Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रत्येकाने स्वतच माध्यम व्हावे - आनंद आगाशे
देशमुख पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण
श्रीरामपूर, १३ जून/प्रतिनिधी

लोकशाही अधिक सक्षम व सकस करण्यासाठी पत्रकार संघटनांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन करतानाच इंटरनेट-मोबाईलच्या युगात आता प्रत्येकाने जबाबदार माध्यम बनण्याचा प्रयत्न

 

करावा, असे मत ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे यांनी व्यक्त केले.
पालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिवंगत ज्येष्ठ पत्रकार वसंतराव देशमुख यांच्या स्मृतिनिमित्त देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. आगाशे यांनी लोकशाही आणि प्रसारमाध्यमांचे बदलते संदर्भ या विषयावर बोलताना वरील मत नोंदविले. अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा होते. साई संस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे, नगराध्यक्ष संजय फंड, उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, मुख्याधिकारी हनुमंत भोंगळे, श्रीरामपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शंकरराव आगे, महादेव कुलकर्णी, नंदकुमार सोनार, प्रकाश भंडारे, भास्करराव डिक्कर आदी उपस्थित होते. देशमुख पत्रकारिता पुरस्कार नगरचे ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर यांना श्री. आगाशे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
‘लोकसत्ता’चे वरिष्ठ उपसंपादक प्रदीप राजगुरू (कृषी पत्रकारिता), ‘सकाळ’चे वसंत सानप (जामखेड, शोधपत्रकारिता), सी. डी. वाघ (कोळपेवाडी, सामाजिक पत्रकारिता), ‘लोकमत’चे सुरेश वाडेकर (विशेष पत्रकारिता), तसेच नियतकालिकासाठी ‘ज्ञानोदय’चे संपादक दिवंगत सुधीर शर्मा यांची पत्नी शैलजा शर्मा यांना श्री. आगाशे यांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्हे, पुष्पहारासह पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
लोकशाहीचे तीन स्तंभ डळमळीत वा त्याबाबत जनतेचा अपेक्षाभंग झाल्याचे चित्र असताना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यम क्षेत्राकडे सर्वाचे लक्ष आहे. परंतु अन्य क्षेत्रांप्रमाणे चांगल्याबरोबर वाईटाचा संसर्ग याही क्षेत्राला झाला आहे. पूर्वीसारखी ‘लार्जर दॅन’ ही प्रतिमा आज पत्रकारितेत दिसत नाही. निष्पक्षता हा या आधी आवश्यक गुण मानला जात होता. परंतु आता मात्र सर्वच चित्र बदलले असून, सरकारी परिघाबाहेरील एकमेव म्हणून आजही लोकांच्या पत्रकारितेकडून मोठय़ा अपेक्षा आहेत, असे श्री. आगाशे यांनी सांगितले.
आमदार ससाणे यांनी वसंतराव देशमुख यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याचे सांगून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ वार्ताहर व प्रेस क्लबचे कार्यवाहक अशोक तुपे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. प्रश्नस्ताविक बाळासाहेब भांड यांनी केले. बाळासाहेब आगे यांनी आभार मानले.