Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

प्रवेशाचे इंजिनिअरिग
प्रवेश परीक्षांचा (सीईटी) निकाल जाहीर झाला आहे. आता वेध लागले आहेत ते वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाचे. यासंदर्भात विविध शंकांचे काहूर विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांच्याही मनात उठले असेल. या शंकांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न..
स्वायत्त महाविद्यालयांचे अर्ज १८ तारखेपासून मिळणार आहेत. गेल्या वर्षी अर्जाची किंमत रु.६००/- होती आणि अर्ज भरण्यासाठी सीईटीमध्ये किमान ११० मार्क मिळणे आवश्यक होते. (राखीव जागांसाठी किमान १०० मार्क आवश्यक होते). या वर्षी बहुधा यात बदल अपेक्षित नाही. या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयात ए.आय.ई.ई.ई. मधून जागा नाहीत. मॅनेजमेंट सीट्स नाहीत. विश्वकर्मा (व्ही.आय.टी.)मध्ये मात्र मॅनेजमेंटसाठी २० टक्के जागा आहेत.

ऑप्शन फॉर्म कसा भरावा?
साधारणपणे ऑप्शन्स भरताना आपण आपल्या निवडीनुसार एक क्रमावली तयार केली पाहिजे. हा क्रम तयार करताना फक्त आपल्याला काय हवं आहे याचाच विचार केला पाहिजे. आणि आधीच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ऑप्शन भरताना हा विचार केला पाहिजे की जर आधीचा कोणताही ऑप्शन मिळाला नाही तरच आपल्याला हा ऑप्शन हवा आहे ना? प्रत्येक वेळी हो हेच उत्तर घेऊन मगच पुढचा ऑप्शन शोधावा. हा क्रम साधारणपणे सर्व कॉलेज ब्रँचसाठी तयार करावा.
एकदा का ही क्रमावली तयार झाली की मग आपण ही माहिती मिळवायला हवी की साधारणपणे आपल्या सीईटीच्या मार्कानुसार गेल्या वर्षी काय काय मिळू शकत होतं? त्यानुसार मग पहिल्या मिळू शकणाऱ्या ऑप्शनच्या आधीच्या ४ ते ५ ऑप्शनपासून आपला फॉर्म भरावा. शक्यतो आपण ठरविलेल्या क्रमावर ठाम राहावे. विचार करताना तो सर्व बाजूंनी करावा. शक्यतो विचारातील मुद्दे लिहून ठेवावेत. यामुळे कोणाच्याही सांगण्यावरून उगाचच क्रमावलीमध्ये ढवळाढवळ होणार नाही. कारण हा क्रम अतिशय महत्त्वाचा आहे. खालीवर झाल्यास नको तो ऑप्शन मिळेल आणि हवे आहे ते मिळू शकत असूनही निसटून जाईल. असे झाल्यास या वर्षीच्या नियमांप्रमाणे तो प्रवेश अनिवार्य असेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला पुढील फेरीत संधी मिळणार नाही. यासाठी आपण माझ्या वेबसाईटचा अवश्य उपयोग करून घेऊ शकता,. या वेबसाईटवर अगदी ऑप्शन तयार करण्यापासून ते काय मिळेल या पर्यंतच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे सहजी मिळतात. याशिवाय ई-मेलवरून आपण माझे मार्गदर्शनसुद्धा घेऊ शकता. गेल्या वर्षी या सीटचा वापर शेकडो विद्यार्थ्यांनी करून घेतला होता.

वैद्यकीय प्रवेशातील काही ‘पथ्ये’
गेल्या सोमवारच्या लेखानंतर अखिल महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी/ पालकांचे दूरध्वनी व सं-पत्रे (ई-मेल्स) आली. बऱ्याच शंका या सर्वसाधारण स्वरूपाच्या, तर काही खासगी होत्या. अशा प्रकारच्या लेखातून सामायिक समस्यांचे निराकरण करता येते, पण प्रत्येकाच्या वैयक्तिक समस्यांची उत्तरे यातून मिळतीलच असे नाही. त्यासाठी विशेष समुपदेशनाची गरज असते. ज्या सामायिक शंका वा प्रश्न प्रामुख्याने विचारले गेले ते असे- मला (माझ्या पाल्याला) प्रवेश मिळेल का, मिळाला तर कोठे प्रवेश मिळणार, पाहिजे तेथे मिळेल की नाही, की आम्हाला बी.एस्सी. वा इतर पर्यायी अभ्यासक्रमाची निवड करावी लागेल? या व विशेषत अशा विचारांनी लोक व्यापलेले आहेत. अनेकांच्या मनात ज्या शंका आहेत त्यातून लक्षात येते की बऱ्याचजणांनी माहितीपत्रक नीट वाचलेले नाही. बारावीच्या निकालानंतर त्या निकालानुसार घरात गोंधळाचे वातावरण आहे. आता प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यात कदाचित अजून थोडी भरच पडणार आहे. या वातावरणात विद्यार्थी व पालकांना थोडा दिलासा व मार्गदर्शन देणे हा आजच्या लेखाचा प्रमुख उद्देश आहे. यानंतरही काही प्रश्न वा शंका राहिल्यास त्या जरूर विचाराव्यात.

आव्हान प्रवेशाचे..
अभियांत्रिकी-वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया आता लवकरच सुरू होईल. ही प्रवेश प्रक्रिया कशी असते, प्राधान्यक्रमाचे अर्ज कसे भरावे, गेल्या वर्षीचे ‘कट्-ऑफ’ गुण कसे कळतील, असे नाना तऱ्हेचे प्रश्न तुम्हाला भेडसावतील, याची जाणीव असल्यामुळेच ‘आव्हान प्रवेशाचे’ या मालिकेद्वारे तज्ज्ञमंडळींचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता’ने दोन भागांमध्ये प्रसिद्ध केले. आता प्रवेश प्रक्रियेत सहभागी होताना आपल्याला कोणते अनुभव आले; कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले, आणि त्या पाश्र्वभूमीवर आपल्याला कोणत्या सूचना कराव्याशा वाटतात हे आम्हाला जरूर कळवा.
आमचा ईमेल- kgtopg.loksatta@gmail.com