Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

विविध

‘बेशिस्तपणा खपवून घेणार नाही’
भाजप नेत्यांना राजनाथ सिंह यांचा इशारा

नवी दिल्ली, १३ जून/खास प्रतिनिधी
ज्येष्ठ भाजप नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांना हाताशी धरून पक्षात सुरु केलेल्या सुंदोपसुंदीला लगाम लावण्याच्या उद्देशाने पक्षातील बेशिस्त यापुढे मुळीच खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दिला. पक्षनेतृत्व दिशाहीन व संभ्रमित झाल्याच्या वृत्ताचाही त्यांनी ठामपणे इन्कार केला.

सर्व प्लुटोनियम शस्त्रास्त्रांसाठी वापरण्याचा उत्तर कोरियाचा इशारा
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे र्निबध जारी
सोल १३ जून/पीटीआय

आपल्याकडे असलेल्या सर्व प्लुटोनियमचा वापर शस्त्रास्त्रांसाठी करू असा इशारा उत्तर कोरियाने आज दिला आहे. क्षेपणास्त्र चाचणीच्या कृत्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी लादलेल्या र्निबधावर चिडून जाऊन उत्तर कोरियाने सूडाच्या भावनेतून हा इशारा दिला आहे. युरेनियमचे शुद्धीकरण करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला जाईल असे त्या देशाने स्पष्ट केले.

इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीत अहमदिनेजाद यांनी बाजी मारली..
तेहरान, १३ जून/पीटीआय

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इराणच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष महमूद अहमदिनेजाद यांनी विजयाकडे घोडदौड सुरू केली आहे. अधिकृत निकालात त्यांची आघाडी स्पष्ट झाली आहे. त्यांच्या समर्थकांनी तेहरानच्या रस्त्यांवर सकाळपासूनच जल्लोष सुरू केला.

मेलबर्नमध्ये पुन्हा भारतीय विद्यार्थ्यांला झाली मारहाण..
मेलबर्न, १३ जून/पी.टी.आय.

गुजरातच्या सुरत येथून मेलबर्न येथे शिकण्यासाठी गेलेल्या एका २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला झाला असून ऑस्ट्रेलियात सध्या वांशिक हल्ल्याचे पेवच फुटल्याचे हृद्यद्रावक दृश्य त्यामुळे अनुभवण्यास मिळत आहे. हार्दिक बिपिनभाई पटेल असे या मुलाचे नाव असून शुक्रवारी रात्री तो आपल्या मोटारीत बसण्याच्या बेतात असतानाच तिघा ऑस्ट्रेलियन युवकांनी त्याला मारहाण केली. हे तिघे ऑस्ट्रेलियन अंमली पदार्थ सेवनाच्या आहाराखाली गेल्याचे बोलले जात आहे. कमर्शियल कुकरीच्या अद्ययावत अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मारहाण झाली आहे. त्याच्या डोक्यातही वार करण्यात आल्यानंतर तो बेशुध्द पडला. ऑस्ट्रेलियन युवकांनी त्याच्याकडील मोबाइल, पैसे आणि मोटारीच्या चाव्या चोरून नेल्या. वृध्द ऑस्ट्रेलियन माणसाने त्याला रुग्णालयात दाखल होण्यासाठी मदत केली.

अमर्त्य सेन यांना केंब्रिज विद्यापीठाची डी. लिट.
लंडन, १३ जून/पी.टी.आय.

अर्थशास्त्रामध्ये भारतीय नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांना केंब्रिज विद्यापीठातर्फे सन्माननीय डी. लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमधून अर्थशास्त्रामध्ये मास्टर्स पदवी मिळविणारे हे सध्या अमेरिकेच्या हॉवर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयाचे प्रोफेसर आहेत. डय़ूक ऑफ एडीन्बरो प्रिन्स फिलीप यांच्या हस्ते सेन यांना सन्मानपूर्वक डी. लिट. प्रदान करण्यात आली. बिल आणि मेलिंडा गेट्स तसेच करीम अल-हुसैनी आगा खान यांनाही सन्मानपूर्वक पदव्या प्रदान करण्यात आल्या.

लालू यादव यांचे विश्वासू श्याम रजक यांचा राजीनामा
पाटणा, १३ जून/पी.टी.आय.

राष्ट्रीय जनता दल हा पक्ष म्हणजे लालूप्रसाद यादव यांची जहागिरदारी झाली आहे अशी कडवट टीका करून त्यांचे एकेकाळचे विश्वासू साथीदार श्याम रजक यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. रजक यांनी आमदारकीचाही राजीनामा झाला असून ते संयुक्त जनता दलात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बिहार विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांच्याकडे रजक यांचा राजीनामा पोहोचला असून त्यांनी तो स्वीकारण्यात आल्याचे घोषित केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला केवळ चार जागा मिळाल्याबद्दल रजक यांनी कडवट टीका केली असून या पक्षाचे अस्तित्व लवकरच संपुष्टात येईल, असे भवितव्य त्यांनी व्यक्त केले आहे. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये २२ जागा घेणारा राजद आता कुठे हरवला आहे, असा सवालही रजक यांनी केला. तीन खेपेस आमदार म्हणून निवडून आलेले श्याम रजक लालू आणि राबडीदेवी यांच्या मंत्रीमंडळात नऊ वर्षे मंत्री होते.