Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वैद्यकीय प्रवेशातील काही ‘पथ्ये’
गेल्या सोमवारच्या लेखानंतर अखिल महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी/ पालकांचे दूरध्वनी व सं-पत्रे

 

(ई-मेल्स) आली. बऱ्याच शंका या सर्वसाधारण स्वरूपाच्या, तर काही खासगी होत्या. अशा प्रकारच्या लेखातून सामायिक समस्यांचे निराकरण करता येते, पण प्रत्येकाच्या वैयक्तिक समस्यांची उत्तरे यातून मिळतीलच असे नाही. त्यासाठी विशेष समुपदेशनाची गरज असते. ज्या सामायिक शंका वा प्रश्न प्रामुख्याने विचारले गेले ते असे- मला (माझ्या पाल्याला) प्रवेश मिळेल का, मिळाला तर कोठे प्रवेश मिळणार, पाहिजे तेथे मिळेल की नाही, की आम्हाला बी.एस्सी. वा इतर पर्यायी अभ्यासक्रमाची निवड करावी लागेल? या व विशेषत अशा विचारांनी लोक व्यापलेले आहेत.
अनेकांच्या मनात ज्या शंका आहेत त्यातून लक्षात येते की बऱ्याचजणांनी माहितीपत्रक नीट वाचलेले नाही. बारावीच्या निकालानंतर त्या निकालानुसार घरात गोंधळाचे वातावरण आहे. आता प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यात कदाचित अजून थोडी भरच पडणार आहे. या वातावरणात विद्यार्थी व पालकांना थोडा दिलासा व मार्गदर्शन देणे हा आजच्या लेखाचा प्रमुख उद्देश आहे. यानंतरही काही प्रश्न वा शंका राहिल्यास त्या जरूर विचाराव्यात.
आरोग्य विज्ञान ही जीवनाची दिशा ज्यांनी ठरविली वा जे ठरवतील त्यांच्यासाठी इतर माहिती पुढीलप्रमाणे-
आरोग्यविज्ञान विद्याशाखांमध्ये प्रवेश घेताना सर्वप्रथम प्रवेश प्रक्रिया नीट समजून घ्यावी. ती एकदा समजली की त्यातून आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमास व हव्या त्या (मिळू शकणाऱ्यातील उत्तम) महाविद्यालयात प्रवेश कसा मिळवायचा ते ध्यानात येईल.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सदर प्रक्रिया व तिचे नियम हे दरवर्षी बदलत असतात. त्यामुळे मागील वर्षी वा त्यापूर्वी प्रवेश घेतलेल्यांची माहिती, अनुभव वा मत यावर पूर्णपणे विलंबून राहू नये. यंदाची माहिती व नियमावली हेच आपल्याला लागू होय. त्यासाठी संबंधित माहितीपत्रक काळजीपूर्वक शब्दनशब्द वाचून काढावे. त्यातील पात्रतानिकष विविध मुदती व तारखा (उदा. गुणपडताळणीसाठी अर्ज करणे इ.) सर्व प्रकारची आरक्षणे व त्यांचे प्रमाण, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे (पैकी आपल्याकडे जी नसतील ती मिळविणे), समान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणानुक्रम ठरविण्याचे नियम (टाय व टायब्रेकर) इ. या विषयीचा मजकूर एक-दोनदा व्यवस्थित वाचून पैकी आपल्याला जे नियम लागू आहेत त्याची नोंद करून ठेवावी.
आधी आपल्याला कोणते शिक्षण घ्यायचे आहे ते ठरवा. हा निर्णय महत्त्वाचा असून, तो विद्यार्थ्यांचा कल व क्षमता, पालकांचे विचार, मत तसेच आर्थिक- सामाजिक परिस्थिती वगैरे घटकांवर अवलंबून असतो. याहून महत्त्वाचे ठरते ते इतरांचे मत. कारण बहुसंख्य विद्यार्थी व पालक हे याबाबत अनेकांचा सल्ला घेत असतात. ज्यांचा सल्ला आपण घेत आहोत त्यांचा अनुभव व दर्जा तसेच त्यांचे त्या क्षेत्रातील ज्ञान व त्यांची माहिती किती अद्ययावत आहे याबाबत आधी खात्री करून घेणे अत्यंत महत्त्वाचे. कारण या निर्णयावर आपले व आपल्या पाल्याचे संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे, ही बाब ध्यानात घ्यावी.
अभ्यासक्रम ठरविल्यानंतर महाविद्यालयांची यादी वाचून आपल्याला हव्या त्या महाविद्यालयांची नावे ओळीने नक्की करावीत. बरेचसे लोक सर्वात भारी संस्थेला प्राधान्य देतात. तथापि, माणसांप्रमाणेच एकूणच शिक्षणक्षेत्रात संस्थांबाबतही नाव आणि दर्जा यांची नक्की सांगड असेलच असे नाही. शिवाय शिक्षक/ प्राचार्य यांच्या बदल्या, कंत्राटी/ मानद अध्यापकांचे प्रमाण व उपस्थिती, नव्या निदानोपचार पद्धती व रुग्णसंख्या, नवीन इमारती/ वसतिगृहे, शिक्षणेतर उपक्रम वगैरे बाबी बदलत्या असल्याने साहजिकच दर्जाही दरसाल बदलतो. त्याची कल्पना त्या त्या संस्थेतील आजी विद्यार्थी व शिक्षकांना सर्वाधिक असू शकते. ती चौकशी स्वत करावी, शक्य असल्यास तेथे प्रत्यक्ष जाऊन, पाहून यावे.
आरोग्यविज्ञान विद्याशाखांतील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यासाठी विविध पात्रता निकष आहेत. त्यात किमान व कमाल वय, नागरिकत्व, किमान गुणांची अट- खुल्या गटासाठी तसेच मागासवर्गीयांसाठी (बारावी व प्रवेश परीक्षेत), शारीरिक व मानसिक सक्षमता (वैद्यकीय प्रमाणित), दहावी व बारावीची परीक्षा महाराष्ट्रातून उत्तीर्ण केली किंवा नाही इ. अनेक बाबी नमूद केल्या आहेत. यातील एकही निकष जो विद्यार्थी पूर्ण करीत नसेल तो प्रवेशास पात्र ठरणार नाही हे समजून घेणे गरजेचे आहे. विविध अभ्यासक्रमांना पात्र होण्यासाठी गुणांचे निकष वेगळे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अभिमत विद्यापीठांची वा खासगी संस्थांच्या संघटनेची प्रवेश परीक्षा दिली असेल त्यांनी त्या परीक्षेचे माहितीपत्रक वाचून या सर्व महत्त्वाच्या गोष्टी नीट समजून घ्याव्यात.
बरेच विद्यार्थी विचारतात की मला अमूक गुण आहेत तर मला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल? लक्षात घ्या की प्रवेश हा गुणांवर नव्हे तर गुणानुक्रमावर अवलंबून असतो. प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका सोपी/कठीण असल्यामुळे दरवर्षी गुण व गुणानुक्रम बदलतात. अर्थात गुणवत्ता क्रमांक कळल्यानंतरही या प्रश्नाचे अचूक उत्तर देणे कठीण. कारण प्रवेश निश्चित करणाऱ्या काही गोष्टींमध्ये दरवर्षी थोडा फरक पडत असतो. उदा. महाविद्यालयांमधील प्रवेशसंख्या कमी-जास्त होणे, विभागवार परीक्षेला बसणाऱ्या व उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतील बदल, नवीन महाविद्यालये सुरू होणे, एखाद्या जुन्या महाविद्यालयाची मान्यता रद्द होणे. इ.
अर्थात असा अंदाज येण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या तसेच त्या त्या अभिमत विद्यापीठाच्या व खासगी संस्थांच्या संघटनेच्या संकेतस्थळावर व माहितीपत्रकात मागील वर्षी कोणत्या अभ्यासक्रमाला त्या प्रवेश परीक्षेतील किमान व कमाल किती गुणाच्या/ गुणवत्ता क्रमांकाच्या विद्यार्थ्यांला प्रवेश मिळाला होता याचा तक्ता दिलेला असतो, त्याचा तपशीलवार अभ्यास करावा. मात्र त्यावरूनही केवळ साधारण अटकळ बांधता येते.
उत्तम गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांना इच्छित अभ्यासक्रमाला प्रवेश मिळायला सहसा अडचण येत नाही. पण कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना मात्र हवा तेथे प्रवेश न मिळाल्यामुळे उपलब्ध पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक ठरते. याबाबत त्यांना समुपदेशनाचादेखील खूप फायदा होतो. अर्थात उत्तम गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांंनाही प्राधान्यक्रम लिहिताना समुपदेशनामुळे चुका टाळता येतात व योग्य अभ्यासक्रम/ महाविद्यालयाची निवड करता येते.
आता प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर अभ्यासक्रमाची व महाविद्यालयाची निवड, त्यासाठी कुठे कसा अर्ज करावा, प्राधान्यक्रम, प्रवेशाची शक्यता इ.ची धांदल सुरू होईल. याबाबत समुपदेशनासाठी विद्यार्थी वा पालकांनी दूरध्वनी/ ई-मेलद्वारा संपर्क करावा अथवा समक्ष भेटावे.
डॉ. दाक्षायणी पंडित , डॉ. पद्माकर पंडित
दूरध्वनी- ९९७६५९८८२९, ९८२३१३३५२३
ptpandit@gmail.com