Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

राज्य

‘लोकसत्ता करिअर व्हिजन’ला ठाण्यात तुफान प्रतिसाद!
ठाणे, १३ जून/प्रतिनिधी

जूनमध्ये विविध परीक्षांचे निकाल लागले, तर काहींचे निकाल लवकरच लागतील, पण परीक्षेत चांगलेगुण मिळवूनही पुढे काय, करिअर कोणते निवडायचे, करिअरचे विविध पर्याय कोणते, ते कुठे उपलब्ध आहेत असे अनेक प्रश्न पाक व विद्यार्थ्यांच्या डोक्यात निर्माण झाले आहेत. त्याची नेमकी उत्तरे घेऊन या संभ्रमावस्थेतील पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता करिअर व्हिजन’ आणि करिअर फाऊंडेशनतर्फे आजपासून ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय करिअर सेमिनारला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावदेवी मैदानाजवळील कांती विसारिया हॉलमध्ये सुरू झालेल्या या करिअर सेमिनारमध्ये रविवारी दिवसभरातही अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. इंजिनीअरिंग, पॅरामेडिकल, कॉमर्स, स्पर्धा परीक्षा, फॅशन, इंटेरियर, ग्राफिक डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल टुरिझम अशा क्षेत्रातील शेकड संधींची माहिती या कार्यक्रमातून दिली जात आहे.

गुंडाराज विरोधात नाशिकमध्ये ३१ जणांना मोक्का
नाशिकरोड, १३ जून / वार्ताहर

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह ३० गुंडांवर तडीपारीच्या नोटीसा बजावल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिक पोलीस आयुक्तालयाने पोलीस नाईक कृष्णकांत बिडवे हत्या प्रकरणातील सर्वच्या सर्व म्हणजे ३१ संशयितांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली आहे. त्यापैकी अटकेत असणाऱ्या १४ संशयितांची आज येथील विशेष सत्र न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. एकाचवेळी इतक्या मोठय़ा संख्येने संशयितांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई होण्याची परिसरातील ही बहुदा पहिलीच घटना आहे.

‘न्यायसिंधु’चा अमूल्य ठेवा!
नगर, १३ जून/प्रतिनिधी
‘लंडन शहरी तापाचा अजार फार चालला आहे. सध्या १५०० अजारी इस्पितळात आहेत..’
‘सयाजीमहाराज गायकवाड यांचे बंधू श्री. संपतराव गायकवाड यांनी विलायतेच्या प्रवासाचे उत्तर प्रायश्चित घेतले..’ ‘हिंदुस्थानातून ५० हजार टन साखर बाहेर रवाना..’ या आहेत सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीच्या बातम्या. नगर येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक न्यायसिंधुमध्ये अशा देशी-विदेशी बातम्या प्रसिद्ध होत असत. सन १८६६मध्ये नगरचे आद्य पत्रकार दाजी चिमणाजी कुकडे यांनी हे साप्ताहिक सुरू केले. आशा चित्रपटगृहाच्या मागील बाजूस असलेल्या कुकडे वाडय़ात शीळाप्रेसवर या अंकाची छपाई होत असे.

कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकासासाठी तरतूदच नसल्याने पालिकेचीही नाराजी
कोल्हापूर, १३ जून / प्रतिनिधी

करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या कोल्हापूरला तीर्थक्षेत्रच म्हटलं जातं. मात्र राज्य शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात या तीर्थक्षेत्रासाठी आर्थिक तरतूद केली नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना महापौर उदय साळोखे यांनी कोल्हापूरला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याविषयीचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर करून तो केंद्र शासनाकडे पाठवून द्यावा, असे आवाहन केले.

सोलापूर व यशवंत सुतगिरण्यांच्या कामगारांना देय रकमांचे वाटप सुरू
सोलापूर, १३ जून / प्रतिनिधी
गेल्या नऊ वर्षांपासून बंद असलेल्या सोलापूर व यशवंत या सहकारी सूतगिरण्यांच्या बेकार कामगारांच्या देय रकमांचे वाटप करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. यशवंत सूतगिरणीच्या कामगारांना ४ कोटी ४४ लाख तर सोलापूर सूतगिरणीच्या कामगारांना ७८ लाख २० हजारांची देय रक्कम मिळणार आहे.

विजयदादांचा वाढदिवस उत्साहात
माळशिरस, १३ जून/वार्ताहर

राज्याचे ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचा ६६ वा वाढदिवस त्यांच्या अकलूजच्या शिवरत्न या निवासस्थानी मोठय़ा उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने सहकार महर्षी साखर कारखाना व विविध संस्थांच्या वतीने घेतलेल्या रक्तदान शिबिरात १०७ जणांनी रक्तदान केले.

सोलापूरच्या 'मार्शल लॉ' चळवळीवरील पुस्तकाचे आज शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
सोलापूर, १३ जून / प्रतिनिधी

१९३० साली सोलापुरात झालेल्या मार्शल लॉ चळवळीवर ज्येष्ठ साहित्य संशोधक प्रा. डॉ. नी. त्र्यं. पुंडे यांनी लिहिलेल्या ‘मार्शल लॉ आणि सोलापूरचे चार हुतात्मे’ या पुस्तकाचा तसेच प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी देशभक्त रामकृष्ण जाजू यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १४ जून रोजी सोलापुरात केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होत आहे.हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये सायंकाळी सहा वाजता हा पुस्तक प्रकाशन समारंभ होत आहे.

गुरुवर्य भगवानमामांची प्रकृती स्थिर
कराड, १३ जून/वार्ताहर

मराठमोळ्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे आधारवड गुरुवर्य भगवानमामा कराडकर यांची गेले दोन दिवसांपासून चिंताजनक बनलेली प्रकृती आज त्यांना पुण्याच्या सह्य़ाद्री हॉस्पिटलमधून कराडच्या मारुतीबुवा मठात आणताच चांगलीच सुधारली. दरम्यान भगवानमामा निवर्तल्याच्या वृत्ताने हजारो वारकऱ्यांनी येथे एकच धाव घेतली होती. मात्र, कृत्रिम प्राणवायूशिवाय भगवानमामांची प्रकृती सुधारत असल्याचे पाहून वारकऱ्यांनी हा दैवी चमत्कार असल्याची भावना व्यक्त केली.

शिक्षकांच्या मोर्चामुळे कोल्हापुरात ‘मास्तर एके मास्तर’ चे प्रदर्शन बंद
कोल्हापूर, १३ जून / विशेष प्रतिनिधी
‘मास्तर एके मास्तर’ या चित्रपटामध्ये संपूर्ण शिक्षण क्षेत्राची बदनामी करण्यात आली असून या चित्रपटावर राज्य सरकारने तातडीने बंदी घालावी, अशी मागणी करीत शुक्रवारी सायंकाळी खासगी प्राथमिक शिक्षण सेवक समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी चित्रपटगृहावर मोर्चा वळवला होता. मोठय़ा संख्येने जमलेल्या शिक्षकांनी केलेल्या जोरदार निदर्शनाची दखल घेऊन चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने चित्रपटगृहावरील पोस्टर्स स्वत:च उतरून चित्रपटाचे प्रदर्शन बंद केले. तथापि राज्य सरकारने स्वत:च पुढाकार घेऊन या चित्रपटाच्या प्रदर्शनावर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

डीकेटीईचे पाच विद्यार्थी आयआयटीमध्ये उच्चश्रेणीत
इचलकरंजी, १३ जून / वार्ताहर
आय.आय.टी. प्रवेश परीक्षेत डी.के.टी.ईच्या तब्बल ५ विद्यार्थ्यांनी एकाचवेळी यश मिळवून नवा लौकिक स्थापित केला आहे. पदव्युत्तर शिक्षण क्षेत्रात दर्जेदार ठिकाणी प्रवेश देणारे द्वार म्हणून या गेट परीक्षेकडे पाहिले जाते. देशपातळीवर होणाऱ्या या परीक्षेत उच्चश्रेणी प्राप्त करणे अवघड बाब असताना एकाच संस्थेच्या ५ विद्यार्थ्यांनी बाजी मारण्याचा दुर्मिळ प्रकार घडला आहे. हरीष डी. छोटे, दयानंद बाळासाहेब खोत, तुषार नरेंद्र नगरवालारवी कुमार व प्रसाद रवींद्र बडबडे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

टँकरच्या धडकेने दुचाकीवरील दोघे ठार
कल्याण, १३ जून / प्रतिनिधी

शहरात अवजड वाहनांना बंदी असताना एका भरधाव वेगात आलेल्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने गुरुनाथ धोंडू शेलार व त्याची मुलगी दिपाली शेलार जागीच ठार झाले, तर रुपाली शेलार गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी जोकर टॉकीज जवळ घडली. गुरुनाथ शेलार हे आपल्या मुलींना शाळेचे कपडे, छत्र्या व घरगुती सामान आणण्यासाठी गेले होते. खरेदी करून परत आपल्या घरी आडिवली येथे जात असताना जोकर टॉकीज जवळ त्यांच्या दुचाकीला टँकरने जोरदार धडक दिल्याने गुरुनाथ शेलार व दिपाली रस्त्यावर मध्यभागी खाली पडले व त्यात दोघांनाही डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये ते व दिपाली जागीच ठार झाले, तर रुपाली गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेलगीसह सात आरोपींना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
कोल्हापूर, १३ जून / विशेष प्रतिनिधी

बनावट स्टॅम्प्स् तयार करून त्याच्या विक्रीसाठी देशभर जाळे निर्माण केल्याच्या आरोपावरून येथील सत्र न्यायाधीश ए. बी. महाजन यांनी स्टॅम्प महाघोटाळ्याचा सूत्रधार अब्दुलकरीम तेलगी याच्यासह सात आरोपींना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे साहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. अशोक रणदिवे यांनी काम पाहिले. कोल्हापूरात दाखल झालेल्या या खटल्याची सुनावणी शनिवारी झाली. या सुनावणीसाठी अब्दुलकरीम तेलगी व त्याच्या साथिदारांना शुक्रवारीच कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. सुनावणी दरम्यान या सर्व आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.