Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बेमोसमी पावसामुळे भूजल पातळीत वाढ
नगर, १३ जून/प्रतिनिधी

गतवर्षी नोव्हेंबर व यंदाच्या मे महिन्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे जिल्ह्य़ातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्य़ातील १४पैकी १० तालुक्यांची पाणीपातळी गत ५ वर्षातील मे

 

महिन्याच्या तुलनेत वाढली, तर ४ तालुक्यांत किंचित घट दिसते.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या जिल्हा कार्यालयातर्फे मे व जून महिन्याच्या दरम्यान जिल्ह्य़ातील २०३ निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जिल्ह्य़ातील पाणी विषयातल्या अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. पाणीपातळीत घट होण्याची जिल्ह्य़ाची परंपरा कायम राहिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ९ तालुक्यांची पाणीपातळी यंदा घटली.
नगर, श्रीगोंदे येथे १० टक्के, कोपरगाव-राहाता येथे १० ते २० टक्के आणि पारनेर-शेवगावमध्ये २०-५० टक्के पाऊस कमी झाला. मात्र, नांदूरमध्यमेश्वर चारी, गोदावरीचे पाणी यामुळे कोपरगाव-राहाता तालुक्यांना पाऊस कमी पडूनही टंचाई फारशी जाणवली नाही. मात्र, ज्या परिसरात चारींचे पाणी नव्हते, तेथे मात्र टंचाईचा प्रभाव राहिला. पाथर्डी तालुक्यात सरासरीपेक्षा जादा पाऊस होऊनही टंचाई आणि भूजल पातळीत घट झाली, असेही भूजलच्या या सर्वेक्षणात नमूद केले आहे.
गेल्या ५ वर्षाच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात नगर (०.६७ मीटर), श्रीरामपूर (०.२५), राहुरी (०.३), कर्जत (१.०९), जामखेड (०.७४), श्रीगोंदे (०.६६), संगमनेर (०.४७), अकोले (०.५१), कोपरगाव (०.६९), राहाता (१.४१) या तालुक्यांच्या भूजल पातळीत वाढ झाली. कायम दुष्काळग्रस्त राहणाऱ्या पारनेर (०.२१), पाथर्डी (०.७३), शेवगाव (०.३९), नेवासे (०.०१) तालुक्यांच्या पाणीपातळीत घट दिसली. शास्त्रीय पद्धतीनुसार केलेल्या ५ वर्षांच्या सरासरीनुसार ३ तालुक्यांच्याच पाणीपातळीत घट दिसत असली, तरी गतवर्षीची तुलना करता मात्र ९ तालुक्यांची पाणीपातळी घसरली आहे. पाच वर्षाच्या तुलनेत घट दिसणाऱ्या पारनेर (०.३४), पाथर्डी (०.७), शेवगाव (०.३१), सह राहुरी (०.१९), कर्जत (०.१८) तालुक्यांच्या पाणीपातळीत गतवर्षीपेक्षा वाढ झाली, तर उर्वरित ९ तालुक्यांची पाणीपातळी घटली.
या सर्वेक्षणावरून भूजलने काही गृहितके मांडली आहेत. अवकाळी अथवा मुसळधारऐवजी मोठय़ा प्रमाणावर झालेल्या संततधार पाऊसच भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. यासाठी ५ मिलिमीटरवर पाऊस एकाच वेळी झाला पाहिजे. तसेच शेतकऱ्यांनी कमी पाण्यात होणारी पिके घ्यावी, ऊस, कांदा, गहू ही खूप पाणी लागणारी पिके टाळावीत, रब्बी, खरीब हंगामासाठी पाणी व पिकांचे आगाऊ नियोजन करावे, अशा सूचनाही अहवालात नमूद केल्या आहेत.
वरिष्ठ भू-वैज्ञानिक प्रभाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ भू-वैज्ञानिक सी. एच. गिरीधरा, आर. ओ. बगमार, व्ही. आर. पाटील, एस. एस. गोंधळी यांनी या सर्वेक्षणासाठी विशेष परिश्रम घेतले.