Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कमी गाळपामुळे यंदाही उलाढाल थंडच!
साखर उद्योग पुन्हा अनिश्चिततेत
नगर, १३ जून/प्रतिनिधी

यंदा ऊस लागवडीचे क्षेत्र किरकोळ वाढले असून या हंगामात साखरेचे उत्पादन ५० लाख मेट्रिक

 

टन राहील, असा अंदाज आहे. जिल्ह्य़ात सध्या ८७ हजार हेक्टर क्षेत्रावर खोडय़ासह उसाची लागवड झाली. दोन वर्षापूर्वी विक्रमी गाळप व उत्पादन करणारी साखर कारखानदारी आता मात्र निम्मेच गाळप करू लागली आहे. परिणामी साखर उद्योग पुन्हा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला. यंदाही गाळप कमी राहणार असल्याने साखर बाजाराची उलाढाल थंडच राहण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारपेठेत यंदा साखरेचे भाव वाढले आहेत. परंतु देशांतर्गत उत्पादन कमी झाल्याने साखर आयातीचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागला. साखरेच्या वायदेबाजारावरही बंदी आणली. साखर कारखाना साखरेवरही निर्बंध आणले गेले आहेत. व्यापाऱ्यांना दोन हजार क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करण्यास मनाई करण्यात आली. साखरेचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले. मात्र, तरीही भाव आटोक्यात आले नाहीत. एकीकडे आयात आणि दुसरीकडे कारखान्यांना निर्यातीस मर्यादा अशा कात्रीत साखर उद्योग सापडला आहे. ऊस लागवड व साखरेचे उत्पादन कमी राहिल्याने या उद्योगास मंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील साखर उद्योगही अडचणीतून जात आहे. गेल्या हंगामात अवघे ४९ लाख पोती साखरेचे उत्पादन झाले. त्यासाठी ४५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. यंदाही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत फक्त ७ हजार हेक्टरने ऊस लागवडीत वाढ झाली. गेल्या वर्षी ८० हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड झाली. यंदा ८७ हजार हेक्टर लागवड झाली आहे. यावर्षी ५३ लाख मेट्रिक टन ऊसाचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. साहजिकच यंदाही परिस्थिती फारशी समाधानकारक नसल्याचे स्पष्ट होते.
ऊसउत्पादन टिकवून ठेवण्यासाठी पावसाची गरज आहे. उन्हाळ्याच्या तडाख्याने, विशेषत दुष्काळी टापूतील ऊस जळण्याचे प्रमाण वाढले आहे. पाथर्डी, शेवगाव, जामखेड या भागात पाण्याअभावी ऊसपीक जळू लागले आहे. त्यामुळे पावसाची आवश्यकता आहे. मात्र, पंधरवडा उलटला तरीही समाधानकारक पाऊस नसल्याने ऊसउत्पादकही चिंतेत आहेत.