Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

प्रादेशिक

पद उपलब्ध नसतानाही गफूर यांना पदोन्नती
मुंबई, १३ जून / खास प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर चौकशीसाठी नेमलेल्या राम प्रधान समितीचा अहवाल पुढील आठवडय़ात विधिमंडळात मांडल्यावर विरोधकांकडून होणारी टीका लक्षात घेऊन राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त हसन गफूर यांना महासंचालकपद रिक्त नसतानाही या पदावर बढती देऊन स्वत:ची सुटका करून घेतली आहे. राज्यात पोलीस महासंचालपदाच्या चार पदांना मंजुरी असताना जयंत उमराणीकर आणि गफूर यांच्या बढतीमुळे सध्या सहा पोलीस महासंचालक झाले आहेत.

राम प्रधान अहवालामुळेच गृहखात्याची चलाखी
निशांत सरवणकर, मुंबई, १३ जून

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याबाबत जबाबदार ठरवून पोलीस आयुक्त हसन गफूर यांची बदली केली जाणार असल्याची अटकळ राज्याच्या गृहखात्याने सपशेल फोल ठरविली. महासंचालकपदाचे पद उपलब्ध नसतानाही गफूर यांना मानाने पोलीस आयुक्तपदावरून दूर करण्याची चलाखी गृहखात्याने दाखविल्याचे दिसून येत आहे.

इतिहासाच्या पुस्तकातील नावे गाळण्याबाबत बोलता मग शिवसंग्रामच्या मंचावर जाऊन भाषणे कशी करता- कुळकर्णी
मुंबई, १३ जून/प्रतिनिधी

इतिहासाच्या शालेय पुस्तकांमधील विविध महापुरुषांची नावे गाळण्याबाबत ओरड करता मग ज्यांच्या दबावामुळे हे होते, त्या शिवसंग्रामच्या मंचावर जाऊन भाषणे कशी काय करता, असा सवाल आज राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य गुरुनाथ कुळकर्णी यांनी विरोधी सदस्यांना केल्याने विरोधकांची पंचाईत झाली.

जखमींची गर्दी उसळली
श्वेता देसाई/स्वाती खेर, मुंबई, १३ जून

सेन्ट्रलाइज्ड ‘इमर्जन्सी मेडिकल सिस्टिम’ (ईएमएस)ची गरज असल्याचे सरकारही मान्य करते. त्रिस्तरीय रुग्णवाहिका सेवा आणि त्यासाठी पूर्ण प्रशिक्षित कर्मचारी वर्ग अशी व्यवस्था असली पाहिजे. एकीकडे सरकारी, नागरी आणि खासगी इस्पितळांनी आपल्याकडील रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याचा वैयक्तिकरीत्या प्रयत्न केला; तर दुसरीकडे ‘इमर्जन्सी मेडिकल सव्र्हिसेस अॅक्ट’चा मसुदा तयार करण्याचा निर्णय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने ‘२६/११’च्या जेमतेम महिनाभर आधी घेतला होता. अमेरिकेत अशा पद्धतीची सेवा आहे.

स्कायवॉक ठरणार फ्लायओव्हरपेक्षाही भारी!
नाना चौकात ४५ कोटींचा स्कायवॉक

मुंबई, १३ जून / प्रतिनिधी

पादचाऱ्यांच्या सुविधेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ग्रँटरोड येथील नाना चौकात एकखांबी स्कायवॉक उभारण्याची योजना आखली आहे. या स्कायवॉकच्या उभारणीसाठी अंदाजे ४५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने, खर्चाच्या बाबतीत तो शहरातील अनेक मोठमोठय़ा फ्लायओव्हरपेक्षाही तो भारी ठरणार आहे.

निधी वापरून संपल्यावरही आलेल्या बातम्यांमुळे लतादीदी उद्विग्न
मुंबई, १३ जून/प्रतिनिधी

राज्यसभा सदस्यांना मतदारसंघातील विकास कामांसाठी दिला जाणारा निधी संपूर्णपणे वापरूनही विपरित बातम्या आल्यामुळे लता मंगेशकर यांनी आपली उद्विग्नता लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आपल्याकडे निधीसाठी विचारणा केली असता निधी वापरून संपला असल्यामुळे त्यांना आपल्याला तो देता आला नाही. माझा निधी मी अनेक विकास कामांसाठी दिलेला असतानाही अशा प्रकारच्या बातम्यांमुळे आपले मन व्यथित झाले आहे, असेही लतादीदी म्हणाल्या.

खासदार निधीचा वापर न होण्यास राज्य शासन व महापालिका जबाबदार - राजीव शुक्ला
मुंबई, १३ जून / खास प्रतिनिधी

उत्तर प्रदेशमध्ये खासदार निधीतील कामे अवघ्या दोन महिन्यांमध्ये मंजूर होतात. याउलट महाराष्ट्रात ही कामे मंजूर होण्यास २० महिन्यांचा कालावधी लागतो. कामे मंजूर करण्याकरिता समित्यांच्या घोळ घातला जातो. राज्य शासन व मुंबई महानगरपालिकेच्या कामाच्या पद्धतीत काही दोष असल्यानेच आपला खासदार निधीचा वापर होऊ शकला नाही, असा आरोप काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांनी आज केला.

आयुर्वेद महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश अधांतरी
राज्य सरकारच्या निष्काळजीपणाचा फटका
तुषार खरात , मुंबई, १३ जून
गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन’ने राज्यातील चार शासकीय व १६ अनुदानीत आयुर्वेद (बीएएमएस) महाविद्यालयांतील कमी केलेल्या जागांना यंदा फेरमान्यता मिळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे राज्यातील प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. उद्या, १४ जून रोजी आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या सीईटीचा निकाल जाहीर होणार आहे. परंतु, त्या पाश्र्वभूमीवर आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या कमी झालेल्या जागांना पुन्हा मान्यता मिळणार की नाही या काळजीत विद्यार्थी व पालक आहेत.

बँक लुटण्यासाठी आलेले दोन दरोडेखोर पोलीस चकमकीत ठार
मुंबई, १३ जून / प्रतिनिधी

बँक लुटण्याच्या उद्देशाने वडाळा येथे आलेले रमेश उपाध्याय टोळीचे दोन दरोडेखोर आज पहाटे पोलीस चकमकीत ठार झाले. रमेश उपाध्याय टोळीचे काही चोरटे वडाळ्याच्या नाडकर्णी पार्क येथील अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लुटण्यासाठी येणार असलची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच बँक परिसरात सापळा रचला होता. पहाटे पाचच्या सुमारास उपाध्याय टोळीचे दरोडेखोर ‘सॅन्ट्रो’ गाडीतून बँकेच्या परिसरात दाखल झाले असता सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी त्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले. मात्र त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जावळे आणि पोटे हे दोन्ही दरोडेखोर जखमी झाले. तर त्यांचे साथीदार गाडीतून शिवडीच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर जखमी झालेल्या जावळे आणि पोटेला पोलिसांनी के. ई. एम. रुग्णालयात नेले. परंतु दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जावळे आणि पोटेविरोधात विविध पोलीस ठाण्यात चोरीचे १५ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सीईटीचा आज निकाल
मुंबई, १३ जून / प्रतिनिधी

अभियांत्रिकी, आरोग्य विज्ञान व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल उद्या (रविवारी) सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरातील सुमारे अडीच लाख विद्यार्थी ‘सीईटी’साठी बसले होते. ५८ वैद्यकीय महाविद्यालयांमधील तीन हजार ७८५ जागा, २२१ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील ७१ हजार ७०१ जागा आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या १३१ महाविद्यालयांमधील सात हजार ६७५ जागांवर या ‘सीईटी’च्या माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहेत. निकालाची माहिती www.dte.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

गफूर यांच्या बदलीने शिवसेनेच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब - उद्धव ठाकरे
मुंबई, १३ जून / प्रतिनिधी

मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालक निष्काळजीपणे वागल्याचे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी वारंवार सांगितले होते. आता सरकारनेच पोलीस आयुक्त हसन गफूर यांची बदली केल्याने शिवसेनेच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी राज्यकर्ते आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करतात त्यापेक्षा जनतेची सुरक्षा जपणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नेमणूका करा. बुलेटप्रुफ जॅकेट, सुझलॉन, आश्रमशाळा असे राज्य शासनाच्या कारभारातील अनेक घोटाळे उघडकीस येत असल्याने सरकारचे वस्त्रहरण होत असल्याचे ते म्हणाले. अगोदर अफजल गुरूला फाशी द्या आणि नंतर कसाबला फासावर लटकवा या मागणीचा पुनरूच्चारही त्यांनी केला. पद्मसिंह पाटील यांचे केलेले निलंबन ही केवळ धूळफेक असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करायला हवी होती. तसेच त्यांनी खासदारकीचाही राजीनामा द्यायला हवा होता. शरद पवार पद्मसिंह यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही उद्धव यांनी यावेळी केला.