Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन
नगर, १३ जून/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत यंदा प्रथमच प्रश्नथमिक शिक्षकांच्या (उपाध्यापक) ऑनलाईनच्या पारदर्शक पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने यांनी राबविलेल्या या धोरणाबद्दल शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेत सवार्त मोठा संवर्ग प्रश्नथमिक शिक्षकांचा आहे. सुमारे ११ हजारांहून अधिक शिक्षक आहेत. शिक्षकांच्या बदल्या दर वर्षी चर्चेचा विषय होत असतो. पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप, सदस्यांचा दबाव यातून शिक्षकांचा बदल्या मेमो रेंगाळतही असतो.

बहुरूपी
कालच हुबळीहून काही लोक
पोट्रेट पेंटिंगचे काम करून घेण्यासाठी
खास नगरला माझ्याकडे आले होते
आधी गुलमोहोर रोडवरील गॅलरी
व नंतर पाईपलाईन रोडवरील
स्टुडिओ बघून त्यांनी माझी भेट घेतली
हुबळीतील एका नामांकित
संस्थेचे संस्थापक
त्यांचे त्यांना तैलचित्र
करून हवे होते.

कमी गाळपामुळे यंदाही उलाढाल थंडच!
साखर उद्योग पुन्हा अनिश्चिततेत

नगर, १३ जून/प्रतिनिधी

यंदा ऊस लागवडीचे क्षेत्र किरकोळ वाढले असून या हंगामात साखरेचे उत्पादन ५० लाख मेट्रिक टन राहील, असा अंदाज आहे. जिल्ह्य़ात सध्या ८७ हजार हेक्टर क्षेत्रावर खोडय़ासह उसाची लागवड झाली. दोन वर्षापूर्वी विक्रमी गाळप व उत्पादन करणारी साखर कारखानदारी आता मात्र निम्मेच गाळप करू लागली आहे. परिणामी साखर उद्योग पुन्हा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला. यंदाही गाळप कमी राहणार असल्याने साखर बाजाराची उलाढाल थंडच राहण्याची शक्यता आहे.

बेमोसमी पावसामुळे भूजल पातळीत वाढ
नगर, १३ जून/प्रतिनिधी

गतवर्षी नोव्हेंबर व यंदाच्या मे महिन्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे जिल्ह्य़ातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्य़ातील १४पैकी १० तालुक्यांची पाणीपातळी गत ५ वर्षातील मे महिन्याच्या तुलनेत वाढली, तर ४ तालुक्यांत किंचित घट दिसते. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या जिल्हा कार्यालयातर्फे मे व जून महिन्याच्या दरम्यान जिल्ह्य़ातील २०३ निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जिल्ह्य़ातील पाणी विषयातल्या अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत.

राम-लक्ष्मणाने केली भाजप व काँग्रेसची कोंडी!
नगराध्यक्ष निवड

पाथर्डी, १३ जून/वार्ताहर

नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून श्रीराम सुद्रुक व राम बंग, तर काँग्रेसकडून लक्ष्मण हंडाळ इच्छुक आहेत. परंतु उमेदवार दुसरेच असल्याने भाजपला दोघा रामांनी, तर काँग्रेसला लक्ष्मणाने कोंडीत पकडले आहे. राम-लक्ष्मणाची आडकाठी दोन्ही पक्षाचे नेते कशी दूर करतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पालिकेत भाजप ६, काँग्रेस ६, रामगिरबाबा आघाडी ३, तर राष्ट्रवादी २ असे बलाबल आहे.

टायर फुटल्याने जेऊरजवळ क्वालिसला अपघात; ७ जखमी
नगर, १३ जून/प्रतिनिधी

शनिदर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या क्वालिस मोटारीचा टायर फुटून झालेल्या अपघातात चालकासह सातजण जखमी झाले. नगर-औरंगाबाद रस्त्यावर जेऊर गावाजवळील धनगरवाडी शिवारात हा अपघात झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात क्वालिसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातामधील भाविक हे शिंगणापूरवरून दर्शन घेऊन मुंबईला चालले होते. क्वालिस गाडी धनगरवाडी शिवारात आली असताना गाडीचा टायर फुटून गाडी तीनवेळा उलटली. त्यामुळे गाडीतील भाविक बाहेर फेकले जाऊन जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. शैलेश रूपचंद घोडके (२०), हरिश्चंद्र घोडके, सुमन हरिश्चंद्र घोडके, सोनाली हरिश्चंद्र घोडके, नितीन दळवी, मोनेश हरिश्चंद्र घोडके, त्रिवेदी (चालक, पूर्ण नाव माहीत नाही, रा. सर्व धारावी, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.

तनपुरे कारखान्यावरील चोरीप्रकरणी तिघे अटकेत
राहुरी, १३ जून/वार्ताहर

तनपुरे साखर कारखाना परिसरात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. आरोपींनी गुन्ह्य़ाची कबुली दिली. तनपुरे कारखाना व ताहाराबाद रस्त्यावरील ७ दुकानांचे शटर उचकटून दुकानातील माल व रोख रक्कम मार्चमध्ये चोरटय़ांनी लांबविली. यातील ३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपींकडून २ मोबाईल हस्तगत केले. मोबाईल कंपनीकडून माहिती गोळा केली असता राजेंद्र सखाराम केदार (गुरवेवाडी, कन्हेर पोखरी, ता. पारनेर) याच्याकडे चोरीचा मोबाईल होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार संतोष जाधव (रा. गुरवेवाडी) व दादाभाऊ काळे (रा. गुळंचवाडी, आणे, ता. जुन्नर) यांना अटक करण्यात आली.

आवर्तनाअभावी जळालेल्या पिकांचे पंचनामे करावेत - गुंड
राशीन, १३ जून/वार्ताहर

कर्जत तालुक्यातील कुकडीच्या लाभधारक शेतकऱ्यांची पिके आवर्तनाअभावी जळून गेली. या पिकांचे पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जि. प. सदस्य राजेंद्र गुंड यांनी केली आहे. कुकडीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून ऊस, भूईमूग पिकांसाठी पाणीअर्ज भरून घेतले. मात्र, लाभधारकांना आवर्तन मिळाले नाही. पुणे जिल्ह्य़ातील नेत्यांच्या राजकारणामुळे येथील शेतकरी अडचणीत आले आहेत. याबाबत कर्जत तहसीलवर सर्वपक्षीय मोर्चा काढूनही प्रशासनाला जाग आली नाही. सध्या पावसाने लांबण लावल्याने शेतकऱ्यांच्या हालात भर पडली आहे. आवर्तन सुटेल या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी ऊस, भूईमूग तसेच उन्हाळी पिकांची मोठी लागवड केली. परंतु आवर्तनच न सुटल्याने सर्व पिके जळून खाक झाली. या पिकांचे पंचनामे करून भरपाई तरी द्यावी, अशी मागणी गुंड यांनी केली आहे.

ग्रामसेवक संघटनेचे डी. पी. क्षत्रिय अध्यक्ष
राहाता, १३ जून/वार्ताहर

तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी डी. पी. क्षत्रीय, तर उपाध्यक्ष म्हणून एस. एस. नागले यांची निवड करण्यात आली. पंचायत अधिकारी व संघटनेचे अध्यक्ष बी. वाय. कडू सेवानिवृत्त झाल्याने संघटनेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सुरेश नागले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुढील कार्यकारिणी निवडण्यात आली. सचिव डी. बी. शिंदे, सदस्य एस. बी. सुपे, आर. एन. सोमवंशी, टी. के. जाधव, एन. डी. लहारे, श्रीमती पी. बी. शिंदे, श्रीमती के. डी. आहेर, ए. आर. गाढवे, डी. डी. गुंजाळ. गटविकास अधिकारी अनिल यादव यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न, विविध मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे नूतन अध्यक्ष क्षत्रीय यांनी सांगितले. कैलास रणछोड, सुहास शिरसाठ, जे. के. शिंदे, टी. बी. कोकाटे, एम. वाय. उदागे उपस्थित होते.

बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारी ४ वाहने पकडली
१ लाख १५ हजारांचा दंड वसूल
नेवासे, १३ जून/वार्ताहर

वाळूच्या बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ३ मालमोटारी व एका ट्रॅक्टरमालकाकडून १ लाख १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र बावा यांनी दिली.
वाळूच्या बेबंद चोरीला आळा घालण्यासाठी तहसीलदार बावा यांनी आपल्या पथकासह पहाटे तीन वाजता ही वाहने पकडली. नगर-औरंगाबाद मार्गावर ३ मालमोटारी व जळके शिवारात १ ट्रॅक्टर पकडला. मालमोटारीचे क्रमांक - एमएच १४ बीजे १९४, एमएच १४ बीजे २७३६, एमएच २० एटी १००४ व ट्रॅक्टरचा क्रमांक एमएच १४ टी ३९३५ असलेल्या या चारही वाहनांवर गौण खनिज चोरी व अवैध वाहतुकींतर्गत कारवाई करून तहसीलदार बावा यांनी १ लाख १५ हजार रुपयांचा महसूल जमा केला. या पथकात तलाठी वीर, साळवे, जमधडे, तसेच चांदे सर्कलचे मंडल अधिकारी पठाण यांचा समावेश होता.

गदेवाडी ओढय़ावरील बंधाऱ्याची दुरुस्ती निकृष्ट
शेवगाव, १३ जून/वार्ताहर

तालुक्यातील गदेवाडी येथील ओढय़ावर असणाऱ्या बंधाऱ्याची सुरू असलेली दुरुस्ती निकृष्ट असून, ही दुरुस्ती दर्जेदार करण्यात यावी या मागणीसाठी जनशक्ती मंच या संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.
या ओढय़ावर बंधारा बांधला असून, या बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट प्रतीचे झाल्याने या बंधाऱ्यातून प्रचंड गळती होते. सध्या या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, तेदेखील निकृष्ट दर्जाचे होत असल्याने संघटनेचे कार्यकर्ते व गदेवाडी येथील गावकऱ्यांनी कृषी अधिकारी पायघन यांना घेराव घातला. या बंधाऱ्याचे काम चांगले करण्यात येईल, असे आश्वासन कृषी अधिकाऱ्यांनी दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात सर्वश्री. शिवाजीराव काकडे, देवराव दारकुंडे, बाळासाहेब गायकवाड, अशोक ढाकणे, बबनराव मडके सहभागी झाले होते.

कुकडीच्या चारीला पाणी सोडण्याची मागणी
वाडेगव्हाण, १३ जून/वार्ताहर

पावसाने ताण दिल्याने सरकारने कुकडीचे आवर्तन सोडले. परंतु पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी दिसते, पण जनावरांना व पिण्यासाठी मिळत नाही. त्यासाठी चारी क्रमांक ५ला पाणी सोडावे; अन्यथा चारी तोडण्याचा इशारा पाणीवापर संस्थेचे संचालक तुळशीराम गायकवाड यांनी दिला आहे. पारनेर तालुक्यातून कुकडी कालवा जात असल्याने लोकहडी, कुरुंद, जवळे, राळेगण, वाडेगव्हाण, नारायणगव्हाण परिसरात पाणीटंचाई जाणवत आहे. चारी क्रमांक ५ला पाणी सोडले, तर विहिरींच्या पाण्याची पातळी वाढेल. जनावरांनाही चारा उपलब्ध होईल. जून महिना निम्मा उलटला तरी पावसाचे आगमन होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पाणी असून पिण्यासाठी मिळत नाही. श्रीगोंदे, पारनेर तालुक्यांतील पुढाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. ४ ते ५ दिवसांत अधिकाऱ्यांनी चाऱ्यांना पाणी सोडले नाही, तर शेतकरी चाऱ्यांचे कुलपे तोडतील, असा इशारा गायकवाड यांनी दिला.

‘राष्ट्रवादी’ची आजपासून शिर्डीत सभासद नोंदणी
राहाता, १३ जून/वार्ताहर

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सभासद नोंदणी अभियानाचा प्रश्नरंभ उद्या (रविवार) सकाळी १० वाजता बाभळेश्वर येथे होणार असल्याची माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष वकील गोकुळ धावणे यांनी दिली. सभासद नोंदणी कार्यक्रमाचा प्रश्नरंभ पक्षाचे तालुक्यातील ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के यांच्या हस्ते व गणेश साखर कारखान्याचे अध्यक्ष नारायण कार्ले यांच्या अध्यक्षतेखाली होईल. राष्ट्रवादीचे सभासद नोंदणी अभियान जिल्ह्य़ात सुरू आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात हे अभियान राबविण्यात येणार असून, तालुक्यातून १० हजार सभासद नोंदणी करण्यात येणार असल्याचे धावणे यांनी सांगितले. तालुक्यातील महिला, युवक व पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने हजर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सूचना फलकाचे ‘सारडा’मध्ये उद्घाटन
नगर, १३ जून/प्रतिनिधी

महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया, विविध अर्ज भरण्याची मुदत, विविध स्पर्धा, कार्यक्रम यासारख्या विषयाची माहिती विद्यार्थ्यांना तत्काळ मिळावी, यासाठी पेमराज सारडा महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स (डिजीटल) सूचना फलक बसविण्यात आला. हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव अविनाश आपटे यांच्या हस्ते या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर दसरे, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, प्रश्नचार्य डॉ. केवल जयस्वाल, उपप्रश्नचार्य विश्वनाथ लाहोटी, प्रश्न. शिरीष मोडक या वेळी प्रमुख उपस्थित होते. आपटे म्हणाले की, माहिती-तंत्रज्ञानाच्या जगात सर्वच क्षेत्रांत झपाटय़ाने बदल घडत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रे परिपूर्ण होत आहे. त्याचाच विचार करून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा फलक उभारण्यात आला आहे. लवकरच अशा प्रकारचे फलक ग्रंथालय, प्रवेशद्वार आदी महाविद्यालय परिसरात बसविण्यात येणार आहे.डॉ. जयस्वाल म्हणाले की, असा फलक बसविणारे जिल्ह्य़ात सारडा महाविद्यालय एकमेव शिक्षण संस्था ठरली आहे. अशोक असेरी यांनी आभार मानले.

विवाहितेच्या छळप्रकरणी सहा वर्षानी फिर्याद
११जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नगर, १३ जून/प्रतिनिधी

सासरच्या लोकांनी मानसिक, शारीरिक छळ करून पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद विवाहितेने सहा वर्षानी दिली. नगर तालुका पोलिसांनी या प्रकरणी सासरच्या ११जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनीता आजिनाथ शिंदे (रा. मदडगाव, ता. नगर) या विवाहितेने फिर्याद दिली. पोलिसांनी तिचा पती आजिनाथ विठ्ठल शिंदे, सासरा विठ्ठल रुखमाजी शिंदे, सासू तान्हाबाई विठ्ठल शिंदे, दीर अरुण विठ्ठल शिंदे, मामेसासरा गंगाधर बापू रेडे, सतीश बन्सी आठरे, चंदा लक्ष्मण औटे, वंदना शरद दाभाडे, सवत कल्पना आजिनाथ शिंदे, सवतीची मुले विनायक शिंदे व कृष्णा शिंदे या ११जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींनी संगनमत करून विवाहितेचा पती आजिनाथ याला पहिली पत्नी कल्पना असतानाही तिच्याशी घटस्फोट घेतल्याचे खोटे सांगून सुनीताशी लग्न लावले. नंतर सासरच्या मंडळींनी सुनीताचा मानसिक, शारीरिक छळ सुरू केला. १५ नोव्हेंबर २००३ रोजी सुनीताचा पती आजिनाथ, सासरा विठ्ठल, सासू तान्हाबाई यांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे सुनीताने फिर्यादीत म्हटले आहे. तपास उपनिरीक्षक भोसले करत आहेत.

‘कोअर बँकिंगमार्फत अवघ्या १९ सेकंदांत व्यवहार’
नगर, १३ जून/प्रतिनिधी

स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक जोडण्याचे काम करते. बँकेच्या कोअर बँकिंगमार्फत देशभरातून कुठेही बँकेच्या पैशाचा व्यवहार अवघा १९ सेकंदांत होऊ शकतो. लवकरच पुणे विभागात एसबीआयचे २ हजार नवीन एटीएम सेंटर सुरू करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन बँकेचे उपमहाप्रबंधक राकेश पुरी यांनी येथे केले.मार्केट यार्डजवळील नेवासकर पेट्रोल पंपावर सुरू करण्यात आलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरचे उद्घाटन पुरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सहायक उपमहाप्रबंधक नवलकिशोर शर्मा (नगर), मुख्य प्रबंधक शंतनू पेंडसे (नगर), कर्ज विभागप्रमुख वेणुनाथ बिदे, शाखाप्रमुख शिवाजी ओंढरे, रुक्साना चौधरी या वेळी प्रमुख उपस्थित होते.पुरी म्हणाले की, सध्या नगर शहरात एसबीआयचे ८ एटीएम सेंटर असून, लवकरच अजून ३ सेंटर सुरू करण्यात येणार आहे. आधुनिक मोबाईल बँकिंगचाही लाभ ग्राहकांनी घ्यावा.