Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शेवगावमधील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविण्याची मागणी
शेवगाव, १३ जून/वार्ताहर

शहरातील बसस्थानक चौक ते शिवाजी चौक या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरची अतिक्रमणे ग्रामपंचायतीने त्वरित हटवावीत, अशी नागरिकांची मागणी आहे. या रस्त्यावर दररोज प्रचंड वाहन

 

कोंडी होत असल्याने ग्रामस्थांना पायी चालणेही अवघड झाले आहे.
मुख्य बाजारपेठेच्या या हमरस्त्यावर दुतर्फा टपऱ्यांची प्रचंड अतिक्रमणे आहेत. या सर्व टपऱ्या ग्रामपंचायतीच्या जागेत असून, ग्रामपंचायत या टपरीधारकांकडून दर दिवशी ठरावीक रक्कम वसूल करते.
बसस्थानक चौक ते शिवाजी चौक हा रस्ता आधीच दहा-बारा फूट रुंदीचा असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटारे बांधण्यात आली आहेत. त्यापलीकडे व्यापारी व टपरीधारकांनी आपले व्यवसाय करणे जरुरीचे आहे. तथापि, ही गटारे बुजवून त्यावर फरशी बसवून बाकडी, टेबल, त्यापुढे हातगाडय़ा अशा प्रकारच्या अतिक्रमणांमुळे रस्ता अधिकच अरूंद झाला आहे.
यात भर म्हणून फळविक्रेत्यांच्या गाडय़ा, रस्त्यावर फळे, भाजीपाला घेऊन विक्री करणारे असे हे तिहेरी अतिक्रमण असल्याने दोन वाहने समोरासमोर आल्यावर प्रचंड वाहनकोंडी होते. याच परिसरात ग्रामपंचायत इमारत असून, या इमारतीलाही अतिक्रमणांनी वेढले आहे. परंतु ही अतिक्रमणे चुकवत जाणारे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य या प्रमुख बाबीकडे लक्ष देत नाहीत. टपरीधारकांबरोबरच काही मोठे व्यापारीही दुकानाबाहेर या रस्त्यावर भांडी, इतर सामान मांडत असल्याने चीड व्यक्त होत आहे. ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी होत आहे.