o
Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

सेझचा पेच
मधुकर ठाकूर

‘कर लो दुनिया मुठ्ठी में’चा नारा लावणाऱ्या महामुंबई सेझ प्रकल्पाची विकासक रिलायन्स कंपनीला मात्र सेझविरोधी महामुंबई शेतकरी संघर्ष समितीच्या कायदेशीर लढाईपुढे हार मानावी लागली. प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया वारंवार मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांच्या तीव्र संघर्षामुळे तीन वर्षांच्या कालावधीमध्येही पूर्ण करता आली नाही. यामुळे देशातील व उरण, पनवेल, पेण तालुक्यांतील ४५ महसुली गावांत होणारा सर्वात मोठा ४० हजार कोटी खर्चाचा सेझ प्रकल्प उभारणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही शेतकऱ्यांच्या कायदेशीर लढाईच्या बाजूने निकाल दिल्याने सेझविरोधी शेतकऱ्यांनी विजयी मेळावा आयोजित करून आनंदोत्सव साजरा केला.

मेट्रोची नांदी
जयेश सामंत

ठाणे-नेरुळ आणि ठाणे-पनवेल पाठोपाठ नवी मुंबईत उपनगरीय रेल्वेचे एक वर्तुळ पूर्ण होत असताना, आता या शहरात मेट्रोचा राजेशाही थाट अवतरणार आहे. सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील यांनी गुरुवारी सकाळी नवी मुंबईत उभ्या राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास पूरक ठरू शकेल, अशा तीन मोठय़ा मेट्रो प्रकल्पांची घोषणा केली. यावेळी पाटील यांच्यासोबत सिडकोतील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या शहरातील उपनगरीय रेल्वेचा विस्तार करण्याच्या मनस्थितीत आता सिडको राहिलेली नाही, हे यावेळी स्पष्ट झाले.

दिव्याखाली अंधार
अनिरुद्ध भातखंडे

काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांची तीन वर्षापूर्वी कळंबोली येथे हत्या झाली. या हत्येप्रकरणी अन्य चार आरोपींव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांना प्रदीर्घ कालावधीनंतर अटक झाली. कळंबोली परिसर पनवेल न्यायालयाच्या कक्षेत येत असल्याने साहजिकच या प्रकरणाची सुनावणी पनवेल न्यायालयात होऊ लागली. यानिमित्ताने या न्यायालयाला आणि पर्यायाने पनवेलला प्रसिद्धीचे मोठे वलय लाभले.

मिडास लढाऊ विमानांचे भोजनालय
भारतीय हवाईदलाने आपल्या ताफ्यातील लढाऊ, तसेच अन्य विमानांचा पल्ला वाढावा यासाठी त्यामध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरता यावे या हेतूने रशियन बनावटीची आयएल ७८ एमकेआय मिडास ही इंधनवाहू विमाने खरेदी केली. त्याच्या मदतीनेच भारतीय हवाईदलाने आज आपली सामरिक पोहोच सिद्ध केली आहे. आज भारतीय हवाईदलातील हे सर्वात मोठे आणि सर्वात वजनदार मालवाहू विमान आहे. हवाईदलांच्या परिभाषेत अशा प्रकारच्या इंधनवाहू विमानांना ‘मिड-एअर रिफ्युलर’ म्हटले जाते.‘आयएल ७८ एमकेआय’ या श्रेणीची सहा विमाने खरेदी करण्यासंबंधीचा करार भारताने उझबेकिस्तानबरोबर एप्रिल २००१ मध्ये केला होता.

कधी रे येशील तू..
प्रिय वरुणराजा,

सात जून ही तारीख उलटून गेली. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. तू मुंबई, ठाणे, कल्याण सोडून महाराष्ट्राच्या अन्य भागात आपली मान्सूनपूर्व हजेरी तरी लावलीस. मुंबईकरांवर मात्र तू रुसला आहेस का, मुंबईकरच नव्हे तर झाडे, झुडपे, प्रश्नणी, पक्षी आणि धरित्रीही तुझी आतुरतेने वाट पाहात आहे. प्रत्येकजण विचारत आहे, तुला आळवत आहे, कधी रे येशील तू.. यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यात सूर्यदेवाच्या कोपामुळे तापमापकाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला होता. मार्च, एप्रिल, मे तर संपले. परंतु आता जून महिना अर्धा उलटून गेला तरी अद्याप तू आला नाहीस. तसा तू दरवर्षी सात जूनला येतोस. पण एखाद्या व्रात्य मुलाने दोन-चार दिवस शहाण्यासारखे वागावे आणि नंतर पुन्हा त्याच्या अंगात यावे, असाच तू वागत असतोस. सात जूनला तू आपली हजेरी लावतोस आणि नंतर जो कुठे गायब होतोस, तो अख्खा जून संपून जुलै उजाडला तरी तोंड दाखवत नाहीस. मला आठवतंय, की पूर्वी तू अगदी शहाण्यासारखा यायचास, आलास की चार महिने मुक्काम करायचास, पण आता तुला आमचा सहवास आवडत नाही की तू आमच्यावर रागावला आहेस, मला माहिती आहे, की तुझ्या उशिरा येण्याला आम्ही माणसेच जबाबदार आहोत. आमच्या परिसरातील, गावातील, जिल्यातील आणि संपूर्ण राज्यातील नैसर्गिक संपत्तीची आम्हीच पूर्णपणे वाट लावली. विकासाच्या नावाखाली आम्ही जंगले नष्ट केली. हिरवेगार डोंगर उघडे बोडके केले. छोटय़ा-मोठय़ा टेकडय़ा आम्हीच उद्ध्वस्त केल्या. सोसायटी, घरे यांना आम्ही मातीचे अंगण ठेवले नाही. सगळीकडे सिमेंट-क्रॉंक्रिटचे जंगल उभे केले. तुझ्या येण्यासाठी सहाय्यभूत असलेले वारा व ढग यांना अडवणारे डोंगर आता राहिले नाहीत. आकाशातून सहस्त्रधारांनी जमिनीकडे धाव घेणारा तुझा खळाळता प्रवाह पूर्वी नदी, नाले, आणि समुद्रातून मुक्तपणे खेळत होता. पण आम्हीच नतद्रष्टांनी समुद्रात भराव टाकून बॅक बे रेक्लमेशन तयार केले. नदीतून स्वच्छ वाहणारे पाणी कारखान्यातील रासायनिक द्रव्ये सोडून प्रदुषित करून टाकले. अरे आमचे अपराध तरी किती सांगू.. मात्र याचा वचपा तू कधीतरी काढतोस, असा काही आम्हाला दणका देतोस की पावसाळा म्हटला की आम्हा मुंबईकरांच्या मनात दरवर्षी धडकीच भरते. पाऊस जवळ आला की २६ जुलै २००५ ची आठवण होते. अर्थात त्या वेळी ते अस्मानी संकट म्हटले गेले. पण खरे सांगू, अप्रत्यक्षपणे त्यालाही आम्हीच जबाबदार आहोत. त्यापासून आम्ही काहीही धडा घेतला नाही. मिठी नदी आणि पर्यावरणावर आम्ही जे काही अत्याचार केले त्याची भरपाई केवळ जुजबी उपाय करून होणार नाही, पण आम्ही तेच करत राहतो. आम्ही तुझे शतश: अपराधी असलो तरी भावी पिढीसाठी तरी तू वेळेवर ये. आमचे अपराध पोटात घाल, पण येणाऱ्या भावी पिढीला आमच्या अपराधांची शिक्षा देऊ नकोस. यंदाच्या वर्षी थंडी गायब झाली, तसा तू सुद्धा गायब होशील की काय, अशी भीती वाटायला लागली आहे. तसे झाले तर भावी पिढीला तुला व्हिडिओ किंवा सीडीमध्येच पाहावे लागेल. पूर्वी तू नैसर्गिकरित्या पडत होतास, त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. ढगांमध्ये रासायनिक फवारणी करून कृत्रीमपणेच तुला दरवर्षी बोलवावे लागेल की काय, असे आता वाटायला लागले आहे. बदलते आणि ढासळते पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिग आणि अन्य काही कारणांमुळे ऋतुचक्र असेच बदलत जाण्याचा धोका शास्त्रज्ञांनी वर्तवला आहेच. त्यात तू सुद्धा वेळेवर आला नाहीस तर त्या दिशेकडे वाटचाल सुरू झाली की काय, असे आम्हाला वाटत राहील. त्यामुळे किमान ते खोटे ठरविण्यासाठी तरी आता लवकर ये, भेटी लागे जीवा, लागलीसे आस अशी आम्हा प्रत्येकाची अवस्था झाली आहे. केवळ घनघनमाला नभी दाटल्या, असे करता, त्या नभातून जोरदार धारा कोसळू दे.., आता अधिक अंत पाहू नको.. वाजत, गाजत आणि गर्जत ये..
शेखर जोशी