Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ऑप्शन फॉर्म कसा भरावा?
साधारणपणे ऑप्शन्स भरताना आपण आपल्या निवडीनुसार एक क्रमावली तयार केली पाहिजे. हा क्रम तयार करताना फक्त आपल्याला काय हवं आहे याचाच विचार केला पाहिजे. आणि आधीच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ऑप्शन भरताना हा विचार केला पाहिजे की जर आधीचा कोणताही

 

ऑप्शन मिळाला नाही तरच आपल्याला हा ऑप्शन हवा आहे ना? प्रत्येक वेळी हो हेच उत्तर घेऊन मगच पुढचा ऑप्शन शोधावा. हा क्रम साधारणपणे सर्व कॉलेज ब्रँचसाठी तयार करावा.
एकदा का ही क्रमावली तयार झाली की मग आपण ही माहिती मिळवायला हवी की साधारणपणे आपल्या सीईटीच्या मार्कानुसार गेल्या वर्षी काय काय मिळू शकत होतं? त्यानुसार मग पहिल्या मिळू शकणाऱ्या ऑप्शनच्या आधीच्या ४ ते ५ ऑप्शनपासून आपला फॉर्म भरावा. शक्यतो आपण ठरविलेल्या क्रमावर ठाम राहावे. विचार करताना तो सर्व बाजूंनी करावा. शक्यतो विचारातील मुद्दे लिहून ठेवावेत. यामुळे कोणाच्याही सांगण्यावरून उगाचच क्रमावलीमध्ये ढवळाढवळ होणार नाही. कारण हा क्रम अतिशय महत्त्वाचा आहे. खालीवर झाल्यास नको तो ऑप्शन मिळेल आणि हवे आहे ते मिळू शकत असूनही निसटून जाईल. असे झाल्यास या वर्षीच्या नियमांप्रमाणे तो प्रवेश अनिवार्य असेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला पुढील फेरीत संधी मिळणार नाही. यासाठी आपण माझ्या वेबसाईटचा अवश्य उपयोग करून घेऊ शकता,. या वेबसाईटवर अगदी ऑप्शन तयार करण्यापासून ते काय मिळेल या पर्यंतच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे सहजी मिळतात. याशिवाय ई-मेलवरून आपण माझे मार्गदर्शनसुद्धा घेऊ शकता. गेल्या वर्षी या सीटचा वापर शेकडो विद्यार्थ्यांनी करून घेतला होता.
ऑप्शनचा क्रम कसा ठरवावा?
’ प्रथम निवड कॉलेजची का ब्रँचची?
माझ्या मते जेव्हा आपण इंजिनिअरिंगला जाण्याचा विचार करतो तेव्हाच आपण कोणत्या शाखेकडे जाणार हा विचार झालेला असतो. ब्रँचलाच प्रथम प्राधान्य दिले पाहिजे आणि मग ती ब्रँच जिथे आहे त्या कॉलेजेसचा क्रम ठरवावा.
’ ब्रँचचापण क्रम ठरवायला हवा का?
होय. सध्याची एकूण परिस्थिती पाहता प्रत्येकाला जे हवं ते मिळणं कदाचित अवघड आहे. त्यासाठी काही तरी पर्यायी निवड केलेली असणं खूप गरजेचे आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे इंजिनिअर होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपण आपलं करिअर तयार करु शकतो. सर्व ब्रँचेस चांगल्या आहेत. सर्व ब्रँचेसना पुढे वाव आहे आणि मुख्य म्हणजे कोणत्याही शाखेमधून पुन्हा सॉफ्टवेअरकडे येण्याचे मार्ग खुले आहेत. कारण जो इंजिनिअर होतो त्याची विचार करण्याची शक्ती एका वेगळ्या प्रकारे तयार होत असते. कोणत्याही प्रॉब्लेमकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन निर्माण झालेला असतो आणि याचा सॉफ्टवेअरमध्ये नक्कीच चांगला उपयोग झालेला असतो. कोणत्याही एका मूलभूत इंजिनिअरिंगचे ज्ञान हे एकूणच अ‍ॅप्लिकेशनच्या विभागात आमुलाग्र वेगळेपण दाखवून देते.
’ कॉलेजेसच्या ग्रेड्सचा उपयोग करावा का?
निश्चितच. नॅकने या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे परीक्षण करून सर्व गोष्टींचा विचार करून मगच या ग्रेड म्हणजे श्रेणी दिलेल्या असतात. त्यानुसार क्रम ठरवताना याचा उपयोग होतोच. पण याचा अर्थ असा मात्र नक्कीच नाही की जर श्रेणी नसेल तर ते महाविद्यालय चांगले नाही. काही नवीन कॉलेजेस अत्यंत चांगली असूनही त्यांना श्रेणी असणार नाही.
’ क्रम कसा ठरवावा?
क्रम ठरवताना वरील गोष्टी लक्षात ठेवूनच. प्रथम या कॉलेजेसचे ३ किंवा ४ गट करावेत. हे गट करताना कॉलेजची ग्रेड आणि आपल्याला हवी असलेली ब्रँच या गोष्टी विचारात घ्याव्यात. साधारणपणे आपल्या माहितीच्या आधारे उत्तम, चांगली, बरी आणि चालेल असे गट असावेत. प्रत्येक गटात ५-६ कॉलेजेस असावीत. त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या शाखांचा क्रम ठरवावा. साधारणपणे ४ ब्रँचेस निवडाव्यात.
आता कॉलेजच्या पहिल्या गटातील प्रत्येक कॉलेजला प्रथम क्रमांकाची ब्रँच घेऊन ऑप्शन तयार करावा. अशा रीतीने पहिले ५ ते ६ ऑप्शन वेगवेगळ्या कॉलेजला पण हव्या असलेल्या ब्रँचला पडतील.
आता निर्णयाचा बिंदू आला. आता ठरवा की अजूनही ब्रँचचाच हट्ट कायम ठेवायचा की कॉलेजला महत्त्व द्यायचे.
समजा कॉलेजला महत्त्व दिले तर याच कॉलेजमध्ये पुढच्या ब्रँचचे ऑप्शन्स द्या. समजा ब्रँचला महत्त्व दिले तर कॉलेजचा पुढचा गट घ्या आणि याच ब्रँचचे ऑप्शन्स भरा. अशा रीतीने साधारणपणे ६० ऑप्शन्स तयार ठेवा.