्या करण्यात आली असावी, याचे प्रात्यक्षिक करून पाहिले. या वेळी सीबीआयचे सहसंचालक ऋषीराज सिंगही उपस्थित होते. निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी पाटील यांच्या घरातूनही काही पुरावे सापडू शकतील म्हणून किंवा त्याविषयी माहिती मिळेल, यासाठी सीबीआयचे एक पथक आज सकाळी पाटील यांच्या कुलाबा येथील ‘शांघरिला’ अपार्टमेंटमध्ये असलेल्या घराची झडती घेण्यास गेले होते. मात्र त्या वेळी त्यांना पाटील यांचे घर बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराला ‘सील’ ठोकले व तेथे स्वत:चे सुरक्षा रक्षक तैनात केले.
जळालेल्या गाडीचे नमुने घेतले
पवनराजे निबांळकर हत्याप्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी खास दिल्लीहून आलेल्या फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने आज दिवसभर बेलापूर येथे तळ ठोकून या हत्याप्रकरणी सापडलेल्या वस्तूंची कसून तपासणी केली. पवनराजेंच्या मारेकऱ्यांनी हत्येसाठी वापरलेल्या गाडीचीही यावेळी या पथकाने तपासणी केली. पवनराजेंच्या हत्येनंतर ही गाडी मारेकऱ्यांनी पेटविली होती. ती गाडी सीबीआयच्या हाती लागली असून जळालेल्या अवस्थेतील या गाडीचे काही नमुनेही सीबीआयच्या तज्ञ पथकाने गोळा केले. सीबीआयचे अधिकारी याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांकडूनही माहीती घेत आहेत. विशेष म्हणजे, येत्या काही दिवसात पवनराजे यांची हत्या झाली तेव्हा नवी मुंबईत कार्यरत असलेल्या काही वरिष्ठ अधिकारीही लवकरच सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडतील, अशी शक्यता आहे.