Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

लाल किल्ला

१६ मे च्या दुपारी अडवाणींना ऐकावे लागलेले ‘वेलकम टू द रियल वर्ल्ड’चे गीत त्यांच्या पत्रकार समर्थकांनी केलेल्या कल्पनेपेक्षा विपरीत सूर आळवत होते. भाजपच्या मदतीसाठी मैदानात उतरलेल्या पत्रकारांच्या ड्रीम टीमचे आडाखे चुकून त्यांची सारी बौद्धिक मेहनत व्यर्थ ठरली होती. पंतप्रधानपदाचे माजी उमेदवार एवढेच शाश्वत सत्य अडवाणींच्या वाटय़ाला आले.
पत्र आणि पत्रकारांमुळे सध्या भाजपचे राजकारण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव का झाला, याविषयी भाजपचे नेतृत्व अंतर्मुख होण्यापूर्वीच पक्षात पूर्णवेळ राजकारण करण्यासाठी दाखल झालेले पत्रकार आपली नवी भूमिका विसरून जुन्या सवयीनुसार पुन्हा पत्रकारितेत गुंतले आहेत. पत्रकार आणि पत्राचारामुळे बंद दारांमागे चर्चा करणाऱ्या शिस्तप्रिय भाजपमधील कलह चव्हाटय़ावर येऊ लागला आहे.
‘ड्रीम टीम’ बाळगण्याच्या मोहात क्रिकेटपासून राजकारणापर्यंत प्रत्येकच क्षेत्र पडलेले असते.

 

लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाच्या जखमा एअर कंडिशण्ड ड्रॉइंगरूममध्ये छानपैकी गोंजारत बसलेल्या भाजपकडेही अशीच ड्रीम टीम आहे. संपादक, पत्रकार आणि स्तंभलेखकांची. देशातील बडय़ा-बडय़ा वृत्तपत्रांना हेवा वाटावा असे संपादक व पत्रकार प्रखर राष्ट्रवादाच्या विचारांनी प्रेरित होऊन भाजपमध्ये दाखल झाले. अरुण शौरी, चंदन मित्रा, स्वपन दासगुप्ता, सुधींद्र कुलकर्णी ही नावे त्यात अग्रगण्य आहेत. पत्रकार म्हणून कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या अडवाणींना नामवंत पत्रकारांचे आकर्षण वाटणे स्वाभाविकच होते. पत्रकारांनाही अडवाणींचा कित्ता गिरवून राजकारणात प्रस्थापित व्हावेसे वाटण्यात वावगे नव्हते. त्यामुळे अनेक प्रतिभावान पत्रकार भाजपच्या या एलिट इंटलेक्चुअल वर्तुळात शिरण्यासाठी जिवाचे रान करीत होते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत राष्ट्रीय ते स्थानिक पत्रकारांच्या अथक बौद्धिक परिश्रमांमुळे देशातील लाखो घरांमध्ये वृत्तपत्रे आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून भाजपचे एकविसाव्या शतकातील भारताबद्दलचे विचार नवश्रीमंत आणि मध्यमवर्गाच्या मनावर थेट बिंवविले जात होते. श्रीमंतांच्या घरात राबणारी नोकरमंडळी आणि धुणे-भांडय़ाच्या निमित्ताने मध्यमवर्गाच्या संपर्कात आलेल्या गरीब व शोषितांच्या माध्यमातून भाजपचे विचार झोपडपट्टय़ांपर्यंत आपसूकच पोहोचणार होते. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकांतील पराभवानंतर अटलजी रिटायर झाले तेव्हापासूनच भाजपच्या या ड्रीम टीमने लालकृष्ण अडवाणींना पंतप्रधानपदी बसविण्याचा संकल्प सोडला आणि कार्यारंभही केला होता. संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ आणि ‘पांचजन्य’ किंवा भाजपचे मुखपत्र ‘कमल संदेश’मधून व्यक्त झालेले विचार अगदीच मिळमिळीत वाटावे, असे काँग्रेस, काँग्रेसचे मित्र पक्ष आणि डाव्या आघाडीला सळो की पळो करून सोडणारे झणझणीत लेख देशातील प्रमुख वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होत होते आणि प्रमुख राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमधून या वैचारिक आक्रमकतेला तेवढय़ाच तिखट शाब्दिक प्रहारांची जोड लाभत होती. अडवाणींच्या दिमतीला असलेल्या ड्रीम टीमच्या तोफा धडाडत होत्या. अधूनमधून त्यांच्या टोकदार टीकांचे बाण अडवाणींचा विश्वास नसलेल्या भाजपमधील आप्तस्वकीयांनाही घायाळ करायचे. पण राजकारणात मुरलेले आणि ‘संघ’भावनेतून ‘कामाला’ लागलेले नेते हा हिशेब पक्षाच्या व्यासपीठावर चुकता करण्यावर भर द्यायचे. गुजरातच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान भाजप-रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून अडवाणींच्या नावावर औपचारिक शिक्कामोर्तब होताच ‘अडवाणी फॉर पीएम’ या कॅचलाइनने इंटरनेटवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. कोणतीही बेवसाइट उघडली की अडवाणी यांच्या छायाचित्रासह भाजपचा प्रचार आणि भाजपच्या दिमतीला असलेल्या पत्रकारांचे विचार नेटसॅव्ही तरुण पिढीच्या स्वागतासाठी तयारच असायचे. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि त्यांच्या वेबसाइट्स्व्यतिरिक्त वेबसर्फिंग करणारा जाईल तिथे अडवाणींचे छायाचित्र पिच्छा पुरवीत होते. इंटरनेटच्या महाजालावर अडवाणींचा माहोल तयार करण्यासाठी भाजपची वॉर रूम रात्रंदिवस झटत होती. वॉर रूममध्ये काम करणाऱ्या युवकांनी ‘अडवाणी फॉर पीएम’ लिहिलेले टी शर्ट घालण्याचा दंडक मोडला तर अडवाणीसमर्थक त्यांच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकायचे. १३ मेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या साधारण वर्षभर आधीपासून अडवाणींनी व्हर्चुअल वल्र्ड व्यापून टाकले होते. खऱ्या सत्तेची केवळ औपचारिकताच उरली होती. पण १६ मे च्या दुपारी अडवाणींना ऐकावे लागलेले ‘वेलकम टू द रियल वर्ल्ड’चे गीत त्यांच्या पत्रकार समर्थकांनी केलेल्या कल्पनेपेक्षा विपरीत सूर आळवत होते. भाजपच्या मदतीसाठी मैदानात उतरलेल्या पत्रकारांच्या ड्रीम टीमचे आडाखे चुकून त्यांची सारी बौद्धिक मेहनत व्यर्थ ठरली होती. पंतप्रधानपदाचे माजी उमेदवार एवढेच शाश्वत सत्य अडवाणींच्या वाटय़ाला आले.
अडवाणींप्रमाणेच भाजपच्या सेवेत दाखल झालेल्या पत्रकारांचीही घोर निराशा झाली. निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित भाजपच्या निर्णयप्रक्रियेत आपणही तेवढेच महत्त्वाचे घटक होतो, याचा विसर पडून त्यांनी तटस्थ स्तंभलेखकांप्रमाणे भाजपच्या पराभवाचे विश्लेषण करायला सुरुवात केली. ज्या पक्षात मानाचे स्थान मिळाले त्यावरही परखड टीका करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. राजकारणात दाखल होऊनही त्यांना आपली लेखणी म्यान करता आली नाही. दिवसरात्र पत्रकारांच्या सहवासात राहणाऱ्या भाजप नेत्यांनाही स्तंभलेखनाची लागण झाली. पक्षाच्या कोअर ग्रुपला संबोधून जसवंत सिंग यांनाही ‘लेख’ लिहावासा वाटला. आपल्या लेखावर ते एवढे खूष झाले की त्याला मोठी वाचक संख्या लाभेल, याची त्यांना खात्री पटली. त्यांचा स्तंभ खास एका वृत्तपत्रासाठी नव्हे तर देशभरातील तमाम वृत्तपत्रांसाठी होता. भाजपच्या पराभवात कोणाचा किती वाटा होता, याचे विश्लेषण बाजूला ठेवून अडवाणींनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या ‘हयातीत’ केलेली संसदीय पदांची वाटणी त्यांना रुचली नाही. कामगार जगतातील उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन भत्त्याचे तत्त्व भाजपमध्येही राबविण्याची आवश्यकता असल्याचे अडवाणींच्या निदर्शनाला आणून द्यावेसे वाटल्याने ‘इनाम आणि परिणाम’ यांच्यात सांगड घालण्याचा आग्रह जसवंत सिंहांनी धरला. लोकसभा निवडणुकांतील पराभवाचे मुख्य शिल्पकार असूनही अडवाणींनी स्वतसाठी विरोधी पक्षनेतेपदाचे बक्षीस ठेवून घेतले, याचा त्यांना मनस्वी राग आला. बदललेल्या परिस्थितीत राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद सोडून लोकसभेत स्वकष्टाने विजय मिळवून पोहोचल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळायला हवे होते, याविषयी जसवंत सिंहांच्या मनात शंका नव्हती. अडवाणींनी रालोआचे अध्यक्षपद घ्यावे आणि विरोधी पक्षनेतेपद आपल्याला द्यावे, असा प्रस्तावही जसवंत सिंहांनी दिला होता. राज्यसभेतील उपनेत्या सुषमा स्वराज यांचा मान लोकसभेत कायम राखताना जसवंत सिंहांचा तर्क योग्य असल्याचे अडवाणींनीही दाखवून दिले, पण जसवंत सिंहांना महत्त्वाच्या पदांपासून वंचित राखून. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालयाची घंटाखुर्ची खेळणाऱ्या आपल्या सहकाऱ्याने पत्र लिहिल्याचे ऐकून यशवंत सिन्हांनाही पत्राचार केल्यावाचून राहवले नाही. पत्रातील मजकूर जसवंत सिंहांच्या पत्रापेक्षाही तिखट केल्याशिवाय त्यांची वाचकसंख्या वाढणार नव्हती. पराभवानंतर भाजपमध्ये संसदीय पदांचे टेंडर उघडले जात असताना अडवाणी आणि त्यांचे सहकारी आपली बोलीही विचारात घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे बघून सिन्हांना पक्षात एकाकी पडल्याची जाणीव झाली. दिवंगत माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे सहकारी असा लौकिक घेऊन दाखल झालेल्या सिन्हांना भाजपशी कधीही एकरूप होता आले नाही. अडवाणींची राजकीय घसरण सुरू झाल्याच्या नाहक भ्रमापोटी त्यांनी यापूर्वीही अनेकदा नैतिकतेचा आव आणत अडवाणींवर टीका केली होती. पण अडवाणीसमर्थक पत्रकारांप्रमाणे सिन्हांचेही आडाखे फसले. भाजपवर टीकेचे आसूड ओढून पत्रकार सहीसलामत सुटले, पण सिन्हांची मात्र गोची झाली. सिन्हांचा राजीनामा ताबडतोब स्वीकारून भाजपमध्ये त्यांचे स्थान किती नगण्य आहे, हे भाजपनेतृत्वाने पुन्हा दाखवून दिले. राज्यसभेत असताना सिन्हा यांचे प्रवक्तेपद अडवाणींवरील अशाच अकाली टीकेमुळे हिरावून घेण्यात आले होते. त्यामुळे सिन्हांना अशा मानापमानाची सवय आहे. कालांतराने सिन्हा आणि भाजप आणखी एका नव्या वादाला जन्म देण्यासाठी एक होतील. पण जसवंत सिंहांचा वाद आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. जसवंत सिंहांनी कोअर ग्रुपला लिहिलेले पत्र प्रसिद्धी माध्यमांपाशी पोहोचल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘इनाम’दार नेत्यांच्या गोटातून करण्यात आली. जसवंत सिंगांनी आपले मुद्दे पक्षाच्या व्यासपीठावर मांडले आणि ते पक्षाचे अनेक दशकांपासूनचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्यावर तडकाफडकी टोकाची कारवाई करणे इष्ट ठरणार नाही, अशी भूमिका मुरली मनोहर जोशी आणि राजनाथ सिंह यांच्यासह काही नेत्यांनी घेतली. जसवंत सिंहांवर कारवाईच करायची असेल तर पक्षाला अडचणीत आणणारे स्तंभलेखन आणि भाजपच्या अंतर्गत कुरबुरी चव्हाटय़ावर आणणाऱ्यांवरही करावी लागेल, असा युक्तिवाद केला गेला. त्यानंतरही अडवाणींना इच्छा असती तर जसवंत सिंहांची पक्षाचा कोअर ग्रुप, संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतून गच्छंती करणे अवघड नव्हते. पण राजनाथ सिंहांमुळेच जसवंत सिंहांवरील कारवाई टळली, असा आभास निर्माण करण्याच्या प्रयत्नात हा वाद आणखीच कटू झाला. जसवंत सिंह राजपूत असल्यामुळे राजनाथ सिंहांनी त्यांची पाठराखण केली असा आरोपवजा प्रश्न जेव्हा राजपूत असलेले भाजप प्रवक्ते राजीवप्रताप रुडी यांना पत्रकारांमार्फत विचारला गेला तेव्हा हा प्रश्न कोणाच्या वतीने विचारला गेला, याची रुडींना तात्काळ जाणीव झाली. पत्रकारांच्या माध्यमातून उघड होणारा भाजपमधील जातीयवाद कोणत्या स्तराला पोहोचला आहे, हेच यातून अधोरेखित होते. जसवंत सिंह हे आज जरी टाकाऊ नेते वाटत असले तरी त्यांच्यासारख्या अनेक नेत्यांमुळे भाजपचा राजपूत आधार अनेक दशके टिकून आहे, याचे भाजपची सूत्रे हाती घेण्याची घाई झालेल्या नवनेतृत्वाला विस्मरण झालेले दिसते. गुजरात निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींची तुलना रावणाशी करणाऱ्या केशुभाई पटेल यांच्यावर भाजपनेतृत्वाने कोणती कारवाई केली होती? इंडियन एअरलाइन्सच्या विमान अपहरणप्रकरणी कंदाहारला तीन अतिरेक्यांना सोडायला जाऊन भाजपला उपकृत करणाऱ्या जसवंत सिंहांचा अपमान करणे धोक्याचे ठरेल, याची जाणीव अडवाणीसमर्थकांना झाली नसावी. पत्रकारांच्या घोळक्यात बसून बातम्या प्लांट करण्याचे, ऑफ द रेकॉर्ड चर्चेतून आपल्याच सहकाऱ्यांना प्रसिद्धी माध्यमांद्वारे बदनाम करण्याचे आणि पक्षाने महत्त्वाची भूमिका सोपवूनही स्तंभलेखनाद्वारे आपल्याच पक्षाला हास्यास्पद ठरविण्याचे व्यसन भाजपमधील मूळ व पत्रकार म्हणून दाखल झालेल्या नेत्यांना जडले आहे. राजकीय नेत्यांचे गुन्हेगारांशी असलेले संबंध राजकारणाच्या मुळावर येत असल्याची टीका दशकभरापूर्वी होत होती. पत्रकारांच्या नको तितक्या कह्यात गेलेल्या भाजपच्या राजकारणाचीही वाटचाल याच दिशेने सुरू झाली आहे.
सुनील चावके