Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

क्रीडा

बुकॅनन टीकेचे धनी
इंग्लंडच्या ज्युनियर संघांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय

मेलबर्न, १३ जून / वृत्तसंस्था

इंग्लंडमधील कनिष्ठ संघांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकॅनन सध्या टीकेचे लक्ष्य बनले आहेत.हे काम स्वीकारल्याबद्दल ऑस्ट्रेलियाच्या आजी माजी कसोटीपटूंनी त्यांच्यावर टीका केली आहे.मात्र बुकॅनन यांनी आपल्यावरील टीकेचे खंडन करीत कनिष्ठ संघांना प्रशिक्षण देताना इंग्लंडच्या कसोटी संघाला ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या खेळाबाबत माहिती देणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

ब्राव्होच्या अष्टपैलू खेळामुळे विंडीजची भारतावर मात
लंडन, १३ जून / पीटीआय

ड्वेन ब्राव्होची ६६ धावांची नाबाद खेळी, त्याने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करीत घेतलेले ४ बळी व त्याला लेन्ड्ल सिमन्सने ४४ धावा करून दिलेली साथ यामुळे वेस्ट इंडिजने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर एटमध्ये भारताला सलामीच्याच सामन्यात पराभवाची चव चाखायला लावली. या पराभवामुळे भारताला आता इंग्लंड व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या दोन्ही लढती जिंकण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा, त्यांचे स्पर्धेतील आव्हान उपान्त्य फेरीपूर्वीच संपुष्टात येईल.

ब्राव्होने श्रेय दिले आयपीएलला
लंडन, १३ जून / पीटीआय

भारताविरुद्धच्या ‘सुपर एट’मधील सलामीच्या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेला वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो याने आपल्या फलंदाजीचे श्रेय इंडियन प्रीमियर लीगला दिले आहे. ब्राव्होने या लढतीती अष्टपैलू कामगिरी करताना चार बळी घेतले आणि ३६ चेंडूंत ६६ धावांची झुंजार खेळीही केली. त्यामुळे वेस्ट इंडिजला भारतावर सात विकेट्सनी मात करणे सहजशक्य झाले.

1आज इंग्लंडविरुद्ध भारताची अस्तित्वाची झुंज
लंडन, १३ जून / पीटीआय
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर एट’ फेरीत पहिल्याच लढतीत वेस्ट इंडिजकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवामुळे गतविजेता भारतीय संघ अडचणीत सापडला असून उद्या होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विजय न मिळाल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्ण
सुरंजॉय सिंगची सोनेरी कामगिरी; नानाओसिंग व जयभगवान यांना रौप्य

नवी दिल्ली, १३ जून / वृत्तसंस्था
भारताच्या सुरंजॉय सिंग याने चीनमध्ये चालू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेत १५ वर्षांच्या कालखंडानंतर भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. थोकचोम नानाओसिंग व जयभगवान यांनी रौप्यपदक मिळविली.

भारतीय महिला संघाची पाकिस्तानवर मात
प्रियांका रॉयचे पाच बळी

टॉन्टन, १३ जून / वृत्तसंस्था

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या महिलांना अखेर सूर गवसला आणि त्यांनी दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव करीत पहिल्या विजयाची नोंद केली. भारतीय महिला संघाला पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून १० विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ ७५ धावा केल्या. भारताच्या प्रियांका रॉयने ३.५ षटकांत १६ धावा देत पाकिस्तानचा अर्धा संघ गारद केला. रुमेली धरने १३ धावांत ३ बळी घेतले.

सानिया उपान्त्य फेरीत पराभूत
बर्मिगहॅम, १३ जून / पीटीआय
भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा हिला एगॉन क्लासिक टेनिस स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत अखेर पराभव स्वीकारावा लागला. स्लोव्हाकियाच्या मॅगडालेना रायबॅरिकोव्हाने तिला ३-६, ६-०, ६-३ असे पराभूत केले. या वर्षांच्या दुसऱ्या डब्ल्यूटीए स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची तिची संधी मात्र या पराभवामुळे हुकली. सानियाने उपान्त्य फेरीत प्रवेश करून १३० डब्ल्यूटीए गुण मिळविले व १० हजार अमेरिकन डॉलरचे इनामही मिळविले. दुहेरीत मात्र तिला अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. तिची सहकारी चुआंगसह ती उपान्त्य फेरीत कॅरा ब्लॅक व लिझेल ह्युबर यांच्याशी खेळणार आहे.

खराब फलंदाजी आणि मी स्वत: पराभवास जबाबदार - धोनी
लंडन, १३ जून / पीटीआय

वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पराभवाला खराब फलंदाजी आणि मोक्याच्या क्षणी आपण स्वत: बाद झाल्याची कबुली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिली. धोनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताची अवस्था ३ बाद २९ अशी झाली होती, मात्र युवराजने धोनीसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला तेव्हाच धोनीची विकेट घेण्यात विंडीजला यश आले. धोनीनेही आपण चुकीच्या वेळी बाद झाल्याचे मान्य केले.

स्टुअर्ट ब्रॉडला आयसीसीची समज
लंडन, १३ जून / पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान आपल्या हावभावामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांचे लक्ष विचलित करण्याचा सातत्याने प्रयत्न करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने असे न करण्याबद्दल खडसावले आहे. बीबीसी स्पोर्ट्सला आलेल्या या संदर्भातील वृत्तानुसार सामनाधिकारी अ‍ॅलन हस्र्ट व पंच स्टीव्ह डेव्हिस तसेच अ‍ॅलन हिल यांनी ब्रॉड याची वागणूक योग्य नसल्याचा निष्कर्ष काढला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ब्रॉडने डिव्हिलियर्सचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजी करतानाच त्याने डाव्या हाताने कव्हर्सकडे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे हात दाखवित असल्याप्रमाणे डावा हात दाखविला. पंचांनी याची दखल घेतली. अर्थात, ब्रॉडच्या या कृत्यामुळे दक्षिण आफ्रिकेला अजिबात फरक पडला नाही. त्यांनी उलट इंग्लंडवर सात विकेट्सनी दणदणीत मात केली.