Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘‘मास्तर एके मास्तर’ विरुद्ध शिक्षकांनी आंदोलने करू नयेत’
नगर, १३ जून/प्रतिनिधी

एका सामान्य शिक्षकाची शिक्षण महर्षीपर्यंतच्या प्रवासाची मनोरंजक कथा असलेला ‘मास्तर एके मास्तर’ हा चित्रपट कुणा व्यक्ती अथवा व्यवसायावर आधारित नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षकांनी हा विषय वैयक्तिक घेऊन या चित्रपटाविरुद्ध आंदोलने करू नयेत, तर चित्रपट बघून निखळ मनोरंजनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन या चित्रपटाचे निर्माते मेघराज राजेभोसले व अभिनेता

 

मंगेश देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
‘मास्तर एके मास्तर’ हा चित्रपट येथील शिवम व आशा स्क्वेअरमध्ये शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी राजेभोसले व देसाई नगरमध्ये आले होते. या चित्रपटाविरोधात कोल्हापुरात शिक्षकांनी निदर्शने केली. त्यासंदर्भात खुलासा करताना भोसले, देसाई यांनी वरील आवाहन केले.
समाजात शिक्षण क्षेत्राविषयी नकारात्मक संदेश जाईल. शिक्षकांच्या अस्मितेला धक्का बसेल, अशी कारणे देत सेन्सॉरने हा चित्रपट नाकारला होता. मात्र, रिवायझिंग कमिटीने सेन्सॉरचे आरोप फेटाळून लावत या चित्रपटाला मंजुरी दिल्याने प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. शुक्रवारी नगरसह राज्यातील ९५ चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित झाला.
शिक्षण क्षेत्रातील गैरकारभारावर ताशेरे ओढणाऱ्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ मुख्य भूमिकेत आहेत. मंगेश देसाई, विजू खोटे, दीपाली सय्यद, सुरेखा कुडची, किशोर प्रधान, आयटम गर्ल गौरी, महेंदू, नृत्यांगना सुनीता कळमकर यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
संजय सुरकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. फ. मु. शिंदे, जगदीश पिंगळे यांच्या गीतांना हर्षित अभिराज यांचे संगीत आहे. बारामती, सांगवी, उरळी देवाची या परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पांडव म्युझिकची गीतेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. प्रेक्षकांनी आवर्जून चित्रपट बघावा, असे आवाहन भोसले यांनी केले. चित्रपटाच्या प्रसिद्धीप्रमुख सुनंदा काळूस्कर या वेळी उपस्थित होत्या.