Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शिक्षक प्रशिक्षणवर्ग प्रकरणाला चढला राजकीय रंग
शिरसाठ-खेडकर वादाची चिन्हे
पाथर्डी, १३ जून/वार्ताहर

येथील शिक्षकांच्या प्रशिक्षण वर्ग प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. तेथील कामकाजाविषयी जि. प. सदस्य अर्जुन शिरसाठ यांनी असमाधान व्यक्त केलेले असतानाच जि. प.च्या

 

समाजकल्याणचे सभापती पांडुरंग खेडकर यांनी समाधान व्यक्त केले आणि अधिकाऱ्यांना चक्क ‘क्लिन चिट’ही दिली. त्यामुळेच शिरसाठ-खेडकर यांच्यात वादाला तोंड फुटल्याची चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे शिक्षण विभागाने ९२ शिक्षकांना दांडी मारल्याच्या कारणावरून कारणे दाखवा नोटीस बजावली असतानाही खेडकर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची पाठराखण केल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.
शिरसाठ यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन तेथील सावळागोंधळ उजेडात आणला. त्याची दखल घेत गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांनी प्रशिक्षणास सह्य़ा करून दांडी मारणाऱ्या ९२ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसही बजावली. यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली. आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून यातील शिक्षकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवत स्वतची सुटका करून घेण्याचा प्रयत्न सध्या चालवला आहे.
आज खेडकर प्रशिक्षणाच्या समारोपास सय्यद यांच्यासमवेत हजर राहिले. सय्यद हे खेडकर यांचे गाव असेलेल्या भालगावचे रहिवासी आहेत. या वेळी खेडकर यांनी या प्रशिक्षणाविषयी वृत्तपत्रात जे वाचले ते येथे आल्यावर अजिबात जाणवत नाही. येथील कामकाज समाधानकारक असल्याची पावतीही जोडली.
खेडकर व शिरसाठ दोघेही काँग्रेस पक्षाचे आहेत. शिरसाठ यांनी जि. प.च्या राजकारणात थोरात गटाची साथ सोडत विखे गटाशी जुळवून घेतले. त्यामुळेच ते परस्परविरोधी विधाने करीत आहेत. दरम्यान, शिबिराचे कामकाज समाधानकारक होते, मग सय्यद यांनी ९२ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस का बजावली आणि अधिकाऱ्यांना पाठीशी का घातले, याबाबत सारेच गौडबंगाल आहे. खेडकर यांनी शिरसाठ यांच्या विरोधी भूमिका घेतली. आता शिरसाठ कोणता पलटवार करतात, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.