Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक दिलदार कार्यकर्ता ते खासदार राजू शेट्टी’’. एक प्रचंड मोठी झेप आणि तीही पारंपरिक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इलाख्यात. येथील संपूर्ण सत्ताकेंद्रावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीतील मित्रपक्षांचा प्रभाव. मात्र या निवडणुकीत या गडाचे बुरुज ढासळले. हे असे का झाले? ही साखरसम्राटांना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला चपराक होती. लोकांनीच आपल्या हातात निवडणूक घेतली होती की, दोन्ही काँग्रेसच्या राजकारणात आपले दुखावलेले हितसंबंध राजू शेट्टी जोपासतील अशी भावना यापाठीमागे होती, की अन्य काही कारणे याला जबाबदार होती, हे समजण्यासाठी घेतलेली ही प्रदिर्घ मुलाखत-

पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार पुन्हा एकदा सत्तारूढ झाले. महाराष्ट्रातून आणि विशेषत: मुंबईतून अनेक महत्त्वाच्या नेमणुका दिल्लीत झाल्या. यापैकी बहुतांश नेमणुका मंत्री म्हणून किंवा वरिष्ठ सनदी/सेनादल अधिकारी म्हणून असल्याने विशेष चर्चिल्या गेल्या. पण या सर्वामध्ये अत्यंत महत्वाची नेमणूक होती गुलाम इसा वहानवटी यांची.
राष्ट्रपतींनी मुंबईतील या ज्येष्ठ आणि विद्वान वकिलाची आगामी तीन वर्षांसाठी भारताचे अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नेमणूक केली आहे. मुंबईत वकिलीला सुरुवात करून देशभर गाजलेल्या मुंबईकर वकिलाची या पदावर नेमणूक होणे यात तसे नाविन्य उरलेले नाही, कारण गेल्या ६० वर्षांत अ‍ॅटर्नी जनरल पदासाठी झालेल्या १३ नेमणुकांपैकी आठ नेमणुका या मुंबईकर वकिलांच्या झाल्या आहेत आणि अ‍ॅटर्नी जनरल हे देशातील सर्वोच्च विधी अधिकाऱ्याचे पद निर्माण झाल्यापासून निम्म्याहून अधिक काळ ते महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या व्यक्तीनेच भूषविलेले आहे. वहानवटी यांच्या नेमणुकीने त्यामुळेच वकिली आणि कायद्याच्या क्षेत्रात मुंबईच्या ‘बार’चे अव्वल स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

पुन्हा एकदा कराचीच्या मॅरिएटची आठवण करून देणारा स्फोट असे पेशावरच्या स्फोटाचे प्राथमिक वर्णन करण्यात आले होते, पण ते बऱ्याच अंशी चुकीचे आहे. कराचीचे हॉटेल हे कालच्या पर्ल कॉन्टिनेण्टलप्रमाणे शहरातील उच्चभ्रू व परदेशी पर्यटकांचे एक लाडके आश्रयस्थान होते, या पलीकडे यात काही साम्य मला तरी दिसत नाही. या उलट पेशावरच्या हल्ल्यात वापरलेली पद्धत पाहता परवाची, पाक सैन्यातील तालिबानच्या एका माजी प्रशिक्षकाची, दर्पोक्ती आठवते. तो म्हणाला होता की, मी तयार केलेल्या तालिबानला कोणीही हरवू शकत नाही. जर कराची व आता पेशावरच्या बॉम्बहल्ल्यांची तुलना केली तर हे सत्य अधिकच प्रखरपणे सामोरे येते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राज्याचा पुढचा मुख्यमंत्री ठरवील अशी घोषणा त्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज्य विधानसभेच्या येत्या निवडणुकीत तिच्या सर्व २८८ जागा आधी लढवा आणि मग अशी बढाई मारा अशा आशयाची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. मनसेने बहुमत मिळविल्यावर कोणाला मुख्यमंत्री करायचे ते मी ठरवीन असे राज ठाकरे म्हणालेले नाहीत. त्यामुळे पवारांची प्रतिक्रिया गैरलागू ठरते. त्यांच्या काँग्रेस (एस)तर्फे १९८० व १९८५ आणि राष्ट्रवादीतर्फे १९९९ या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सर्व जागा लढवू शकले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसला अखिल भारतीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता असली तरी आताच्या लोक सभेच्या निवडणुकीत तो पक्ष १० टक्केसुद्धा जागा लढवू शकलेला नाही, तरी पंतप्रधानपदावर पवारांचा दावा होताच. हे सर्व पाहता राज ठाकरे यांना हिणवण्याचा शरद पवारांना मुळीच अधिकार पोचत नाही.

‘मनसेच्या भूलथापा आणि मराठी माणसाचा बळी’ हा आमदार गजानन कीर्तिकर यांचा लेख रविवार, ७ जून रोजी प्रकाशित झाला होता. मनसेचे नेते शिशिर शिंदे यांनी दिलेले प्रत्युत्तर..
महाराष्ट्राच्या विधानसभेत लागोपाठ चार वेळा आमदार म्हणून निवडून गेलेले परंतु लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना नेते गजाजन कीर्तिकर यांचा लेख वाचला. कीर्तिकर शिवसेनेच्या आणि स्वत:च्या इतिहासात फारच रमलेले दिसतात. इतिहासात डोकावयाचे असते ते स्फूर्ती घेण्यासाठी परंतु इतिहासातच जो रमला तो संपला हे कीर्तिकर विसरतात. शिवसेनेचा गेल्या १५ वर्षांंतला मुंबई-ठाणे महापालिकेतला कारभार आदर्श, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे काय, याची जनतेत जाऊन कीर्तिकरांनी चाचपणी केल्यास बरे होईल. उलट कीर्तिकरांसारख्या ज्येष्ठ व कार्यक्षम शिवसैनिकांचे सल्ले धुडकावून ‘मिलिंद संस्कृती’ जोपासण्याचे खूळ शिवसेनेत सुरू झाल्यामुळेच मुंबईची आणि मराठी माणसाची पार रया गेली. मराठी माणसाचा शिवसेनेवरचा विश्वास पूर्ण उडाला. मराठी माणसाच्या लढाईसाठी आपल्या घरादारावर निखारे ठेवलेल्या किती शिवसैनिकांची आठवण आजच्या शिवसेना नेतृत्वाने ठेवली आहे? राज ठाकरे यांनी शिवसेनेचा त्याग केल्यानंतर मात्र २००७ च्या मुंबई/ठाणे महापालिका निवडणुकांपूर्वी ज्येष्ठ शिवसैनिकांची तात्पुरती आठवण सेना नेतृत्वाला झाली एवढे मात्र खरे.

वैज्ञानिक आणि नेते देशाला नव्हे तर कंपन्यांना वाहिलेले आहेत -डॉ. पुष्पमित्र भार्गव
‘सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलेक्युलर बायॉलॉजी’ या राष्ट्रीय प्रयोगशाळेचे संस्थापक निदेशक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक पद्मभूषण डॉ. पुष्पमित्र भार्गव हे वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीदेखील विविध व्यापांमध्ये गुंतलेले असतात. आधुनिक भारत घडविण्यासाठी विज्ञानास समाजाभिमुख करण्याचा वसा घेणारी वैज्ञानिकांची पिढी कार्यरत राहिली. डॉ. भार्गव हे त्यापैकी एक! यशपाल व सतीश धवन यांचे खास दोस्त! वैज्ञानिक जगतामध्ये ‘भारतामधील आधुनिक जीवशास्त्राचे शिल्पकार’ असा त्यांचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो. हैदराबादेतील तारानाक्याजवळील डॉ. भार्गव यांच्या घरात पंधरा हजार ग्रंथांचे वैभव आहे. नोबेलचे सन्मानित पंचवीस वैज्ञानिकांच्या स्वाक्षरीसहित भेट दिलेले ग्रंथ, हुसेन, रझा यांची मूळ चित्रे, जगभरातील आदिवासींच्या कारागिरीने नटलेल्या वस्तू असे ऐश्वर्य पाहावयास मिळते. डॉ. भार्गव यांना स्वत:चे घर नाही. प्रस्तुत घरात ते भाडय़ाने राहतात. त्यांचे समर्पित आयुष्य पाहून घरमालकांनी काही वर्षांपासून भाडे घेणे थांबवून टाकले. जनुकीय अभियांत्रिकी (जेनेटिक इंजिनीअरिंग) या संज्ञेचे जनक डॉ. भार्गव हेच आहेत. त्यांनी १९७३ साली एका निबंधामध्ये ही संज्ञा पहिल्यांदा वापरली होती.