Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बहुरूपी
कालच हुबळीहून काही लोक
पोट्रेट पेंटिंगचे काम करून घेण्यासाठी
खास नगरला माझ्याकडे आले होते
आधी गुलमोहोर रोडवरील गॅलरी
व नंतर पाईपलाईन रोडवरील
स्टुडिओ बघून त्यांनी माझी भेट घेतली

 

हुबळीतील एका नामांकित
संस्थेचे संस्थापक
त्यांचे त्यांना तैलचित्र
करून हवे होते.
त्यांनी त्यांचे काही
फोटो मला दाखवले
आणि या आधी
काही अन्य कलाकारांनी
केलेल्या त्यांच्या
पेंटिंगचे फोटोही त्यात होते.
-----------------------
त्यांच्यातील एकाने
काही निवडक फोटो दाखवत
कोणत्या साईजचे
अन् कसे चित्र काढून हवे
हे सर्व सांगितले
आणि थोडे थांबून ते म्हणाले,
‘आम्ही बऱ्याच कलाकारांकडे गेलो
पण त्यांचे ‘डोळे’ काही
कोणाला नीट करता आले नाहीत’
-----------------------
माझ्या लक्षात आले
की त्या फोटोतील व्यक्ती
ही मुळातच तिरळी असल्याने
त्यांचे पेंटिंग त्यांना
सरळ डोळे असलेले
काढून हवे होते.
-----------------------
त्यातील एकजण म्हणाले,
‘आमचे साहेब हयात असताना
तिरळेपणाच्या ऑपरेशनची सोय नव्हती
आणि आता एवढय़ा मोठय़ा संस्थेत
त्यांचे असे फोटो लावणे
बरे दिसत नाही
आता तुम्हीच ते नीट करून द्या.
हे काम तुम्हीच करू शकता.’
हे ऐकून एवढय़ा लांब आम्ही
खास तेवढय़ासाठीच आलो आहोत.
मला क्षणभर
मी डोळ्यांचा डॉक्टर आहे की काय
असा अनुभव आला.
-----------------------
एकदा असाच
एक फोन आला
‘तुमच्याशी खासगीत
काही बोलायचे आहे कधी भेटू?’
असे फोनवरील व्यक्ती विचारत होती
मी त्यांना फोनवरच काय ते विचारा
असे सांगितले.
पण त्यांना प्रत्यक्ष भेटच हवी होती
त्यांना दिलेल्या वेळेप्रमाणे
ते पंचेचाळीस-पन्नास वर्षाचे दाम्पत्य
माझ्या ऑफिसमध्ये आले.
-----------
ऑफिसमध्ये आधीच
दोघेजण असल्याने
त्यांना सांगूनही ते बोलेनात
थोडं खासगीतलं काम आहे
हे ऐकून आधीचे दोघे बाहेर गेले
आणि त्यांना जरा हायसे वाटले
माझ्या हातात एक पाकीट देत
ते गृहस्थ म्हणाले,
‘आमच्या मुलीसाठी
हे स्थळ आलेलं आहे
आता तुम्हीच सांगा
काय करायचं ते?’
मी.. मी.. कसं सांगणार
(मी मनात म्हणालो)
आणि पाकीट उघडून पाहिले
तर त्या मुलाचा फोटो अन् कुंडली.
-----------------------
ते पाहत असतानाच
त्या बाई म्हणाल्या,
‘मुलगा तुमच्याच चित्रकलेतलं
काहीतरी जी. डी. आर्ट शिकलाय.
आम्हाला त्यातलं फारसं कळत नाही.
तर नगरमध्ये तुमच्याशिवाय
कोण आम्हाला माहिती देणार
आमच्या एकुलत्या एक
मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
मी त्याच्याकडून त्या मुलाचा
मोबाईल नंबर घेतला
आणि त्याच्याशी तो काय करतो,
किती कमवतो याबद्दल
चौकशी केली.’
-------------------------
तरीदेखील एवढय़ा माहितीवर
एखादं स्थळ नक्की करावं की नाही
हे सांगणं कठीण होतं.
तसे मी त्यांना सांगितलेदेखील.
तर त्या बाई म्हणाल्या,
‘अहो, तुमच्या हातात
फोटो अन् पत्रिका आहे
त्यावरून सांगा
स्थळ जमवायचं की नाही ते..’
(मी मनात म्हणालो)
अहो फोटो अन् पत्रिकेवरून
एखादं स्थळ जमत की नाही
हे सांगायला
मी काय ज्योतिषी आहे?
-------------------------
पूर्वी एकदा
असेच पोट्रेट काढून घ्यायला
एक गृहस्थ आले
आणि त्यांच्या दिवंगत आईची
दागिने घालण्याची हौस
त्यांनी माझ्याकडून पुरी करून घेतली.
ते चित्र काढण्याच्या निमित्ताने
दागिन्यांचे अनेक प्रकार
आणि त्यांच्या डिझाईनची वैशिष्टय़े
मला माहिती झाली.
तयार झालेले चित्र बघून
ते गृहस्थ फारच खूश झाले.
अन् म्हणाले,
‘कांबळे साहेब
तुम्ही तर एखाद्या
सोनारापेक्षाही भारी काम केले.
हे दागिनेदेखील
चित्रातून काढून घ्यावेसे वाटतात.’
-------------------------
अशीच अनेक कामे करताना
कधी कुणाच्या हेअर स्टाईलची
मागणी चित्रात पूर्ण केली
तर कधी फोटोतील पांढरे केस
काळे करून दिले
एखाद्याच्या
साध्या कपडय़ातील फोटोवरून
त्याला सूट घातलेला दाखवताना
मला चित्रकार असूनही
अनेक भूमिकांतून जावे लागते
आणि एकाच व्यवसायात
‘बहुरूपी’ होण्याचे भाग्य मला मिळते.