Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम
पाथर्डी, १३ जून/वार्ताहर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस उद्या (रविवारी) विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जाणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. येणाऱ्या विधानसभेला शेवगाव मतदारसंघातून आपल्या उमेदवारीला राज ठाकरे यांनी हिरवा कंदील

 

दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, शहराध्यक्ष संजय गरड, नितीन वाघ उपस्थित होते. ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजी येथे तिळगूळ व गणवेष वाटप करण्यात येणार आहे. तिसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप व वृक्षारोपण, तर माणिकदौंडी येथे रोपे वाटपाचा कार्यक्रम होईल. येथील नवीन बसस्थानकात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याशिवाय खरवंडी येथे मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मोहटा, धामणगाव, मढी येथे अभिषेक, तर शेवगाव येथील पावन गणपतीला अकरा ब्राह्मण अभिषेक करणार आहेत. सायंकाळी साहित्यिक संजय कळमकर यांचा विनोदी व संगीत रजनीच्या कार्यक्रमाचे निऱ्हाळी नाटय़गृहात आयोजन करण्यात आले आहे.
श्री. खेडकर म्हणाले की, तालुक्यातील कोणत्याही पक्षात नसलेली काही नेतेमंडळी मनसेची उमेदवारी आपल्यालाच मिळाली असा कांगावा करत असली, तरीही त्यात तथ्य नाही. कामाला लागा असा स्पष्ट आदेश ठाकरे यांनी आपल्याला दिला आहे. गेल्या १७ वर्षापासून आपण ठाकरे यांच्यासमवेत काम करत आहोत. मनसेला आयात उमेदवारांची गरज नाही.
ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांना गणेश भोसले, कैलास गिरवले, सचिन डफळ, किशोर डागवाले, दिनेश लव्हाट उपस्थित राहणार आहेत. या वेळी संतोष वाघमारे, जालिंदर शेटे, दीपक नरोटे उपस्थित होते.