Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रवेशाचे इंजिनिअरिग
प्रवेश परीक्षांचा (सीईटी) निकाल जाहीर झाला आहे. आता वेध लागले आहेत ते वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाचे. यासंदर्भात विविध शंकांचे काहूर विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांच्याही मनात उठले असेल. या शंकांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न..
स्वायत्त महाविद्यालयांचे अर्ज १८ तारखेपासून मिळणार आहेत. गेल्या वर्षी अर्जाची किंमत रु.६००/- होती आणि अर्ज भरण्यासाठी सीईटीमध्ये किमान ११० मार्क मिळणे आवश्यक होते.

 

(राखीव जागांसाठी किमान १०० मार्क आवश्यक होते). या वर्षी बहुधा यात बदल अपेक्षित नाही. या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात ए.आय.ई.ई.ई. मधून जागा नाहीत. मॅनेजमेंट सीट्स नाहीत. विश्वकर्मा (व्ही.आय.टी.)मध्ये मात्र मॅनेजमेंटसाठी २० टक्के जागा आहेत.
स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया ही मुलाखत पद्धतीने चालते. यासाठी त्या प्रवेश फेरीच्या वेळी उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेमध्ये ऑप्शन फॉर्म नसतो. या स्वायत्त महाविद्यालयांमध्ये होम युनिव्हर्सिटी व इतर युनिव्हर्सिटी असा प्रकार नसतो. सर्व जागा स्टेट मेरिटनुसार भरल्या जातात. आता आपण इतर सर्व, म्हणजे २०० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशासंबंधी विचार करू.
गेल्या लेखात मी सांगितले होते की प्रवेश प्रक्रिया चालू झाली तरी ऑप्शन्स भरायला अजून वेळ आहे. सीईटीचा रिझल्ट लागला की आपल्याला एक पर्सनल माहितीचा फॉर्म भरून त्याचा प्रिंटआऊट एआरसीमध्ये द्यावयाचा असतो. त्याचवेळी आपल्या कागदपत्रांची छाननी होते. याच गोष्टी ए.आय.ई.ई.ई. साठीसुद्धा करायच्या आहेत. यासंबंधीची सर्व माहिती वृत्तपत्रात जाहिरातीच्या रुपाने प्रसिद्ध होते. कदाचित एव्हाना झालेली असेल. या आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यास आपल्याला सुमारे ८ ते १० दिवसांचा अवधी असतो. यानंतर राऊंड १, म्हणजेच प्रवेश फेरी क्र.१ ची सुरुवात होईल. त्यासाठी आपल्याला सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांची माहिती आवश्यक आहे. ती माहिती असलेली पुस्तिका साधारणपणे ५-७ जुलैला मिळेल. अर्थात ए.आर.सी.मधून आणावी लागेल आणि त्यानुसार आपण पहिल्या फेरीसाठीचे ऑप्शन्स तयार करायचे आहेत.
आता या प्रवेशप्रक्रियेमधील फेरी १, फेरी २ याकडे लक्ष देऊया.
प्रथम फेरीसाठीचे नियम गेल्या वर्षी असे होते-
(या वर्षी तेच नियम असतील, परंतु ते काही काळाने प्रकाशित होतील)
प्रथम फेरीसाठी एकूण २० ऑप्शन्स देता येतील.
कमीतकमी १ आणि जास्तीतजास्त २० ऑप्शन्स.
यापैकी ऑप्शन क्रमांक १ ते ९ पैकी जागा मिळाल्यास ती सक्तीची जागा असेल. याचा अर्थ असा की तुम्ही प्रवेश नक्की केलात अथवा जागा सोडलीत, तरी तुम्ही पुढील फेरीत अर्ज करू शकणार नाही.
परंतु ऑप्शन क्रमांक १० ते २० पैकी जागा मिळाल्यास ती ऐच्छिक असेल. तुम्ही प्रवेश नक्की केलात तर अर्थातच पुढची फेरी नाही. पण जागा सोडलीत तरी तुम्ही पुढील फेरीत अर्ज करू शकता.
दुसऱ्या फेरीसाठीचे नियम गेल्या वर्षी असे होते-
दुसऱ्या फेरीसाठी एकूण ३० ऑप्शन्स देता येतील.
कमीतकमी १ आणि जास्तीत जास्त ३० ऑप्शन्स.
यापैकी ऑप्शन क्रमांक १ ते १५ पैकी जागा मिळाल्यास ती सक्तीची जागा असेल. याचा अर्थ असा की तुम्ही प्रवेश नक्की केलात अथवा जागा सोडलीत, तरी तुम्ही पुढील फेरीत अर्ज करू शकणार नाही.
परंतु ऑप्शन क्रमांक १६ ते ३० पैकी जागा मिळाल्यास ती ऐच्छिक असेल. तुम्ही प्रवेश नक्की केलात तर अर्थातच पुढची फेरी नाही. पण जागा सोडलीत तरी तुम्ही पुढील फेरीत अर्ज करू शकता.
प्रथम फेरीमध्ये जर काही जागा रिकाम्या राहिल्या तर त्या जागा दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होतील. खरं म्हणजे प्रथम फेरीत जागा रिकाम्या राहत नाहीत. त्या रिकाम्या होतात कारण काही विद्यार्थी मिळालेला प्रवेश नक्की करत नाहीत. प्रवेश नक्की करणे म्हणजे ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे त्या अभियांत्रिकी महाविद्यालयात जाऊन फी भरणे. एकदा का तुम्ही फी भरलीत की तुम्ही पुढील फेरीत भाग घेऊ शकत नाही. काही विद्यार्थ्यांना दोन जागा मिळतात. एक सीईटी मधून, तर दुसरी एआयईईई मधून. अर्थात ते एकाच जागी प्रवेश नक्की करतात आणि उरलेली जागा पुढील फेरीसाठी रिकामी होते.
काही विद्यार्थी मिळालेल्या जागेवर प्रवेश न घेता पुढील फेरीसाठी थांबण्याचा विचार करतात. हा विचार धोकादायक ठरु शकतो. काही विद्यार्थ्यांना मात्र प्रथम फेरीत कोणतीही जागा मिळत नाही. म्हणजे त्यांनी दिलेल्या ऑप्शनपैकी कोणतीही जागा त्यांच्या प्रवेशाच्या वेळी रिकामी नव्हती. अशा विद्यार्थ्यांनी निराश न होता दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन्स भरावेत. त्या वेळी मात्र कोणत्या जागा रिकाम्या आहेत हे पाहूनच ऑप्शन्स भरावेत.
या प्रक्रियेमध्ये सीईटीसाठी असलेल्या जागा प्रत्येक महाविद्यालयात प्रत्येक शाखेत ७० टक्के जागा होम युनिव्हर्सिटी व ३० टक्के जागा इतर युनिव्हर्सिटीसाठी अशा विभागल्या जातात. आपण जे ऑप्शन देतो त्यामध्येच युनिव्हर्सिटी/ कॉलेज/ ब्रँच अशी माहिती असते. त्याचप्रमाणे आपली होम युनिव्हर्सिटी ही ठरलेलीच असते. जेव्हा ऑप्शन विचारात घेतला जातो त्या वेळी जर तो तुमच्या होम युनिव्हर्सिटीतील कॉलेजचा असेल तर ७० टक्के जागांमध्ये जागा रिकामी आहे का हे पाहिले जाते. अन्यथा आपला ऑप्शन हा ३० टक्के जागेसाठी विचारात घेतला जातो. याचा अर्थ असा की आपण ऑप्शन्स हे कोणत्याही क्रमाने देऊ शकतो. एकच ब्रँच होम युनिव्हर्सिटीमधील वेगवेगळी कॉलेजेस, एकच ब्रँच इतर युनिव्हर्सिटीमधील वेगवेगळी कॉलेजेस किंवा वेगवेगळ्या ब्रँचेस वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधील वेगवेगळी कॉलेजेस, तरीही हा झाला नियम. आपण मात्र आधी विचार केलेल्या क्रमानेच हे ऑप्शन्स देणार आहोत.
ऑप्शन फॉर्मनुसार प्रवेश कसा दिला जातो?
सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे- आपला फॉर्म जेव्हा अ‍ॅलोटमेंटसाठी येतो तेव्हा फक्त आपले ऑप्शन्स असतात आणि त्या वेळेला असलेल्या रिकाम्या जागा, अर्थात जागा या त्या त्या वर्गवारीप्रमाणे रिकाम्या असतात. आपण दिलेले ऑप्शन्स हे त्याचक्रमाने विचारात घेतले जातात. क्रमांक १ च्या ऑप्शनची जागा रिकामी आहे का ते पाहिले जाते. असल्यास ती जागा सीट, तुम्हाला दिली जाते, अ‍ॅलोट होते. नसल्यास क्रमांक २ चा ऑप्शन विचारात घेतला जातो आणि ही प्रक्रिया तुम्हाला सीट अ‍ॅलोट होईपर्यंत किंवा ऑप्शन्स संपेपर्यंत चालू राहते. ही संपूर्ण प्रक्रिया संगणकाच्या साहाय्याने पार पडते. यात कोणतीही शंका घेण्याचे काहीही कारण नाही. कोणतीही चूक होण्यास इथे कसलाच वाव नाही. कोणत्याही प्रकारे कसलाच फेरफार करणे केवळ अशक्य आहे. हे सांगणे अशासाठी आवश्यक होते कारण आपल्याला हवी असलेली जागा न मिळाल्यास आपण सरळ त्या बिचाऱ्या संगणकाच्या माथी खापर फोडतो. तो काय करणार? ऑप्शन तुम्ही देता, नियम सरकार करते आणि हा बिचारा त्यांचे पालन करत सगळी प्रक्रिया निमूटपणे पार पाडतो.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट- समजा, तुम्ही एखादे कॉलेज दिले आहे क्रमांक ७ चा ऑप्शन म्हणून आणि तुमच्या नंतरच्या विद्यार्थ्यांने तोच ऑप्शन क्रमांक १ ला दिला आहे. समजा एकच जागा शिल्लक आहे, तर ती कोणाला मिळणार? तुम्हाला का त्या नंतरच्या विद्यार्थ्यांला? खरं म्हणजे उत्तर सोपं आहे. ती जागा तुम्हालाच मिळणार अगदी क्रमांक २० वर लिहिलात तरी. कारण तुमचा मेरीट क्रमांक त्या मुलाच्या/ मुलीच्या आधी आहे. ऑप्शनचा क्रम हा तुमच्या आवडीनुसार आहे. एखादं कॉलेज हे आधी का नतंर ते तुमच्या आवडीनुसार विचारानुसार ठरेल. कॉलेज क्रमांक १ ला लिहिल्यास मिळण्याची शक्यता अधिक आणि क्रमांक १० ला लिहिल्यास शक्यता कमी, असे काहीही नसते. जागा रिकामी असणं एवढय़ा एकाच गोष्टीवर ते अवलंबून असते. जेव्हा आपण ते कॉलेज क्रमांक १० ला लिहितो तेव्हा पहिल्या ९ जागांपैकी जर काहीही मिळाले नाही तर हा ऑप्शन, असा याचा अर्थ होतो.
प्रा. अभय केशव अभ्यंकर
www.trialallotment.com
मोबाईल ९८२२०६७४१७, ९८२२०२६६७३