Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वाढत्या गुंडगिरीकडे राष्ट्रवादीने वेधले पोलीस अधीक्षकांचे लक्ष
नगर, १३ जून/प्रतिनिधी

मंगळसूत्रांच्या चोऱ्या, वाढती गुंडगिरी, अॅपेरिक्षाचालकांचे गैरवर्तन यामुळे शहरातील शांतता धोक्यात आली असून, भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षकांनी याबाबत कडक

 

कारवाई करावी, अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलीस अधीक्षक विजय चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले.जिल्ह्य़ात व शहरात कायदा व व्यवस्था प्रश्न गंभीर बनला आहे. दरोडे-घरफोडय़ांचे प्रमाण वाढले आहे. नगर शहरात मंगळसूत्रचोऱ्यांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अजूनही चोरटे सापडत नाहीत.
शहरात वाहतुकीचा प्रश्न जटिल झाला आहे. रिक्षा, अॅपेरिक्षाचालकांच्या मनमानी, बेशिस्तपणामुळे रहदारीची कायम कोंडी होते. शहर व जिल्ह्य़ात अवैध धंदे मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. दारूअड्डे, मटका, जुगार सुरू असून मादक पदार्थाची विक्री सुरू आहे. शहरात गुंडगिरी वाढली आहे. पोलिसांवर हल्ले, तरुणांची हुल्लडबाजी, बेफाम वेगात जाणारी वाहने यामुळे शहरवासीयांची डोकेदुखी वाढली आहे. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अंबादास गारूडकर, नंदकुमार पवार, उबेद शेख, संजय झिंजे, शारदा लगड आदींच्या सह्य़ा आहेत.