Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

अग्रलेख

‘भाजप’मधील अंदाधुंदी!

भारतीय जनता पक्षात सध्या जे काही चालू आहे, त्याला यादवी म्हणता येणार नाही. यादवीत आणि अंदाधुंदीत फरक आहे. यादवीत दोन मुख्य गट परस्परविरोधी असतात. अंदाधुंदीत कोण कोणाच्या विरुद्ध आहे आणि कोण कोणाच्या बाजूने हे सांगणे कठीण असते. भाजपमधील आताची अंदाधुंदी व हल्लकल्लोळ केवळ वैचारिक नाही तर संघटनात्मकसुद्धा आहे. संघटना विस्कटलेली असल्यामुळे अनेक गट पक्षात एकमेकांच्या विरोधात कारस्थाने करीत आहेत. त्यामुळे त्यातला कोणता गट कुणावर कधी चाल करून जाईल, ते सांगता येणे अवघड आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीने ‘भाजप’ला जर सत्तेवर आणले असते, तर आज भांडणाऱ्यांमधले कुणी अर्थमंत्री, कुणी परराष्ट्रमंत्री, तर कुणी मनुष्यबळ विकासमंत्री बनून उपरणे खांद्यावर टाकून मिजाशीत मिरवताना दिसले असते. त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्यावर झालेला आघात जिव्हारी आहे आणि ज्यांच्या तो वर्मी बसला ते बाचाबाचीला सिद्ध झाले आहेत. माजी परराष्ट्रमंत्री आणि त्या आधीचे अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि

 

राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदही सोडून दिले. हे त्यांनी निमूटपणे केले असते तर त्यांच्या नाकदुऱ्या काढायला भलीभली नेतेमंडळी पुढे आली असती. सिन्हांनी तसे केले नाही. पदांचा त्याग करताना पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांना त्यांनी पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी अपयशाचे धनी असणाऱ्यांना बक्षिसी दिली जात आहे आणि सध्या सारे काही आलबेल असल्याच्या भ्रमात पक्ष गुंतून पडला आहे, असा आरोप केला आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ज्यांना पक्षाने निवडले, त्यांनी पक्षाच्या दारुण पराभवानंतर नेतेपदाचा राजीनामा देऊन ‘चांगला आदर्श’ निर्माण केला, असे सिन्हांनी म्हटले आणि पक्षाच्या पराभवाचे प्रायश्चित्त म्हणून सर्वानीच त्यांचे अनुकरण करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. प्रत्यक्षात मात्र अडवाणींनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेऊन आणखी एक वेगळाच ‘आदर्श’ निर्माण केला, त्याबद्दल सिन्हांनी काहीही म्हटलेले नाही. सिन्हा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कधीही नव्हते. त्यांची व्यक्तिगत श्रद्धा सेक्युलर परंपरेतील आहे. काहीशी बिहारी-लोहियावादी समाजवादीसुद्धा. त्यामुळेच ते चंद्रशेखर व व्ही. पी. सिंग यांच्या हातात हात घालून ‘साथी हाथ बढाना’ म्हणू शकत होते. भारतीय प्रशासकीय सेवेतून पुढे आलेले नोकरशहा, ही त्यांची त्यापूर्वीची ओळख होती. तरीही त्यांनी संघाला मनापासून हवी असणारी भूमिका या खेपेला वठवली आहे! बहुमत मिळाले तर पंतप्रधान व्हा, अन्यथा राजीनामा देऊन राजकारणातूनच निवृत्त व्हा, असे संघाने अडवाणींना निवडणूकीपूर्वीच बजावले होते. अडवाणींनी राजीनामा दिला, पण तो मागे घेऊन संघाच्या आदेशाला धुडकावून लावले. तेव्हापासून ‘अडवाणी विरुद्ध संघ’ असे एक वेगळेच युद्ध खेळले जाऊ लागले आहे. महमद अली जीनांविषयी कराचीत अडवाणींनी जे गौरवोद्गार काढले, त्याबद्दल त्यांना संघाने अजूनही माफ केलेले नाही. त्यातून या निवडणुकीत भाजपतर्फे जे निवडून आले, त्यात संघाची बांधिलकी मानणाऱ्यांच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे, हे संघाचे आणखी एक वेगळेच दुखणे आहे. सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि पक्षांतर्गत मतदानातून त्यांच्या जागा भरल्या तर पक्ष सुधारेल असे सिन्हांना वाटते आहे. संघाला मात्र सध्या फक्त अडवाणींनीच जावे असे वाटते. म्हणजेच संघ हा सध्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सिन्हांचा बोलविता धनी झाला आहे. सिन्हांना लोकसभेत विरोधी बाकावरल्या पहिल्या रांगेत बसायला मिळाले नाही आणि सुषमा स्वराज यांना अडवाणींनी उपनेतेपदी नेमले म्हणून सिन्हा संतापले, हे तितके खरे नाही. सुषमा स्वराज यांचे नाव जेव्हा अडवाणींच्या पश्चात विरोधी पक्षनेतेपदासाठी घेतले जात होते, तेव्हा लोकसभेत अडवाणी उपस्थित असताना आपण विरोधी नेतेपदी बसणे योग्य नाही, असे सुषमा स्वराज यांनी म्हटले होते. याचा अर्थ सुषमा स्वराज या अडवाणींना अजूनही मानतात, असा सोयीस्कर घेता येतो, पण त्याचा अर्थ असाही होतो, की अडवाणी लोकसभेत राहणार नसतील तरच त्यांच्या त्या पदावर जाऊन बसण्यात अर्थ आहे. सोनिया गांधी जर पंतप्रधान झाल्या, तर आपण केशवपन करून घेऊ, असे सुषमा स्वराज २००४ मध्ये म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या ‘मॅच्युरिटी’बद्दल पक्षात बऱ्याचजणांना शंका आहे. या खेपेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे मन:पूर्वक अभिनंदन अलिकडेच संघाने केले होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेतृत्वाला भक्कम आधार देऊन मोठे केले, पण अडवाणींसारख्या भक्कम नेत्याला संघाने कमकुवत बनवले, म्हणून अडवाणींच्या बाजूचे काही प्रचारक ऊरबडवेपणा करताना दिसत आहेत. म्हणजेच संघावरच शरसंधान करणारी ही मंडळी, पक्षाच्या मूळ शक्तिस्थानालाच क्षीण करीत आहेत, अशी भावना नागपूरमध्ये आहे. भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांनी तर भाजपला हिंदुत्वाने आडवे केले, असे मत प्रदर्शित केले आहे. भाजपच्या सत्तेच्या काळात ओरिसात ख्रिश्चनांवर हल्ले होतात, कर्नाटकात भाजपचे सरकार सत्तेवर येताच हिंदुत्ववादी हिंस्र टोळकी ‘पब’मध्ये जाणाऱ्या तरुणींवर हिंदुत्वाच्या नावाखाली हल्ले करतात, हे स्वत आधुनिक हिंदू असणाऱ्या उदारमतवाद्यांना पटणे शक्य नाही. या नव्या आधुनिक मध्यमवर्गानेच भाजपला पराभवाचा दणका दिला, असे त्यांनी म्हटले आहे. जसवंत सिंह यांनीही एका मुलाखतीत ‘हिंदुत्व म्हणजे तरी काय’, असा प्रश्न केला आहे. भाजपने भूतकाळात रममाण होणे आता सोडून द्यावे आणि वर्तमानात जगावे, अन्यथा आता आहे त्यापेक्षा या पक्षाची अवस्था बिकट होईल, असे त्यांना वाटते आहे. त्यांना भाजपने जाब विचारलेला नाही. अडवाणींना राजनाथ सिंह भेटले आणि त्यांनी जसवंत सिंहांवर काहीही कारवाई करायची नाही, असे जाहीर केले. सिन्हांच्या पत्रानंतर मात्र त्यांचे बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही म्हणून दम दिला. ‘मीडिया’कडे न जायचा सल्लाही त्यांनी दिला आहे. राज्यसभेत ज्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले आहे, ते अरुण जेटली मात्र पक्षनेतृत्वावर आपल्या स्तंभात खुलेआम टीका करून मोकळे झाले आहेत. त्यांना पक्षाने नाराजीची साधी चिठ्ठीही पाठवलेली नाही. पक्षाचा पराभव का झाला, त्यावर पक्षनेत्यांनी एकत्र येऊन विचार करायला हवा, हेच यशवंत सिन्हांचे म्हणणे आहे. राजनाथ सिंहांना त्यावर विचार करायचा आहे, पण तो ऑगस्टमध्ये. म्हणजेच सर्वत्र शांत-शांत असल्याचे दाखवायचे हे कारस्थान आहे, असे सिन्हांना वाटते. ऑगस्टमध्ये हे नेते जेव्हा चिंतनासाठी एकत्र बसतील तेव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतील. मग अशा वेळी उणीदुणी नकोत म्हणून एकमुखाने ठराव सादर होईल आणि पराभवावर कायमचेच पांघरूण घातले जाईल. पक्षाच्या या अशा सारवासारवीने पक्षाचे नुकसानच होणार आहे, असे त्यांच्यापैकी अनेकांना वाटते. पक्षातल्या म्हाताऱ्यांची संख्या हाही पुन्हा वादाचा आणखी एक मुद्दा आहे. पक्षाला मध्यमवर्गाने सोडले आहे, तरुण वर्ग पक्षाचे नाव उच्चारले, तरी दूर पळतो, ही सध्याची त्यांची चिंता आहे. अटलबिहारी वाजपेयींनी अडवाणींना मोठे होऊ दिले नाही आणि अडवाणींनी नवीन नेतृत्वाची फळी निर्माण केली नाही! अडवाणींनी तत्त्वांना पायदळी तुडवून आपले व्यक्तिमत्त्व साकारले, हा संघाने आळवलेला आणखी एक राग आहे. नरेंद्र मोदी-वरुण गांधी प्रणीत आक्रमक हिंदुत्व आता संघाने सोडलेले दिसते. ती ‘सावरकरवादी’ शैली नागपूरस्थित मुत्सद्दय़ांना मान्य नाही. भारतीयत्व आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद पुन्हा समर्थ करायचा, तर अधिक उदारमतवादी व्हावे लागेल असे बऱ्याचजणांना, संघातही वाटते. जागतिकीकरण-उदारीकरणाबद्दलही भाजपत वैचारिक स्पष्टता नाही. एकूण काय, तर पराभवानंतर भाजपचा धुणी धुवायचा घाट बनला आहे; कुणीही यावे आणि आपली धुणी धुऊन निघून जावे, अशी त्या पक्षाची सध्याची अवस्था आहे. त्यातून ते वर येतील, अशी शक्यता मात्र दिसत नाही.