Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पाझर तलावाच्या कामाची चौकशी करावी - भंडारे
कर्जत, १३ जून/वार्ताहर

तालुक्यातील चापडगाव येथील तरस दऱ्यातील पाझर तलाव दुरुस्तीची गरज नसतानाही पंचायत समितीच्या अभियंत्यांनी या कामास पाच ते सहा लाखांची मंजुरी आणली. प्रत्यक्षात हे काम तीस ते चाळीस हजारांत उरकले. या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी

 

सरपंच शोभा भंडारे व उपसरपंच प्रकाश शिंदे यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी वरील मागणी केली आहे. हे काम न करण्याबाबत ग्रामपंचायतीने संबंधित अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले होते. तरीही हे काम करण्यात आले.
चापडगाव शिवारात गारमाळ येथील तलावाचे काम गेल्या सहा वर्षापासून रखडले आहे. विशेष म्हणजे राज्याचे तत्कालीन राज्यपाल महंमद फजल व पालकमंत्री दिलीप वळसे यांच्या हस्ते या तलावाचे उद्घाटन झाले होते. गॉर्ज आणि पिचिंगचे काम निधीअभावी रखडले आहे. या तळ्यामुळे चापडगावबरोबर दिघी गावातील क्षेत्र सिंचनाखाली येईल. मात्र, याकडे दुर्लक्ष करून गरज नसताना तरसदऱ्यातील पाझर तलावाच्या दुरुस्तीचा फार्स करण्यात आला, असा आरोप निवेदनात केला आहे.
पिचिंग व चारीचे काम अपूर्ण आहे. तरीही कामाचे बिल काढण्यात आले. या कामाची चौकशी करून सरकारी निधीचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी; अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.