Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कपाशीबाबत सरकारने मार्गदर्शन करावे - धस
शेवगाव, १३ जून/वार्ताहर

यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या पिकांची प्रचंड लागवड होणार असल्याने सरकारच्या कृषी खात्याने प्रत्येक पंचायत समिती गणात कपाशी पिकाची लागवड, त्यासाठी लागणारी खते यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करावे, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी

 

काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब धस यांनी सरकारकडे केली आहे.
दर वर्षी तालुक्यात, विशेषत तालुक्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या कपाशीच्या पिकाची लागवड मोठय़ा प्रमाणात होत आहे. बाजरी व इतर खरीप पिकांच्या तुलनेत कपाशीने उत्पन्न जादा मिळते. परिणामी परिसरात सुमारे दहा नवीन जिनिंग प्रेसिंग गिरण्या सुरू झाल्या आहेत.
मात्र, सध्या कपाशीच्या अनेक वाणांची गर्दी बाजारात झाली असून, प्रत्येक कंपनी आपलेच बियाणे सरस असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे कोणते बियाणे घ्यावे, कोणती खते वापरावीत याचे ज्ञान शेतकऱ्यांना नसल्याने त्यांची अनेक पातळीवर फसवणूक होत असल्याचा अनुभव दर वर्षी येतो. तसेच काही ठिकाणी बनावट बियाणेही शेतकऱ्यांच्या माथी मारले जातात.
हा सर्व प्रकार टाळण्यासाठी कृषी खात्याने प्रत्येक पंचायत समिती गणात जाहिरात करून बियाणे, खते व पाण्याची पाळी संख्या याचे मार्गदर्शन करावे, अशी मागणी श्री. धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.